गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी, भामरागड अजूनही 'आऊट ऑफ रिच'

    दिनांक :04-Sep-2019
गडचिरोली,
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाले असून, अनेक मार्ग बंद झाले आहेत. गेल्या ३ ऑगस्टला पर्लकोटा नदीला पूर आल्याने तुटलेला भामरागडचा संपर्क अजूनही तसाच आहे. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने दुकानदारांची प्रचंड गैरसोय होत आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मदतकार्य करीत असून यंदाच्या पावसाळ्यात भामरागडचा संपर्क तुटण्याची ही पाचवी वेळ आहे. तर दिना नदीच्या पुलावरुन ३ ते ४ फूट पाणी वाहत असल्याने मुलचेरा तालुक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद आहे. 
 
आज सकाळपासून दुपारी दीड वाजतापर्यंत जिल्ह्यात संततधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरही जलमय होऊन अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. येथील नगर परिषद कार्यालयातही पाणी शिरले. नगराध्यक्षांच्या कक्षासह अन्य विभागांची कार्यालयांतही पाणी शिरल्याने तेथील सामान प्रवाहित झाले. त्यामुळे आजची सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याची नामुष्की नगर परिषदेवर आली. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील केमिस्ट भवनाजवळ पाणी साचल्याने तब्बल दोन तास वाहतुकीस मज्जाव करण्यात आला होता. त्या परिसरातील वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. कॉम्प्लेक्स परिसरातील आयटीआय चौकातील परिसरही जलमय झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी १४८८ पूर्णांक ९ मिलीमीटर पाऊस पडला. पावसाळा संपण्याआधीच सरासरीपेक्षा १०९ मिलीमीटर पाऊस जास्त पडल्याने जलाशये तुडुंब भरली आहेत. मात्र, वारंवार पडणारा हा पाऊस आता नागरिकांना नकोसा झाला आहे.