मनोकामना पुर्ण करणारा सिद्धीविनायक

    दिनांक :05-Sep-2019
 
 
 
चंद्रकांत लोहाणा
वाशीम,
वाशीम शहरातील गणेशपेठ भागामध्ये अतिशय पुरातन काळापासून सिद्धी विनायक मंदिर असून, श्री सिद्धीविनायकाची मनोभावे पुजा केल्यास आपली मनोकामना पुर्ण होते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. गणेशोत्सव काळात याठिकाणी शहरासह दुरवरुन भाविक दर्शनासाठी व नवस बोलण्यासाठी येतात.
श्री च्या मंदिरात उजव्या सोंडेची 3 फुट उंचीची प्राचिन मनमोहक मुर्ती विराजमान आहे. 1930 मध्ये या मंदिराचा जिर्णोद्वार करुन सभागृह बांधण्यात आले होते. मंदिरात संकष्ट चतुर्थी, अंगारिका चतुर्थी, गणेश जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो. संकष्ट चतुर्थीला भावीकांची प्रचंड गर्दी असते. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुतीर्थला श्री सिद्धीविनायकाची बरसगाठ म्हणजे वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी श्री ला अभिषेक करुन सायंकाळी भजन, किर्तनाच्या कार्यक्रमाची परंपरा आजही कायम आहे.
गणेशोत्सव काळात मंदिरामध्ये श्री गणेशोत्सव साजरा केला जातो. आजही श्री गणेशोत्सवाची मुर्ती ही सिद्धविनायकासोबत असते. पारंपारिक पद्धतीने ही मुर्ती तयार करण्याचा मान माहुरवेश येथील लोलुरे परीवाराकडे आहे. वाजतगाजत श्री गणोशाचे स्वागत करुन दहा दिवस उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जातो. गणेस्थापनेपासुन दहा दिवस मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी दर्शनासाठी असते. या सिद्धीविनायकाचे दर्शनाने आपल्या मनोकामना पुर्ण होतात. आपल्यावरील संकटे टळून भरभराट होते. या श्रध्देमुळे भाविक दुरवरुन दर्शनासाठी येत असतात.