थकवा येत असेल तर...

    दिनांक :06-Sep-2019
दररोजच्या धावपळीत अनेकांना थकवा येतो. धावपळ, दगदगीमुळे हा थकवा येत असेल असं वाटून दुर्लक्ष केलं जातं. पण सततचा हा थकवा काही गंभीर विकारांचं लक्षण असू शकतो. सततच्या थकव्यामागच्या कारणांविषयी... 
 
 
ॲनिमिया हे सततच्या थकव्यामागचं महत्त्वाचं कारण असू शकतं. रक्तातल्या लाल पेशी कमी झाल्या की थकवा जाणवतो. शरीरात विविध जीवनसत्त्वं आणि लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो. अंतर्गत रक्तस्त्राव तसंच इतर गंभीर आजारांमुळेही ॲनिमिया होऊ शकतो. गरोदर महिलांना ॲनिमियाची समस्या असू शकते.
  • •शरीरात थायरॉइड ग्रंथींचं संतुलन बिघडलं की थकवा जाणवू लागतो. अगदी थोड्या मेहनतीनेही आपण थकून जातो. हायपर थायरॉयडिझम आणि हायपो थायरॉयडिझम हे थायरॉइडचे दोन प्रकार आहेत.
  • मधुमेहाचं प्रमाण वेगाने वाढत आहे. थकवा हे मधुमेहाचं एक लक्षण असू शकतं. सततचा थकवा मधुमेहाकडे अंगुलीनिर्देश करतो. त्यामुळे मधुमेहाची चाचणी तातडीने करून घ्यायला हवी.
  • डिप्रेशन किंवा नैराश्य हे सुद्धा थकव्याचं एक कारण असू शकतं. नैराश्य ही फक्त मानसिक स्थिती नाही तर एक विकार आहे. नैराश्यामुळे रूग्णाची भूक, तहान, झोप यावर परिणाम होतो. नैराश्याची लक्षणं अनेक वर्षांपर्यंत दिसू शकतात. नैराश्याकडे दुर्लक्ष करू नये.
  • आर्थ्रायटिसमुळेही थकवा जाणवू शकतो. आर्थ्रायटिसची लक्षणं सुरूवातीच्या काळात फार दिसून येत नाहीत पण गुडघेदुखी हे आर्थ्रायटिसचं प्रमुख लक्षण असू शकतंं. आर्थ्रायटिसमुळे हाडं ठिसूळ होतात.
  • अशक्तपणा हे थकव्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं. थकव्यामुळे दैनंदिन कामांमध्येही अडचणी येऊ शकतात. शारीरिक विकार किंवा इतर कारणांमुळे अशक्तपणा येऊ शकतो.
  • सकाळी उठल्यानंतर ताजंतवानं वाटत नसेल किंवा पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवत असेल तर तुम्हाला स्लीप ॲप्नियाची समस्या असू शकते. झोपेदरम्यान काही क्षणांसाठी श्वास थांबणं म्हणजे स्लीप ॲप्निया. ही समस्या गंभीर स्वरूप धारण करते. घोरण्याची सवय असलेल्यांमध्ये ही समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. रात्री-अपरात्री दचकून उठणं, श्वासाची गती वाढणं ही यामागची लक्षणं असू शकतात.