बाप्पांचे आवडते मोदक...

    दिनांक :05-Sep-2019
प्रमोदिनी निखाडे
 
देश असो वा विदेश, सर्वत्र लाडक्या बाप्पांचे स्वागत उत्साहात, जल्लोषात केले जाते. ढोल-ताशांचा गजर, आरतीचे बोल, घंटांचा नाद, रोजच्या कंटाळवाण्या दिनचर्येत काही दिवस मनाला शांतता आणि शरीरात नवचैतन्य प्रदान करते. दूर्वांची जुडी, मोदकांचा प्रसाद हे वातावरण सर्वत्र आनंददायी ऊर्जानिर्मिती करते. गणपतीबाप्पांच्या आवडीचे मोदक लाडक्या बाप्पाला अर्पण करण्याची लगबग असते. मोदक म्हणजे बाप्पाच्या नैवेद्यातील अत्यंत अप्रतिम प्रकार आहे. मोदक असल्यास खमंग, खुसखुशीत आवरण आणि उकडीचे असल्यास मऊ आवरण, असा मोदकांचा प्रकार आहे; तर काही विना आवरणाचे लाडूसारखे मोदकांच्या आकाराचे असतात. अशा या मोदकांच्या विविध प्रकारांपैकी आज आपण खाण्याचे रंग वापरून एकाच मोदकामध्ये तीन रंग वापरणार आहोत. यात आपण मोदकाच्या आवरणाध्ये तीन रंगांची पाती तयार करणार आहोत. पातीला रंग देत असल्याने पातीच्या आतले सारण साधे, आपण आपल्या आवडीनुसार खोबर्‍याचे, तिळीचे, पुरण इत्यादी घालून मोदक वळून तयार करू शकतो. 

 
 
तीन रंगांच्या पातीचे मोदक
तीन रंगांच्या पातीचे मोदक तयार करण्याकरिता आपण पाती कशी तयार केली जाते, ते पाहू या. याकरिता लागणारे साहित्य : एक कप बारीक रवा, पाव कप दूध (दुधाचा वापर गरजेनुसार करावा, कमीत कमी दुधाचा वापर करून घट्‌ट गोळा तयार करवा), पाव कप तूप, चवीनुसार मीठ, खाण्याचा रंग (आवडीनुसार) तीन कुठलेही रंग वा एक पाती पांढरी ठेवून दोन रंग वापरू शकता).
बारीक रवा चाळून स्वच्छ भांड्यात घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून रवा मिसळून घ्यावा, रव्यामध्ये थोडे-थोडे करत दूध घालून घट्‌टसर रव्याचा गोळा तयार करून घ्यावा आणि एका हवाबंद डब्यामध्ये एका तासाकरिता मुरायला ठेवून द्यावा. एक तास रवा मुरल्यानंतर रव्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटे-छोटे गोळे करून टाकावे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्याला हळूहळू पाव कप तूप सोडून मऊसर होईस्तोवर फिरवून घ्यावे. गोळा मऊसर झाला की, त्याचे तीन भाग करावे आणि त्यात आवडीनुसार खाण्याचे रंग घालून गोळे तयार करून घ्यावे.
 
या गोळ्याच्या पोळ्या पातळसर लाटून त्यात एक चमचा कॉनफ्लॉवर व अर्धा चमचा तूप याचे मिश्रण दोन पार्‍यांच्या मध्ये लावावे. त्यावर एक पारी आणि पुन्हा एक पारी लावून पार्‍यांचा रोल तयार करावा. तिन्ही पार्‍यांचा घट्‌ट रोल करून लाटी तयार करून त्यात सारण भरून मोदक वळून घ्या.