संशयित बॅग ने हावडा एक्सप्रेस थांबवली

    दिनांक :04-Sep-2019
बेवारस बॅगची केली बॉम्ब शोधक पथकाने तपासणी
 
अकोला,
मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी दुपारी संशयित बेवारस बॅगने रेल्वे स्टेशनवर खळबळ उडाली होती. प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेत या बॅगचा तपास करण्यात आला. यासाठी रेल्वे स्थानकावर बॉम्ब शोधक पथकाने कसून चौकशी केल्यावर त्यात काहीही आढळले नाही. ती बॅग सैन्यात कार्यरत सैनिकाची असल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
 

 
 
अकोला अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसमध्ये एक बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली होती. ही घटना मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान घडली. यावेळी बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय मराते यांना स्टेशन मास्टर यांनी माहिती दिली की, अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस रेल्वेमधील कोच नंबर एस-3 मधील बर्थ नं.33 वर एक बेवारस बॅग आढळून आली आहे. या माहितीवरून रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविले. त्यांनतर वजनदार आणि संशयास्पद दिसणारी बॅग रेल्वेतून उतरवून पोलिस ठाण्यात आणण्यात आली. यावेळी बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. बॉम्ब शोधक पथकाने बॅगेची पाहणी केली असता ती बॅग गुजरातमधील जामनगर येथे कार्यरत असलेल्या सैनिकाची असल्याची खात्री झाली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक किरण सावळे यांनी पुढील प्रक्रीया सुरू केली असून, सैनिकाशी संपर्क साधून त्याला ती बॅग सुपूर्द करण्यात येणार आहे.