सण उत्सवात वधारले फुलांचे भाव

    दिनांक :05-Sep-2019
 
 
उत्पादक समाधानी 
ग्राहकांच्या खिशाला कात्री
 
कारंजा लाड,
आपल्या संस्कृतीप्रमाणे नागपंचमीपासून सन उत्सवाला सुरूवात होते. ऋतुमानानुसार बदलत असणार्‍या सन उत्सवात मात्र, फुलांची नेहमीच गरज असते. तर मागणीप्रमाणे बाजारात फुल उपलब्ध करून देण्यासाठी व्यावसायिक सुध्दा प्रयत्नशिल असते. 2 सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरूवात झाली असंतांना फुलांचे भाव कमालीचे वधारले आहे. शिवाय यापुढेही फुलांचे भाव वाढतील असा अंदाज फुल व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
यावर्षी सुरूवातीला पाऊस उशिरा आल्याने तसेच त्यानंतर पावसात खंड पडल्याने शिवाय काही भागात अतिवृष्टी झाल्याने फुल उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम झाला. परिणामी फुलांची आवक घटली. त्यामुळे सध्या व्यावसायिकांना परजिल्ह्यातून फुले आणावे लागत आहे. परिणामी खर्चात वाढ झाली असून, फुलांचे भाव वाढलेले दिसून येत आहे. या आधीच्या तुलनेत 3 ते 4 पट फुलांचे भाव वधारल्याने शेवंती 200 ते 250 रूपये किलो, गुलाब 200 ते 250 रूपये प्रति शंभर, झेंडू 60 ते 70 रूपये किलो, गिलार्डीया 50 ते 60 रूपये किलो, निशीगंधा 200 ते 250 रूपये किलो, तर लिली 30 ते 40 रूपये बंडल याप्रमाणे सद्यपरिस्थितीत फुलांचे भाव असल्याने हारांच्या किंमती वाढल्या आहेत. उत्सवामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ हारांची आवश्यकता असतांना फुलांची उपलब्धता करून देण्यासाठी मात्र व्यावसायिकांची कसरत होत आहे.
बाजारात फुलांना चांगली मागणी असल्याने फुल उत्पादक शेतकरी सुखावला मात्र, बाजारपेठेतून व्यावसायिकापर्यंत फुलांची किंमत अधिक वाढत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत असल्याचे दिसत आहे. फुलांची किंमत वाढली असली तरीही सण उत्सवाच्या आवश्यकतेप्रमाणे ग्राहकांची संख्या वाढली असल्याचे मत फुल व्यावसायिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.