बँक परिसरातुन ग्राहकाचे 60 हजार रुपये लंपास

    दिनांक :04-Sep-2019
कारंजा लाड,
कारंजा शहरातील कॅनरा व अक्सिस तसेच स्टेट बँक परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून, 4 सष्टेबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान एक ग्राहक 60 हजार रुपये भरणा करण्यासाठी बँकेत आला असता चोराने त्यांची बँक परिसरात दिशाभूल करून 60 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. मात्र या ठिकाणी तीन बँकेचे व दोन इमारतींचे असे 5 सीसीटीव्ही कॅमेराचे युनिट या ठिकाणी असतांना सुद्धा काय उपयोग असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
 
 
सविस्तर असे की, वर्धमान कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या कॅनरा बँकेत गौरव गणेश शंकरपुरे हा 1 लाख 25 हजाराचा डीडी काढण्यासाठी आला असता बँकेत काही पैसे कमी असल्याने तो जवळ असलेले 60 हजार रुपये घेऊन खाली उतरला दुचाकी घेऊन जात असताना अज्ञात चोराने तुझे पैसे पडले असे दाखवून बतावणी केली व जवळची 60 हजार रुपये असलेली बॅग लंपास केली.
 
 
याबाबतची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा व बँक अधिकारी अमोल उजवणे यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा मधील फुटेज चेक केले असता तीन ते चार जणांच्या टोळीने ग्राहकाकडून 60 हजार रुपयांची बॅग लंपास केली. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात असे अनेक प्रकार घडत आहेत. पोलिस प्रशासन सुस्त असल्याने हे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप होत आहे.