हरयाणात पुन्हा मनोहरलालच बाजी मारणार!

    दिनांक :05-Sep-2019
दिल्ली वार्तापत्र
शामकांत जहागीरदार 
 
ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड या तीन राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या तीनही राज्यांत सध्या भाजपाची सत्ता आहे, त्यामुळे भाजपासमोर या तीन राज्यांतील सत्ता कायम राखण्याचे, तर काँग्रेससमोर सत्ता खेचून आणण्याचे मोठे आव्हान आहे.
 
या तीनही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नाही. 15 सप्टेंबरपर्यंत या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. हे पाहता या तीनही राज्यांत विधानसभा निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजधानी दिल्लीला लागून असलेल्या हरयाणातही विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. हरयाणाला अस्थिर राजकीय परिस्थितीचा आतापर्यंत शाप लाभला होता. 2005 मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर राज्याला स्थैर्य लाभायला सुरुवात झाली, मुख्यमंत्री पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू लागले. त्याआधी अपवाद वगळता मुख्यमंत्री पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकत नव्हते. यावेळी भाजपाचे मनोहरलाल खट्टर यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राज्यात तीन-चार वेळा राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली होती. देशात आयाराम-गयाराम संस्कृती हरयाणातूनच सुरू झाली. ठोक भावात पक्षांतर हरयाणातूनच सुरू झाले. मुख्यमंत्र्याने आपल्या सरकारसकट पक्षांतर करण्याचा विक्रम हरयाणातच घडला होता.
 

 
 
2014 मध्ये भाजपाने काँग्रेसच्या ताब्यातील हे राज्य हिसकवून घेतले. 90 सदस्यीय हरयाणा विधानसभेतील 47 जागा भाजपाने जिंकल्या. भारतीय राष्ट्रीय लोकदलाला 19, तर काँग्रेसला 15 जागा मिळाल्या. हरयाणा जनहित काँग्रेसला 2, तर शिरोमणी अकाली दल आणि बसपाला प्रत्येकी एक जागा मिळाली. पाच ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले.
 
2014 च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपाचा विजय अभूतपूर्व असा होता. कारण त्याआधी भाजपाला फक्त चार जागा मिळाल्या होत्या. भाजपाचा प्रवास चार जागांवरून 47 जागांपर्यंत झाला होता. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाचे होते. कारण त्यावेळी भाजपाने महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणातही आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. भाजपाला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली.
 
2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 40 जागा जिंकल्या होत्या. भारतीय राष्ट्रीय लोकदलाला 31 जागा मिळाल्या होत्या. तिसर्‍या क्रमांकावर 7 अपक्ष उमेदवार होते. हरयाणा जनहित काँग्रेसला 6 जागा मिळाल्या होत्या. भाजपाला फक्त चार जागांवर समाधान माानावे लागले होते. बसपा आणि शिरोमणी अकाली दलाला प्रत्येकी एक जागा जिंकता आली होती. काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तरी त्याला सरकार बनवण्यासाठी 6 जागा कमी पडल्या. अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने काँग्रेसने सरकार स्थापन केले. काँग्रेसचे भूपिंदरसिंह हुडा दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले. याआधी पहिल्यांदा ते 5 मार्च 2005 ला मुख्यमंत्री झाले होते. राज्यात सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान याआधी भजनलाल यांच्या नावाने होता. 29 जून 1979 ते 22 जानेवारी 1980 या काळात जनता पक्षाचे नेते म्हणून भजनलाल मुख्यमंत्री होते. 22 जानेवारी 1980 ते 5 जुलै 1985 या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून भजनलाल यांनी मुख्यमंत्रिपद भूषवले.
 
बनारसीदास गुप्ता यांनी दोन कार्यकाळात 569 दिवस राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले, पण त्यांचे दोन कार्यकाळ सलग नव्हते. मनोहरलाल खट्टर यांच्या रूपात भाजपाला राज्यात प्रथमच मुख्यमंत्रिपद मिळाले. आता सलग दुसर्‍यांदा त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. कारण भाजपा यावेळी राज्यातील विधानसभा निवडणूक खट्टर यांच्या नेतृत्वातच लढवणार आहे. विशेष म्हणजे हरयाणाचे राजकारण काही वर्षांपर्यंत ‘तीन लाल’मध्येच फिरत होते. देवीलाल, भजनलाल आणि बन्सीलाल हे ते तीन लाल होते. हे तीनही लाल हरयाणाच्या राजकारणात अतिशय प्रभावी होते. या तीन लालांचा प्रभाव मोडून काढत 2014 मध्ये मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री झाले.
 
हरयाणातील लालांच्या राजकारणाचा प्रारंभ सर्वप्रथम बन्सीलाल यांनी केला. 22 मे 1968 ला बन्सीलाल सर्वप्रथम हरयाणाचे मुख्यमंत्री झाले, ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून. त्यानंतर जनता पक्षाचे नेते म्हणून देवीलाल यांनी 21 जून 1977 ते 28 जून 1979 असे दोन वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळले.
 
5 जुलै 1985 ला बन्सीलाल दुसर्‍यांदा काँग्रेसतर्फे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 17 जुलै 1989 ला जनता दलातर्फे देवीलाल दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले. 1987 ते 1991 या काळात काँग्रेस राज्यात सत्तेबाहेर होती. 23 जुलै 1991 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे भजनलाल तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले. 11 मे 1996 ला हरयाणा विकास पार्टीचे नेते म्हणून बन्सीलाल तिसर्‍यांदा हरयाणाचे मुख्यमंत्री झाले. हरयाणात देवीलाल यांनी दोनदा तर भजनलाल आणि बन्सीलाल यांनी प्रत्येकी तीनदा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. देवीलाल यांचे पुत्र ओमप्रकाश चौटाला यांनी भजनलाल आणि बन्सीलाल यांचा तीनदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम तोडला. चौटाला यांनी चारदा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. पण, मुख्यमंत्री म्हणून त्यांचा एकूण कार्यकाळ आपल्या वडिलांपेक्षा जास्त असला तरी भजनलाल आणि बन्सीलाल यांच्यापेक्षा कमी आहे. दोनदा मुख्यमंत्री असलेल्या हुडा यांच्यापेक्षाही चारदा मुख्यमंत्री राहिलेल्या चौटाला यांचा कार्यकाळ कमी आहे.
 
बन्सीलाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा 3 टप्प्यांतील एकूण कार्यकाळ 4633 दिवसांचा होता. त्यानंतर भजनलाल यांचा तीन टप्प्यांतील कार्यकाळ 3952 दिवसांचा, तर हुडा यांचा मुख्यमंत्रिपदाचा दोन टप्प्यांतील कार्यकाळ 3329 दिवसांचा होता. चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवणार्‍या ओमप्रकाश चौटाला यांचा कार्यकाळ 2245 दिवसांचा होता. यातही चौटाला यांचा मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या तीन टप्प्यांतील कार्यकाळ हा अतिशय अल्प होता. पहिल्यांदा 172 दिवसांचा, दुसर्‍यांदा 6 दिवसांचा, तर तिसर्‍यांदा 16 दिवसांचा होता. चौटाला यांचा मुख्यमंत्रिपदाचा चौथा कार्यकाळ 2051 दिवसांचा म्हणजे समाधानकारक होता.
 
हरयाणातील देवीलाल, भजनलाल, बन्सीलाल आणि मनोहरलाल हे चार लाल आणि एक हुडा सोडले तर भागवतदयाल शर्मा, राव बिरेंदरसिंग आणि हुकुमसिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. भागवतदयाल शर्मा 143 दिवस, राव बिरेंदरसिंग यांनी 224 दिवस, तर हुकुमसिंह यांनी 248 दिवस मुख्यमंत्रिपद सांभाळले. राज्यातील येती विधानसभा निवडणूक भाजपा विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्‌टर यांच्या नेतृत्वातच लढवणार आहे. खट्टर यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात जनआशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेला राज्यातील जनतेचा विशेषत: शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या यात्रेदरम्यान खट्टर यांनी राज्यातील शेतकर्‍यांचे सहकारी बँकेच्या कर्जावरील व्याज आणि दंडाची राशी मिळून 4750 कोटी रुपये माफ करण्याची घोषणा केली.
 
याचा फायदा राज्यातील 13 लाख शेतकर्‍यांना मिळणार आहे. राज्यात शेतकर्‍यांची संख्या निर्णायक आहे. निवडणुकीचा निकाल फिरवण्याची ताकद शेतकर्‍यांमध्ये आहे. त्यामुळे या आघाडीवर खट्टर यांनी बाजी मारली आहे. राज्यातील परिस्थिती खट्टर आणि भाजपाला पूर्णपणे अनुकूल आहे. कारण राज्यात विरोधी पक्षच नाही, काँग्रेस पक्ष अंतर्गत संघर्षाने पोखरला आहे. भूपिंदरसिंह हुडा यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला धाब्यावर बसवून स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले आहे. जे पंजाबमध्ये झाले, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता हरयाणात होत आहे. आपल्याला काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले नाही, तर नवा पक्ष काढण्याची धमकी हुडा यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपाचे मनोहरलाल खट्टर यांना यावेळी सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्याचा भजनलाल आणि भूपिंदरसिंह हुडा यांचा विक्रम तोडण्याची संधी आहे. मतदारांच्या मनातही यापेक्षा वेगळे काही नाही. 
 
9881717817