विद्युत प्रवाहाच्या झटक्याने श्वानासह माय-लेकाचा मृत्यू

    दिनांक :05-Sep-2019
सिंदी (मेघे) परिसरातील घटना : मृतक महिला ग्रा.पं. सदस्य
 
वर्धा : विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसल्याने सिंदी (मेघे) ग्रा. पं. सदस्य दीपाली सिद्धार्थ मेश्राम (४२) आणि दीपालीचा मुलगा रोहीत मेश्राम (२४) दोन्ही रा. हिंदनगर वॉर्ड क्रमांक २ तसेच एका श्वानाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सिंदी (मेघे) येथे घडली. माय-लेकाला विद्युत प्रवाहाचा झटका बसल्याचे लक्षात येताच विद्युत प्रवाह बंद करून दोघांनाही तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले. श्वानाला विद्युत प्रवाहाचा झटका बसल्याने त्याचा वाचविण्यासाठी रोहीत गेला. त्यालाही विद्युत प्रवाहाचा झटका बसल्याने त्याला वाचविण्यासाठी दीपाली गेल्या होत्या. अशातच त्यांनाही विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.