पावसाचा फटका मराठी कलाकारांना

    दिनांक :04-Sep-2019
मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याकडून सकाळी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र काही काळाने तो वाढवून आता रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. विविध ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. याचा फटका मराठी कलाकारांनाही बसला आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिजीत खांडकेकर हे वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

 
 
 
जितेंद्र जोशी जेव्हीएलआरच्या वाहतूक कोंडीत अडकला आहे. यासंदर्भात त्याने ट्विट केले आहे. ‘आज की ताजा खबर..पवई ते जेव्हाएलआर पाच किमी यायला तीन तास, अजूनही रहदारी मुंगीच्या गतीने,’ असं त्याने लिहिलं आहे. #खड्डे आणि बरंच काही असा हॅशटॅग त्याने वापरला आहे. तर अभिनेत्री तेजश्री प्रधान ठाण्याहून पवईला शूटिंगसाठी जाताना वाहतूक कोंडीत अडकली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीत अभिजीत खांडकेकर अडकला आहे. पावसामुळे बरेच शूटिंग रद्द करण्यात आले आहेत.
 
 
पावसाची स्थिती लक्षात घेत मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सकाळच्या सत्रातील शाळेतले विद्यार्थी सुखरुप घरी पोहोचतील याची खबरदारी शाळांनी घ्यावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे.