धक्कादायक! परतवाड्यात तीन तासात तिघांची हत्या

    दिनांक :30-Sep-2019
अचलपूर व परतवाड्यात संचारबंदी
दुकानांची व वाहनांची तोडफोड
 अनेक नागरीक जखमी
 
अचलपूर/परतवाडा, 
परतवाडा शहरातील वन विभागाच्या कार्यालय परिसरातील टिंबर डेपोजवळ सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास शाम रघु खोलापुरे (नंदवंशी) रा. महाविर चौक परतवाडा यांचा अज्ञातांनी हल्ला करून हत्या केली. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने परतवाडा शहरात दहशद पसरवून दगडफेक केली. दूकाने व वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर जमावाने केलेल्या हल्ल्यात आणखी दोघांची हत्या झाली. या घटनेमुळे परतवाडा व अचलपूर या जुळ्या शहरात चांगलीच खळबळ उडाली. नवरात्र सुरू असल्यामुळे पोलिसांनी येथे संचारबंदी लावली असून मोठी कुमक तैनात केली आहे. दरम्यान तीन संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
 
 
प्राप्त माहीतीनुसार, सकाळी 11 वाजताच्या सुमारास शाम पहेलवान (खोलापुरे) व इतर 4 ते 5 लोकांमध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादातून अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला चढवला त्यातच त्याचा मृत्यु झाला. ही बातमी संपूर्ण शहरात वार्‍या सारखी पसरल्यानंतर काही उपद्रवींनी केलेल्या हल्ल्यात मो. अतीक मो. रफीक (वय 40, रा. गटरमरपुरा), सैफ अली मो़. कमाल (वय 24) याचा मृत्यु झाला तर अनेक जण जखमी असून जखमींना खाजगी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.
 
ऐन नवरात्राच्या उत्सहात घडलेल्या या घटनेमुळे परतवाडा व अचलपूर शहरातील शांतता भंग झाली आहे. शाम पहेलवानची हत्या झाल्याची बातमी जुळ्या शहरात पसरताच टिंबर डेपो परीसरात शेकडोंची गर्दी जमली. नारेबाजी, घोषणेमुळे तणाव निर्माण झाला. या प्रसंगाला काहींनी विरोध केल्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. सैफ अली मो. कमाल याच्यावर झालेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. जिल्हा सामान्य रूग्णालयात त्याचा मृत्यु झाला, दुसर्‍या घटनेत मो. अतिक मो. रफीक याचा मृत्यु झाला. जमावाने 4 चारचाकी वाहने व अनेक दुचाकींची तोडफोड केली.
 

 
 
या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलिस लगेच घटनास्थळावर पोहचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान जुळ्या शहरातील सर्वच प्रतिष्ठाने, शाळा व महाविद्यालये, शासकीय कार्यालये दुपारीच बंद झाली. दुपारी 3 वाजता परतवाडा, अचलपुर, सरमासपुरा ठाण्यात संचारबंदी लागू करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच विशेष पोलिस महानिरीक्षक रानडे, पोलिस अधिक्षक बालाजी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी जुळ्या शहरात असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. जुळ्या शहरात अफवांचे पेव आले असून उपविभागीय पोलिस अधिकारी अदाबगिरी यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शहरात शांतता राखण्याचे आवाहण केले आहे.
 
 
निवडणुक प्रक्रिया सुरू राहणार, सभा व मिरवणूकांना बंदी
जुळ्या शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार एका दिवसासाठी सभा, मिरवणूकांना बंदी व जमावबंदीचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी संदिपकुमार अपार यांनी जारी केला. पुढील 24 तास हा आदेश अंमलात राहणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरु राहील. तथापि, कलम 144 च्या आदेशाचे पालन करणे, येणार्‍या उमेदवारांना बंधनकारक राहील, असे उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. परतवाडा, अचलपूर, समरसपूरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहराच्या परिसरात 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी जमू नये व फिरु नये. मिरवणूक काढू नये व सभा घेऊ नये. मोर्चा काढू नये, काठी, लाठी, कुर्‍हाड, जंबिया, तलवार अगर कोणत्याही तीक्ष्णधारेचे हत्यार तसेच कोणतेही अग्नीशस्त्र जवळ बाळगू नये असे आदेश देण्यात आले आहे.