कुटुंब एक भावना!

    दिनांक :06-Sep-2019
मधुकर चुटे
 
आज विज्ञान-तंत्रज्ञानाचा वेग इतक्या प्रचंड प्रमाणात आहे, की- संपूर्ण जग एकमेकांच्या जवळ आणण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे, यात शंका नाही. पण, आज जग काय किंवा व्यक्ती काय, ही एकमेकांच्या जवळ जरी आली असली, तरी ती मानसिकदृष्ट्या एकमेकांपासून तितकीच दूर आहे, असे दिसून येते. जग हे जरी एक कुटुंब आहे, तरी इथपासून ते प्रत्येक कुटुंबातल्या विसंवादापासून काहीशी नकारात्मक परिस्थिती असल्याचे पाहायला मिळते. संयुक्त राष्ट्र संघाने कुटुंब दिवस घोषित करण्यामागचा उद्देश हा होता, की- समाजातल्या कुटुंबाविषयक धारणा अधिक बळकट व्हाव्यात. कारण कुटुंब हाच सगळ्या समाजाचा एक मोठा आधारस्तंभ असतो. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे कुटुंब किंवा परिवार असतो. त्यावेळेस आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ-बहीण अशा एका विशिष्ट नातेसंबंधांचा समावेश होतो. अर्थातच कुटुंबाचा विचार करताना आणि नातेवाईकही त्यात समाविष्ट होऊ शकतात. मग त्यात अगदी काका काकू किंवा आत्या, मावशी यांचाही अंतर्भाव करता येऊ शकेल, परंतु प्रामुख्याने कुटुंबाच्या व्याख्येमध्ये आई-वडील आणि भाऊ-बहीण, आजी-आजोबा अशांचा हमखासपणे विचार केला जातो.

 
 
कुटुंबाची ही घट्टपणे केलेली रचना ही त्या त्या व्यक्तीसाठी पोषक तर असतेच, परंतु समाजाचीच विणदेखील त्यानिमित्ताने घट्ट यासारखी राहते. एकमेकांना भावनिक किंवा मानसिक आधार देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होत असतो. कुटुंब अधिक भक्कम असेल आणि त्यांच्यामध्ये एकोप्याची भावना असेल तर त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली राहते. या एकूणच समाजव्यवस्थेचा विचार करताना कुटुंब हा घटक महत्त्वाचा मानला जात असताना त्याचे लाभही तितकेच मोठे असल्याने ही कुटुंब व्यवस्थासुद्धा तितकीच भक्कम राहावी, असा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे, असाही उद्देश त्यातून साध्य होतो.
 
भारतात प्राचीन काळापासून कुटुंब व्यवस्थेला प्रचंड महत्त्व दिले गेले आहे. तर या विरुद्ध पाश्चात्य जगतामध्ये कुटुंब व्यवस्थेला मुळापासूनच फारसे प्राधान्य दिले गेले नसल्याचे दिसून येते. विशेषत: विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यानंतर संपर्काची, संवादाची अनेकानेक साधने उपलब्ध झाल्यानंतर तसेच औद्योगिकीकरण आणि प्रचंड नागरीकरणामुळे कुटुंब व्यवस्थेला बरेच मोठे धक्केही बसल्याचे पाहायला मिळते.
 
आज संपूर्ण जगातल्या कुटुंब व्यवस्थेचा विचार केला तर आशादायक चित्र दिसत नाही. उलट प्रत्येक कुटुंबाची वाताहत होतानाच पाहायला मिळते. लोकसंख्या नियंत्रणाच्या परिणामांपासून मर्यादित कुटुंब ही संकल्पना समाजात रुजवली जात आहे. लहान कुटुंबातही सुंसंवादाची परिस्थिती शिल्लक राहिलेली दिसत नाही. अनेक युरोपीय राष्ट्रांमध्ये ‘फॅमिली’ या शब्दाचाच लोप होईल की काय, असे वाटू लागले आहे. कारण लग्नानंतर पुढच्या पाच ते दहा वर्षांतच होणारे घटस्फोटाचे प्रमाण पहिले तर आश्चर्याचा धक्का बसतो आणि अशा विभक्त झालेल्या जोडप्यांची मुले; आई-वडिलांच्या प्रेमाशिवाय किंवा नातेवाईकांच्या प्रेमाशिवाय लहानाचे मोठे होतात.
 
कुटुंब म्हटल्यानंतर स्नेह, प्रेम किंवा एकमेकांमधील भक्कम असा सुसंवाद अभिप्रेत असतो. आज ही परिस्थिती पाश्चात्य देशांमध्ये राहिलेली दिसत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये जगातल्या जवळपास ऐंशी देशांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात पुढे आलेली दिसते आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघाला कुटुंब दिनासारखे उपाय शोधून काढावे लागले आहेत.
 
कुटुंब व्यवस्था भक्कम करण्यासाठी किती उपयोग झाला हाही संशोधनाचा विषय ठरू शकतो. भारतासह आणि देशातील सामाजिक परिस्थिती पहिली तर एकूणच या कुटुंब व्यवस्थेला नवनवे तडाखे बस्तान दिसतात. भौतिक किंवा तात्पुरती भावनिक गरजांसाठी एकत्र येणे हाच प्रमुख उद्देश दिसून येतो. प्रदीर्घ काळ एकमेकांच्या प्रेमळ सहवासात राहून एकमेकांना साहाय्यभुत होण्याची आंतरिक जाणीव नाहीशी होताना दिसून येते. त्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. कुटुंब व्यवस्था टिकवण्याचे आणखी ठोस उपाय योजले गेले पाहिजेत. एकाच रक्ताची नाती एकमेकांच्या उपयोगी पडत नसतील, म्हणजे त्यांच्यामध्ये झिजण्याची प्रवृत्ती शिल्लक राहत नसेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. त्यामुळे त्याचा परिणाम हा त्या त्या देशावर होत असतो.
 
आज आपल्याकडे संपर्काची नवनवीन साधने उपलब्ध झाली आहेत. प्रत्येकांच्या हातात आता मोबाईल असतो. त्या त्या कुटुंबातला कोणताही नातेवाईक जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात असेल, तरी सहज संपर्क साधने अगदी सोपे झाले आहे. त्या सहज यंत्रणेमुळे सुसंवाद नाहिसा झाला आहे. त्यामध्ये फक्त औपचारिकताच असल्याचे दिसून येते.
 
एकेकाळी आपला भारत देश हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून गौरवला जात होता. शंभर- शंभर जणांचे एकत्र कुटुंब, शंभर- शंभर वर्षे टिकून राहण्याचा विक्रमही याच देशाने अनुभवला आहे. काळाच्या ओघामध्ये कुटुंब नियोजन हा प्रकार आल्याने केवळ कुटुंब नियंत्रण एवढाच त्याचा अर्थ राहिलेला दिसतो. कुटुंबाच्या नातेसंबंधांचे नियोजन होऊ शकले नाही. नागरीकरणामुळे शहरामध्ये आलेली अनेक कुटुंबे जागेच्या कारणास्तव विभक्त होऊ लागली आहेत. काळाचा दबाव एवढा होता की महागाई किंवा आर्थिक क्षमता नसल्याने अनेक कुटुंबावर नाइलाजाने विभक्त होण्याची वेळ आली आहे. भौतिक सुखांची मुबलकता आणि त्यातून पैसे या प्रकाराला प्राप्त झालेले प्रचंड महत्त्व याच नातेसंबंधावर किंवा कुटुंब व्यवस्थेवर खूप मोठा परिणाम करणारे ठरले आहे. सहाजिकच विज्ञान तंत्रज्ञानाने संपर्काचे माध्यम उपलब्ध करून दिले असताना त्याचा उपयोग सुसंवादासाठी होऊ शकला नाही.