औचित्य शिक्षक दिनाचे...

    दिनांक :05-Sep-2019
मीरा टोळे 
भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस. हा दिवस त्यांना आदरांजली वाहण्याकरिता म्हणून संपूर्ण देशात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या शिक्षकांचा गौरव केला जातो. डॉ. राधाकृष्णन्‌ यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. 

 
 
देशाची नवी पिढी घडविण्यात शिक्षकांचा मोठा सहभाग आहे. समाजात वावरताना शिक्षणाबरोबरच त्या व्यक्तीवर झालेले संस्कारच तिची योग्यता ठरवितात. 25 ते 30 वर्षांपूर्वीचे शाळा-कॉलेजातील वातावरण आणि आजचे वातावरण यात खूप तफावत आहे. पूर्वी मुलाला, मुलीला शाळेत घातले की आई-वडील निश्चिंत असायचे. इतका अतूट विश्वास शिक्षकांवर असायचा. शिक्षकही तितक्याच पोटतिडकीने शिकवत असत. आपला विद्यार्थी हा जणूकाही आपलाच मुलगा आहे, या जिव्हाळ्याने ते त्याच्याकडे लक्ष देत. विद्यार्थीसुद्धा गुरू म्हणून शिक्षकांचा आदर करीत.
 
आता मात्र वातावरण थोडे बदलले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही व्यावसायिकता आली आहे. मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. यामुळे गुरू-शिष्यपरंपरा कमी होऊन आता ते एकमेकांशी मैत्रीने, सलगीने राहतात, वागतात. असे राहणे िंकवा वागणे वाईट नाहीच, परंतु यात दोघांनाही आपल्या कार्याची, मर्यादेची जाणीव असायला हवी.
 
शिक्षक फक्त बौद्धिक शिक्षा देत नाही, तर मुलांचा सर्वांगीण विकास करण्यात आई-वडिलांप्रमाणेच त्यांचाही मोठा सहभाग असतो. आज शैक्षणिक क्षेत्रात गुरू-शिष्यपरंपरेला तडा जाणार्‍या अनेक घटना रोज वर्तमानपत्रांतून वाचायला मिळतात.
 
शिक्षकांनी आपली लक्ष्मणरेषा ओळखून काम करावे, तर विद्यार्थ्यांनीही आपल्या मर्यादा ओळखून शिक्षकांशी वागावे. राधाकृष्णन्‌ यांनी शेवटपर्यंत आदर्श शिक्षक म्हणून आपली ओळख जपली. एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वत:ची जगाला ओळख करून दिली. कुशल व्यक्तिमत्त्व व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. ज्याप्रमाणे ओल्या मातीला कुंभार आकार देऊन त्याच्या सुबक वस्तू बनवतो, त्याचप्रमाणे एका शिक्षकामध्ये भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीअर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य असते. तेव्हा शिक्षक दिन हा फक्त विविध कार्यक्रमांनी साजरा करण्याचा दिवस नसून, तो विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. असे झाल्यास शिक्षक दिन साजरा करण्याचा उद्देश निश्चितच सफल होईल...