शोध... माणसातल्या माणुसकीचा

    दिनांक :06-Sep-2019
 
हरिराम येळणे
 
मानसा मानसा कधी व्हशील मानूस,
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस...
 
माणसा, तू कधी होशील माणूस? कशी ओळख पटवशील की मी माणूस हाय? जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याला माहीत नसते की माझा जन्म सुंदर पृथ्वीतलावर झालाय की माणुसकी हरवलेल्या जगात! बालवयात त्याला सगळीच नाती सारखी वाटतात. पण, जसजसा मोठा होत जातो तसतसा त्याला खरे-खोटे, चोरी-लबाडी इत्यादी गोष्टीचा परिचय होतो व तोही हरविलेल्या माणुसकीच्या माणसात मिसळतो.
 
आज माणसातल्या माणुसकीचा कुठेतरी लोप झालेला आहे. खराखुरा माणूस अस्तंगत झाला आहे. आता उरला आहे तो माणसाच्या रूपात दानव. प्रत्येक क्षेत्रात, परिसरात, कुटुंबात, प्रत्येकाला परिचय द्यावा लागतो की मी डॉक्टर आहे, मी शिक्षक आहे, मी नेता आहे, मी इंजिनीअर आहे, काय गरज आहे आपली ओळख करून द्यायची? त्याची ओळख त्याच्या चांगल्या कार्यानी झाली पाहिजे. पण नाही. माणसाला स्वार्थीपणाच्या, मीपणाच्या रोगाने ग्रासलेले आहे. तो विसरून जातो की, या जगाच्या पाठीवर मला अगदी मोजकेच जीवन घालवायचा आहे. माझ्यानंतर ही सत्ता कुणीतरी गाजवणार आहे. पण तो विसरतो आपल्या कर्तव्याला की माणुसकीला. 
 
 
एका दवाखान्यात एक गरीब रोगी उपचारासाठी जातो. पैसे कमी असल्यामुळे डॉक्टर त्याला, पैशाची व्यवस्था करा नंतरच ऑपरेशन होईल म्हणून सांगतो. पण, गरिबीने त्रस्त झालेला माणूस पैशाची चणचण असल्यामुळे तिथेच जीव सोडतो. यावरून डॉक्टरच्या कर्तव्याचा परिचय-माणसातली माणुसकी हरवलेली आहे. नेत्रदोष असलेला माणूस नेत्रोपचार करण्यासाठी जातो. औषध घेतो. पण, औषधीमध्ये भेसळ असते आणि यामुळे त्याला कायमचे अंधत्व येते. ही भेसळ कोण करतो? अर्थातच या मानवात दडलेला दानव! शाळेत विद्यार्थ्यांना पोषणआहार येतो. त्यावर आपण सत्ता गाजवीत फिरतो. पण तांदूळ, डाळ, तिखट हे कधी तपासून बघण्याची गरज वाटत नाही की, हा पोषणआहार पोषक आहे की नाही...
 
शासन चांगल्या योजना प्रत्येकासाठी राबविते. पण, त्या कुयोजना करण्याचे कार्य मानवरूपी दानव करतो. कशासाठी? तर थोड्या पैशासाठी, स्वार्थासाठी. म्हणून गरज आहे माणसातल्या माणुसकीचा शोध घेण्याची. प्रत्येक माणसाने दुसर्‍या माणसाचा विचार करावा, आदर करावा. आपण अनेकदा म्हणतो, अरे, माणसासारखा वाग जरा. येथे माणसासारखा वाग म्हणजे, मानवी जीवनमूल्यांच्या आधाराने जग. माणसासारखे जगणे म्हणजे कसे जगणे? कोणी त्रास देऊ नये, वेदना देऊ नये, सन्मानाने वागावे, अपमान करू नये, कोणाला वेदना देऊ नये, स्त्रीला कधी कमी लेखू नये, दीनदुबळ्यांचा कधी गैरफायदा घेऊ नये... अशा मूल्यांच्या आधारे जगतो त्या माणसातल्या माणुसकीचा शोध घेणे गरजेचे आहे.
 
आजच्या प्रगत काळातही माणसाची कृती अनेकदा दानवाला लाजवणारी असते. स्वतःला मूल व्हावे म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी निष्पाप बालकांचे बळी देणारे राक्षस आजच्या प्रगत राष्ट्रात आहेत. आपला बचाव व्हावा यासाठी दुसर्‍याला बदनाम करणारे लोक इथे सन्मानाने जगतात. पण, लक्षात येत नाही या विज्ञानयुगातही, या प्रगत राज्यात स्वतःला माणूस म्हणून कसे घेतात? आपण माणूस असतानाही दुसर्‍याला गुलामासारखे राबवणारे, जमीनदार, सावकार, दुकानदार यांच्यातला माणूस खरोखर जिवंत आहे का? सत्ता स्पर्धेच्या लोभापायी माणूस अण्वस्त्रासारख्या भयंकर अस्त्राची निर्मिती करून क्षणार्धात संहार करण्यासाठी, विचार न करता निरपराध लोकांची, शाळकरी मुलांची हत्या करतो. अशी माणुसकी हरवून बसलो आहेत. हा माणुसकीचा दुष्काळ का पडावा? का पडत असावा? याचा विचार करण्याची गरज आहे.
 
स्वार्थासाठी रक्ताचे नाते, भावा-बहिणीचे, माय-लेकराचे, गुरूशिष्याचे व इतरही नात्यातली माणुसकी का लोप व्हावी? अनेकदा माणूस दुसर्‍यास उपदेश करतो, पण स्वतः तसे आचरण का करत नाही? सर्व भेदभाव विसरून माणसुकी स्वीकारावी, तरच चांगल्या कार्याचे प्रतिसाद उमटू लागतील. माणसाकडे विद्येचा मिळालेला फार मोठा ठेवा आहे. तो घेऊन माणूस प्रगतीच्या पथावर पुढेपुढे जाऊ शकतो, पण माणुसकीने वागला तर.
 
जगेल इमाने इतबारे, चकाकेल तारांगण...
जर ईर्ष्या स्वार्थ ठेवील रे मन,
होईल कवडी मोल रे जीवन...
 
यासाठी माणसा, तू माणूस म्हणून, देशाचा एक कर्णधार, देशनिर्माता म्हणून वाग व जगाचे सारेच लक्ष तुझ्या सत्कार्याकडे लागू दे आणि खरा शोध घे, शोध लागू दे त्या माणसातल्या माणुसकीचा व चाचपून बघ आपले अंतर्मन...