मोर्शी तालुक्यात डेंग्यूची दहशत; खानापुरात एकाचा मृत्यू

    दिनांक :30-Sep-2019
मोर्शी,
मोर्शी तालुक्यात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त असून डेंग्यूने खानापुरात एका युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मोर्शी, अंबाडा, रिद्धपूर येथेही डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने तालुक्यात दहशत पसरली आहे.
खानापूर येथील अमोल ढोरे नामक युवकाला डेंग्यूची लागण झाल्याने अमरावती येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची गावात चर्चा आहे. मोर्शी येथील गिट्टी खदान भागात एका युवकाला डेंग्यूची लागण झाली आहे. गिट्टी खदान परिसरात असलेल्या पाण्याच्या डबक्यावर पूर्णपणे हिरवा तगर आल्याने या भागात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढला आहे. या भागातील एका युवकाला डेंग्यूची लागण झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच रिद्धपूर येथे वार्ड क्रमांक एक मधील भीमराव राजाराम वानखडे यांना डेंग्यूची लागण झाली. वानखेडे यांच्यावर अमरावती येथील दयासागर रुग्णालयात उपचार सुरू आहे. साता ते आठ दिवसापूर्वी अंबाडा येथेही एक डेंग्यूचा रुग्ण आढळून आला होता . त्याच्यावर उपचार सुरू असल्याची विश्वासनीय माहिती आहे.
 

 
 
उपजिल्हा रुग्णालयात औषधीचा तुटवडा
हल्ली तालुक्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगाची लागण अनेक रुग्णांना झाली असून येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो विविध आजाराचे रुग्ण येत असल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना अन्य मेडिकलच्या दुकानातून औषध विकत घ्यावे लागत आहे. उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी खचाखच भरल्याचे चित्र दिसत आहे.