अकोल्यात 'पिके’ समाधानकारक ‘पाणी’ चिंताजनक

    दिनांक :04-Sep-2019
अकोला, 
अकोला जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत सरासरी 82.98 टक्के इतके पर्जन्यमान झाले. या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील पिकांची स्थिती समाधानकारक आहे, तर सुमारे 8 लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ 10.34 टक्के इतका जलसाठा असल्याने अकोलेकरांच्या पाणी पुरवठ्याची स्थिती चिंताजनक आहे. 
 
 
जिल्ह्यात यावर्षीचा पावसाळा पिकांकरिता समाधानकारक आहे. 4 सप्टेंबरपर्यंतचे,वार्षिक सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान जिल्ह्यात 82.98 टक्के इतके आहे. सर्वाधिक पर्जन्यमान बार्शिटाकळी तालुक्यात 94.97 टक्के, त्या खालोखाल अकोट 93.83टक्के, तेल्हारा 91.53 टक्के, बाळापूर 89.79 टक्के, पातूर 78.88 टक्के, अकोला 72.77 टक्के तर सर्वात कमी पर्जन्यमान असलेल्या मूर्तिजापूर तालुक्यात केवळ 62.61 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली.
 
जिल्ह्यातील पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी काही भागात पिकांवर काही प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव असल्याची नोंद आहे. कीटकनाशक फवारणी करताना 150 च्यावर शेतकर्‍यांना विषबाधा झाली आहे. प्रशासनाने कीटकनाशक फवारणी संदर्भात शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
 
सिंचन व पाणी पुरवठ्याकरिता जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प आहेत. यातील काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला महानगराला पाणी पुरवठा केल्या जातो. या प्रकल्पात केवळ 10.34 टक्के जलसाठा असल्याने अकोलेकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अद्याप सुटली नाही. वान प्रकल्प हा जिल्ह्यातील दुसरा मोठा प्रकल्प असून या प्रकल्पातील जलसाठा मुख्यतः सिंचनाकरिता उपयोगी ठरतो. सोबतच 84 खेडी पाणी पुरवठा योजना या प्रकल्पातून जिल्ह्यात होते. या प्रकल्पातील जलसाठा 83.90 टक्के इतका असून या पावसाळ्यात या प्रकल्पाचे दरवाजे दोन वेळा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
 
जिल्ह्यातील मोर्णा प्रकल्पात 25.10 टक्के, निर्गुणा प्रकल्प 18.61 टक्के, उमा प्रकल्प 19.70 टक्के तर पोपडखेड लघु प्रकल्पात 58.38 आणि 65.62 टक्के इतका जलसाठा आहे. वान प्रकल्प वगळता जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणार्‍या कुठल्याही प्रकल्पात 25 टक्के पेक्षा अधिक जलसाठा नसल्याने आणि त्यातही 8 लाख लोकसंख्या असणार्‍या अकोला शहराला पाणी पुरवठा करणार्‍या काटेपूर्णा प्रकल्पात जेमतेम 10 टक्के जलसाठा असल्याने पाण्याची समस्या अद्यापही सुटली नसल्याचे चित्र आहे.
सप्टेंबर महिन्यात होणारा आणि परतीचा पाऊस कसा होतो यावरच अकोलेकरांच्या पाणी प्रश्नाचे उत्तर अवलंबून असणार आहे. सद्यस्थितीत मात्र अकोलेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असेच चित्र आहे.