रिसोडचा नवसाला पावणारा मानाचा गणपती

    दिनांक :05-Sep-2019
जयंत वसमतकर
रिसोड, 
ऋषीवट तीर्थ क्षेत्रात म्हणजे रिसोड नगरात सर्वात पुरातन श्री गणेश मंदिर हे स्वयंभू आहे. या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी येथील प्रतिष्ठित नागरिक दिवंगत श्री त्रिंबक लक्ष्मण पांडे उपाख्य (बापू साहेब ) यांनी पंचक्रोशीतील ब्रम्ह वृंदाना आमंत्रित करून प्रतिष्ठापणेचा सोहळा सम्पन्न केला. वेद मंत्रोच्चार मंत्रांनी सर्व परिसर दुमदुमून गेला. त्यामध्ये विविध स्तरातील नामवंत व्यक्तीचा सहभाग होता. त्या काळापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. सकाळ संध्याकाळ विधिवत पुजा केली होते. त्यावेळी मंदिराची संपूर्ण जबाबदारी तात्या माहुरकर पाहत असत. त्यानी संस्कार वर्ग, पाठांतर स्पर्धा आयोजित करून सर्वत्र धार्मिक वातावरण निर्मित केले. पूर्वी अनेक नामवंत कीर्तनकार, भागवतकार. यांनी हजेरी लावलेली आहे. दर संकष्ट चतुर्थीला अथर्वशीर्ष पठण अभिषेक सुरू केला. ती आजतागायत टिकुन आहे. 

 
 
गणेश मंदिरामध्ये नुतनीकरण करण्यात आले असून, बाळासाहेब देशपांडे यांनी अष्टविनायकाची विधिवत स्थापना केली. त्यामुळे गणेशाचे महत्व वाढले. मंदिरात दैनंदिन प्रार्थना, उपासना व सर्व धार्मिक विधी साजरे होतात. त्याने पावित्र्यता टिकुन राहते. या गणेशाची सर्वात जुनी परंपरा असल्यामुळे गणेशोत्सवात पालखी सोहळ्याचा मान या गणपतीला मिळाला आहे. हा मानाचा गणपती म्हणूनही ओळखल्या जाते. दर वर्षी पालखीत बसून गणेशाची भजनी मंडळ तसेच ढोल ताशे, बँडच्या निनादात सांस्कृतिक पद्धतीने मिरवणुक काढली जाते. त्यामुळे सर्व गावात आनंदात रममाण होतात. वैशिष्ट म्हणजे हा गणपती विसर्जित न करता भाविक भक्तांना दिला जातो व त्याच्या घरी विधिवत पूजा करून मांडला जातो. अशा प्रकारे अत्यंत जागृत अवस्थेत व पावित्रतता टिकुन राहिल्यामुळे उपासकाला गणेशाचे आशीर्वाद मिळुन चांगले फळ मिळते. अनेक भाग्यवंताचा कायापालट झालेला आहे. तसेच कित्येक भक्तांना चांगली अनुभूती मिळाली आहे. त्यामुळे अनेकांनी देणगी स्वरूपात मंदिराला हातभार लावला आहे. आज हे मंदिर खाजगी असून, मालक प्रकाश वासुदेवराव पांडे व पांडे परिवार हे आहेत.