दुसर्‍याचं एटीएम कार्ड वापरताय्‌?

    दिनांक :30-Sep-2019
तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे काही वेळा एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येत नाहीत. मात्र खातेदाराच्या खात्यातून तेवढी रक्कम वजा केली जाते. असं असलं तरी कार्डधारकाला पैसे काही मिळत नाहीत. बँकेच्या चुकीमुळे असं काही घडलं असेल तर काही तासांमध्ये तुमच्या खात्यात पुन्हा पैसे जमा केले जातात तर काही वेळा याबाबत बँकेकडे तक्रार करावी लागते. मात्र तुम्ही पैसे काढण्यासाठी इतरांचं कार्ड वापरलं असेल तर हे प्रकरण तुमच्या अंगलट येऊ शकतं. 

 
 
आपण अगदी सहज कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला, मित्रमैत्रिणींना किंवा विश्वासू सहकार्‍यांना पैसे काढून आणण्यासाठी आपलं एटीएम कार्ड देतो. अशा वेळी दुर्दैवाने एटीएम मशीनमधून पैसे बाहेर आले नाहीत आणि ते तुमच्या खात्यातून कापले गेले तर बँक याची जबाबदारी नाकारू शकते. कारण आपलं एटीएम कार्ड, बँक खातं याबाबतची माहिती दुसर्‍या कोणालाही देता येत नाही. यात कुटुंबिय आणि आप्तांचाही समावेश आहे. त्यामुळे ‘नॉन-ट्रान्स्फरेबल रूल’अंतर्गत बँका तुमचा दावा नाकारू शकतात.
 
 
 
बंगळूरूतल्या एका जोडप्याला असं प्रकरण चांगलंच महागात पडलं. पत्नी गरोदर असल्याने पतीने पैसे काढण्यासाठी तिचं एटीएम वापरलं. त्यावेळी खात्यातून पैसेही कापले गेले. पण एटीएममधून पैसे आले नाहीत. हे पैसे खात्यात पुन्हा जोडले गेले नाहीत. त्यामुळे त्यांनी बँकेकडे तक्रार नोंदवली. पण बँकेने दावा फेटाळून लावला. हे प्रकारण सुनावणीसाठी ग्राहक मंचापुढे आलं. चार वर्षांनंतर मंचाने या जोडप्याविरोधात निर्णय दिला. कारण पत्नीचं कार्ड पतीने वापरलं होतं. एटीएममधून पैसे काढण्याचा अधिकार फक्त कार्डधारकालाच असतो, असं मंचाने त्यावेळी नमूद केलं होतं. म्हणून कार्डधारक स्वत: एटीएममधून पैसे काढू शकत नसल्यास इतर मार्गांनी व्यवहार करावेत.