असे अदा करा आपले 'ई-चालान’

    दिनांक :04-Sep-2019
वाशीम, 
जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात ‘वन स्टेट वन ई-चालान’ अभियानांतर्गत ‘महाट्रॅफिक’ अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून वाहनचालक कोणत्याही शहरातून दंडाची रक्कम थेट ऑनलाईन अदा करू शकणार आहेत. तसेच त्यांना वाहनावर आकारण्यात आलेल्या दंडाची माहिती ‘महाट्रॅफिक’द्वारे पाहायला मिळणार आहे. 

 
 
‘महाट्रॅफिक’ हे अ‍ॅप्लिकेशन हाताळण्यास अगदी सोपे आहे. आपल्या अँन्ड्रॉइड मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून तसेच अ‍ॅपल मोबाईलसाठी आयओएस अ‍ॅप स्टोअरवरून हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करता येईल. वापरकर्त्यांनी आपल्या वाहनाची नोंदणी अ‍ॅपवर करण्यासाठी माय व्हेईकल या चिन्हावर क्लिक करावे व त्यामध्ये आपल्या वाहनाचा नंबर टाकावा. आपल्या वाहनाचा इंजिन किंवा चेसीसचे शेवटचे 4 अंक भरण्यासाठी वापरकर्त्यांनी आपल्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र व विमा पॉलिसी इत्यादी कागदपत्रांच्या प्रती स्वतः जवळ बाळगाव्यात.
 
वाहनाविरुद्ध प्रलंबित असलेल्या वाहतूक दंडाची (ई-चालान) माहिती घेण्यासाठी ‘महाट्रॅफिक’ अ‍ॅपवरील माय ई-चालान्स वर क्लिक करावे. याठिकाणी दिसणारी प्रलंबित वाहतूक दंडाची रक्कम वाहनधारकांना क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड अथवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरता येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक (गृह) वाय. आर. कडगे यांनी कळविले आहे.