लग्नाचा खर्च कमी केल्यानं...

    दिनांक :30-Sep-2019
श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी म्हणा किंवा समाजाच्या दबावामुळे म्हणा, बरेच जण मुलामुलींच्या लग्नावर प्रचंड खर्च करतात. लग्न फक्त एक सोहळा न रहाता इव्हेंट होऊन जातं. अनेक जण डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देतात. यामुळे खर्चाचा आकडा वाढतच जातो. लग्न थाटामाटात पार पडतं. बरंच कौतुकही होतं. लोकांचे डोळे दिपतात. पण यामुळे काहींची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटून जाते. लग्नासाठी कर्ज घेतलं असेल तर त्याचे हप्ते भरत रहाणं जिकिरीचं होऊन बसतं. काहीजण लग्नासाठी पैसे साठवतात. म्युच्युअल फंड्‌समध्ये गुंतवणूक करतात. मात्र लग्नावर वारेमाप खर्च करण्यापेक्षा या पैशांंचा अधिक चांगल्या पद्धतीने विनियोग करता येऊ शकतो. त्याबाबतचं मार्गदर्शन... 
 
 
 
लग्नानंतर नवं घर घ्यायचं असतं गृहकर्ज घेतलं तरी ते घराच्या किंमतीच्या 70 ते 80 टक्क्यांपर्यंत मंजूर केलं जातं. उर्वरित पैसे आपल्याला आपल्या खिशातून भरावे लागतात. अशावेळी लग्नातला खर्च कमी करून त्या पैशांनी घराचं डाउन पेमेंट करता येईल. मुलांच्या लग्नाच्या खर्चासाठी तरतूद करण्यापेक्षा त्यांच्या उच्च शिक्षणावर पैसे खर्च करणं अधिक योग्य ठरेल. याचे भविष्यात खूप चांगले लाभ मिळू शकतील.
 
  
आर्थिक अडचणी कधीही येऊ शकतात. त्यामुळे तुमच्याकडे किमान सहा महिन्यांचा आपत्कालीन निधी असायला हवा. लग्नातला खर्च कमी करून तुम्ही हे पैसे बाजूला ठेऊ शकता. अडीअडचणीच्या काळात त्यांचा उपयोग होऊ शकतो. लग्नाचा खर्च भागवण्यासाठी विविध प्रकारच्या मालमत्तेची विक्री केली जाते किंवा ती तारण ठेवली जाते. मात्र यामुळे गुंतवणूक वाढीचे लाभ मिळत नाहीत. लग्नाचा खर्च आटोक्यात ठेवल्याने तुमची मालमत्ता टिकून राहू शकते.
 
 
आजच्या तरुणाईची जीवनशैली वेगळी आहे. सद्यस्थितीत अनेक जण लवकर निवृत्ती घेऊन आवडीच्या गोष्टी करण्यावर भर देतात. त्यामुळे लग्नाचा खर्च मर्यादित ठेऊन उर्वरित पैसे निवृत्तीसाठी राखून ठेवता येतील. या पैशातून पुढे जगभ्रमंती करता येईल. वैद्यकीय खर्च भागवता येतील.