हिंगणघाट येथे किराणा मॉलला भीषण आग

    दिनांक :30-Sep-2019
हिंगणघाट,
येथील मीनल मॉल या किराणा दुकानाला पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझविण्यात आली असून, घरात अडकलेल्या नऊ जणांपैकी आठ व्यक्तींना बाहेर निघण्यात यश आले आहे. मुथा कुटुंबीयांचे तिसऱ्या मजल्यावर घर आहे. सर्व गाढ झोपेत असताना आग लागल्याचे कळताच कुटुंबीय बाहेर पडले.परंतु एक वृद्ध महिला अद्याप घरात अडकली आहे.

 
आग लागल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी बचावासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी काही जणांनी वरच्या मजल्यावरून उड्या घेतल्याने ते बचावले आहेत. अद्यापही मॉलचे चालक विजय मुथा यांची आई आतमध्ये अडकून असल्याची माहिती मिळत आहे. तसेच जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलवले असून, आगीची तीव्रता पाहता बाजूच्या इमारती खाली करून घेण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.