भादव्यातला अलवार पाऊस...

    दिनांक :04-Sep-2019
यथार्थ  
 
श्याम पेठकर  
 
पाऊस जसा येतो तसे त्याला जावेच लागते. तसा निरोपाचा क्षण प्रत्येकाच्याच वाट्याला येतो. पण, पावसासारखे अलवार निघून जाणे कुणालाच जमत नाही. नव्याने श्रीमंत झालेल्या रानाच्या आणि ओसंडून वाहणार्‍या नद्यांच्या खाणाखुणा तो ठेवून जातो. देणार्‍याने मागायचे नसते. तसे ते कुण्याच देणार्‍याला जमतही नाही; पण परतणार्‍या पावसाला रानाने कितीही हळवी साद घातली अन्‌ नदीचे पाणी खळखळाट करीत आडवे झाले, तरी पाऊस मागे वळूनही बघत नाही. जाणार्‍या पावसाने मागे वळून बघितले तर त्याची निर्मिती धुवून निघण्याचा शाप त्याला आहे. मागे वेळूची बने कितीही हळवी झाली, तरी त्याने वळून बघायचे नसते. असे नि:संग होऊन निघून जाणे तसे पावसालाही कठीण जाते. गहिवर दाटून येतात. रिकाम्या रस्त्यांवरून धुकं धावत राहावं तशा नद्या धावत राहतात. डोंगर-कडे अनावर होतात अन्‌ माय मजुरीला जाताना घरातलं तान्हं केविलवाणं व्हावं तशी पिकं एकाकी होतात. वारा त्यांना जोजवीत असतानाच पाऊस परतीच्या वाटेला लागतो. आखाडीला गेलेली तिची दमणी सरत्या श्रावणात परतीच्या वाटेवर असताना, माहेरच्या उंबरठ्यावर पाऊस हृदयातले गहिवर डोळ्यांत आणून पाण्याच्या पडद्याआडून तिला निरोप देत असतो...
 

 
 
पाऊस असा निघून जात असला, तरीही तो अस्तित्वहीन होत नाही. निर्मितीचं देणं लाभलेली कुठलीच गोष्ट तशी पूर्णपणे पुसून टाकता येत नाही. भादव्यात पाऊस असा जाता-जाता निनादत असतो. भैरवीच्या पाऊससरीही तशा खोलवर चिंब   भिजविणार्‍या असतात. निघताना कातर झाल्याने त्या अधिकच गहिर्‍या झाल्या असतात. मग गवताची फुलंही नखरेल सजलेली असतात. सजल झाली की सृष्टी सजत असते. पण, पावसाला त्याचा वृथा अभिमान नसतो. गाव पावसाच्या ऋणात आकंठ बुडाला असताना पावसाच्या ते गावीही नसतं. माहेरच्या गारव्यातून लेक अडकत, अडखळत पण खळाळत सासरच्या शिरव्या१११त शिरते; पण रिकाम्या हातानं अन्‌ रित्या डोळ्यानं दाठ्यात पाय गाडून उभ्या जन्मदात्याचं काय?
 
रान आता स्वतंत्र झालेलं. त्याचा सांभाळ उन्हं करीत असतात. जाता-जाता पाऊस वडीलधार्‍याप्रमाणे पिकांच्या हाती सरींची भेट देतच जात असतो. वाढलेलं तण म्हातारे हातही साफ करू शकतात. घरातल्या राजस जोडीनं; सांज हिरवे चाळ घालून छुमकत येण्यापूर्वी रानात सहज फेरफटका मारला, तरी पिकं अभिमानानं डोलायला लागतात अन्‌ दुभती जनावरं उगाच उंडारतात. सूर्यफूल तरारून फुलावं तशी दुपार लख्ख पडलेली. ती दोघं बंगईसह हिंदोळत असताना सरत्या पावसाला निरोप देताना जडावलेला एखादा ढग गावावर सावली धरतो. घर सकाळच्या उन्हात न्हात असतानाच मनात घर धरून घरची वाढत्या वयाची जाणती माणसं सावलीसारखी निघून गेलेली. आषाढात उंबर्‍याशी अडखळलेला पाऊस आता घरावर भादव्यात बरसला पाहिजे म्हणून ते त्या दोघांना सोडून उगाच रानात गेलेले. मग दुपारच्या जेवणानंतर कुरकुरणार्‍या बंगईवर विडा रंगत जातो.
 
कर्दळीच्या फुलागत तिच्या लालचुटूक ओठांची आमंत्रणं त्याला असह्य करतात. भादव्यातल्या पावसाच्या आळसावलेल्या सरी टपटपायला लागल्याचा बहाणा करून ते दोघेही मग घराच्या आश्रयाला जातात. अशा वेळी पावसाळलेल्या वार्‍यानं माहेरचे कितीही सांगावे आणले तरी तिला त्याचे भान नसते. तिकडच्या हातांच्या झोळीतून निघाल्यावर तिला काही काळ निराधार वाटलं होतं, पण तेव्हा पावसानं सोबत केली. आता ती इकडच्या उबदार मिठीत हरविलेली. तिचं असं हरवलेपण वार्‍याला अस्वस्थ करतं. वारा घराची तावदानं ताडताड वाजवीत घराभोवती फिरत राहतो. निरोप घेताना पावलं अडखळलेला पाऊसही तिच्या घरापाशी थांबलेला. तिच्या डोळ्यांत उजागर झालेली कान्होबाची स्वप्नं तो आपल्या ओठांनी टिपून घेतो. ती सैल होते. तो अधिकच धिटावत जातो. बाहेर बंगई एकटीच कुरकुरत आंदोलने घेत असते आणि विड्याचा नखरेल डबा बंगईवर उगाच घरंगळत राहतो. काही वेळाने वारा शांत होतो. पाऊसही झाडांच्या पानांवर विसावतो. याच काळात नंदी गावभर होतात. वाड्यात चांगभलं असल्याची ग्वाही देतात. फुगलेल्या रानातलं दान घरात भरायला जागा हवी म्हणून जुनं जोंधळदान नंदीश्वराच्या झोळीत पडतं. त्याची झोळी संपन्न समाधानाने तट्‌ट फुगते. नंदी सवयीप्रमाणे त्या घराशीही थांबतो. घुंगरमाळांची साद देतो. घरातून अस्फूट बांगड्यांचा किणकिणाट तेवढा ऐकू येतो. नंदीवाला घराकडे भारल्या नजरेनं बघत, मिशीतल्या मिशीत हसत वाटेला लागतो. तेव्हा घराच्या कौलांवरून सांज अंगणात उतरत असते. चिमण्या परसातली झाडं जिवंत करतात. कडुिंनबाच्या उंच लचकदार डहाळीवर बसलेला राघू समाधी भंगल्यागत अचानक शीळ घालीत फडफडत उडतो. तोपर्यंत घर ‘शुभंकरोती’ म्हणायला लागलं असतं...
 
पाऊस जाताना एक एक गावाला अन्‌ एक एक घराला भेटी देत जातो. तिच्या आठवणीने दूर गावात एकाकी घरात माय पान्हावली असते. मायचा पदर धरून पाऊस अंगणात खेळून घेतो. माय त्याला डोळ्यांत जागा देते. बापाच्या थोराड चेहर्‍यावर तिच्या आठवणींच्या सुरकुत्यांनी जाळं विणायला सुरुवात केलेली. पाऊस मग त्या म्हातार्‍याच्या पायाशी खेळत राहतो. त्याचे बोट धरून सांजेला मारुतीच्या पाराकडे अस्वस्थ चक्कर टाकून येतो. आठवणींची वीण अधिकच घट्‌ट होते. थरथरत्या ओठांवरून पाऊस निथळत राहतो. लेकीच्या स्मरणाने विकल झालेला बा मग ओठ गच्च मिटून आठवणींचा पान्हा अदबीने डोळ्यांतच अडवून ठेवतो. थोराड हातांनी मायचे डोळे पुसताना त्याचे डोळे अश्रूंनी बोलके होतात. पालथ्या हातांवर डोळ्यांतले ओथंब निपटून काढताना बा गलबलून येतो. खेळकर पाऊस मग प्रौढ, पोक्त होतो. पावसाला हे सारे तिलाच सांगायचे असते, पण पावसाचेही ओठ शिवलेले. मायनं त्याला मूकपणे मनाई केलेली. मग श्रावणात परत बोलता झालेला पाऊस भादव्यात मुका होतो. आषाढातले पावसाचे मौन आणि भादव्यातले मुकेपण यातला फरक कळतो, तेव्हा पाऊस पूर्णपणे निघून गेलेला असतो. लेक तिकडे मुग्ध मौन झाली असताना माय अन्‌ नि:शब्द बा रडवेेले झाले असतात.
 
आंब्याच्या पानांचं मानाचं तोरण तोडून पाटलाची बैलजोडी उंडारलेली. आता रानातलं पीक आडवं होऊन घरात येईपर्यंत त्यांना
उसंत आहे. अवघी हिरवळ आपल्याच खुरांनी उकरून जमिनीतून बाहेर काढली आहे, या गुर्मीतच ती जनावरं वावरू लागतात. तिच्या हळदगोर्‍या हातांनी शिंगांच्या मधोमध कुंकू लावून पायावर पाणी पडलं की, तबकातल्या निरंजनाच्या ज्योतिगत त्यांचे डोळे विलक्षण चमकू लागतात. बैलांच्या जोड्या आपल्या नव्यातरण्या घरधनिणीकडे कौतुकाने बघतात. दुपारी बंद घरात हिरव्या बिल्लोरांचा लाजरा किणकिणाट त्यांच्या सराईत कानांना जाणवलेला. तेव्हा परसदारी महादेवाच्या पिंडीवर  टपटपणार्‍या पावसाच्या पाण्याचा संदर्भही मोठा बोलका. कुंपणावरच्या हिरवळीत लपलेला राघू घरात येणार, हे त्या जाणत्या जनावरांनाही कळलेलं. मग ते जरा जादाच उंडारतात. संध्याकाळी मारुतीच्या देवळात दिव्यात तेल घालायला ती निघते, तेव्हा पाऊस लडिवाळपणे तिच्यासोबत ठुमकत जातो. जाणत्यांच्या नजरेतून तिच्या कांतीवरचा तजेला लपत नाही. मारुतीच्या पारावर मोठ्या कनातीत गणपतीची स्थापना केलेली. ती गणरायाला सहेतुक हात जोडते. पाऊस मग थोडा माघारी फिरतो. अशा गर्भारलेल्या भादव्यात निघून जाणे त्याच्याही जिवावर येतं. लेकीनं दिलं घर फुलविलं, हे तो माय अन्‌ बा ला जाऊन सांगतोच. मंदिराचा पुजारी तिच्या ओंजळीत मोदक ठेवून ‘मनाजोगतं होईन’ असा आशीर्वाद देतो. ती शहारून येते. बांगडीचा कौल खरा निघेल का? मंगळसूत्राच्या डबीत जपून ठेवलेला बांगडीचा शकुन सांगणारा बिल्लोर परत एकदा बघून घेते. त्याला ही बातमी कशी सांगायची, असा विचार करीत असताना तो धसमुसळेपणा करतो. नाजूक हिरवा चुडा त्याच्या धसमुसळेपणाने विखरतो. ‘‘आता अशा बांगड्या नाई वाढवाच्या जी’’ म्हणत ती त्याच्या कानात कुजबुजते. तो वाढल्या बांगडीचा बिल्लोर घेतो. तिला हात समोर करायला लावतो. तिच्या नितळ गोर्‍या हातावर तो बिल्लोर कट्‌कन मोडतो. याचा तुकडा तुझ्या तळव्यावर पडला, तर मुलगाच होईल... तिच्या तळव्यावर बांगडीचा एक बिल्लोर पडतो. ती समाधानाने तळवा मिटून त्याच्या मिठीत विसावते. तेव्हा पाऊस डोळ्यांत बिल्लोर घेऊन गावकुसाबाहेर गेला असतो. गाव आता फळेल, फुलेल याची त्याला खात्री असते...