मोर्शीत मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती

    दिनांक :04-Sep-2019
घरांमध्ये पाणी शिरले, जनजीवन विस्कळीत
 
 
मोर्शी,
मोर्शी तालुक्यामध्ये आज दुपारी 12 वाजतापासून तीन ते चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे मोर्शी शहराला पुराच्या पाण्याने वेढले. शेकडो घरात पाणी शिरले असून मोर्शी चांदुर बाजार महामार्गही पाण्याखाली गेला आहे. मोर्शी तालुक्यातील डोंगरामधून आलेल्या पुरामुळे शेतातील पीक सुद्धा वाहून गेल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. मोर्शी शहरात पुराचे पाणी शिरल्यामुळे मोर्शी येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 
शेकडो घरात पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण शहर जलमय झाले आहे. मोर्शी - चांदुर बाजार मार्गावर रस्त्यावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने वाहतूक खोळंबली आहे. सलग चार तास मुसळधार पाऊस आल्यामुळे मोर्शी शहर व तालुका जलमय झाला आहे. दमयंती नदीला पूर आल्यामुळे शहराच्या आतील गावात बरेच घरात पाणी शिरले पेटपुरा, भोईपुर, सुलतानपुरा, मेन मार्केट, आठवडी बाजार, आंबेडकर चौक, खोलापुरा या भागातील घरात 4 फूट पाणी होते. गजानन कॉलनी येथील राजेश मुंगसे व आजूबाजूच्या घरात पाणी घुसल्यामुळे घरातील साहित्य इतरत्र हलविण्यात आले. पावसामुळे दमयंती, माडू व अन्य नद्यांना पूर आल्याने अप्पर वर्धा धरण भरण्याची शक्यता वाढलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत अप्पर वर्धा धरण 83.85 टक्के जलसाठा आहे. नगरपालिकेचे कर्मचारी, नगरसेवक व तहसीलदार, तहसीलचे कर्मचारी कर्तव्यावर असून मदतीसाठी तत्पर आहे. शहरातला अनेक भागाचा विज पुरवठा खंडीत झाला होता. मुसळधार पावसामुळे विद्यार्थी शाळेतच अडकले होते. पावसाचा जोर कमी झाल्यावर ते घरी परतले.  

 
 
15 सदस्यांचे बचाव पथक मोर्शीला रवाना
मोर्शी येथील पूरस्थितीत नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांच्या यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मोर्शी येथे दिले . नवाल यांनी बुधवारी सायंकाळी मोर्शी येथे भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. 15 सदस्यांचे बचाव पथकही मोर्शीला उपस्थित आहे.
 
जिल्हाधिका-यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यानुसार प्रशासनाला निर्देश दिले. मोर्शी शहरात मध्यवस्तीत पुराचे पाणी शिरल्यामुळे तेथील काही कुटुंबांना नगरपरिषदेच्या शाळात हलविण्यात आले आहे. त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
जिल्ह्याच्या अन्य भागातही पाऊस
मोर्शीत मुसळधार बरसलेला पाऊस जिल्ह्याच्या अन्य भागात सौम्य प्रमाणात बरसला. तिवसा, चांदूर रेल्वे, अमरावती, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, चांदूर बाजार या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तविला होता. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण सर्वत्र होते.