महिलेची ऑनलाईन फसवणूक करणार्‍या दोघांना अटक

    दिनांक :04-Sep-2019
 पोलिसांनी केले कोलकाता येथून जेरबंद
 आरोपींना 2 दिवसांची पोलिस कोठडी
 
अकोला,
गत एका महिन्यापूर्वी अकोल्यातील एका महिलेची 42 हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करणार्‍या दोन आरोपींना सायबर सेलच्या मदतीने सिटी कोतवाली पोलिसांनी मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एका महिन्यापूर्वी शहरातील एका महिलेला कोलकाता येथील आरोपी संजयकुमार धुसत आणि सोनूसिंग यांनी बॅकेतून बोलतोय असा फोन करून ओटीपी क्रमांक मागितला होता.या महिलेने ओटीपी नंबर देताच त्या महिलेच्या बँक खात्यातून 42 हजार रूपये वळते झाले होते. याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीवर तपास करून पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपास केला. आरोपी कोलकाता येथील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सिटी कोतवाली पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी आणि इतर कर्मचार्‍यांनी या दोन आरोपीना कोलकाता येथून अटक केली. मंगळवारी दोन्ही आरोपीना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.