विवाह की करिअर?

    दिनांक :06-Sep-2019
ममता तिवारी
 
काही महिन्यांपूर्वी टीव्हीवर, दिल्लीतील एका प्रसिद्ध महिला डॉक्टरची मुलाखत पाहिली. अविवाहित असल्यामुळेच आज मी या इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरपदाची धुरा समर्थपणे सांभाळू शकते, असे त्यांचे स्पष्ट मत होते. काही दिवस यावर विचार केला. विवाहित-अविवाहित मित्र-मैत्रिणींशी चर्चा झाल्या. त्यांचं हे विधान बहुसंख्यांना पटणारं वाटलं. अविवाहित असणार्‍यांना पारिवारिक जबाबदर्‍या कमी, त्यामुळे व्यवसायाकडे लक्ष देण्यास भरपूर वेळ, समीकरणानुसार यश अशा लोकांनाच अधिक मिळणार हे उघड. मात्र, विवाहित व्यक्ती यशस्वी होतच नाहीत असाही भाग नाही. शेवटी व्यावसायिक यश आणि व्यक्तिगत यश, या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. व्यवसायातले यश हे कौशल्यावर अवलंबून असते, तर व्यक्तिगत जीवनातील यश हे त्या व्यक्तीच्या मानसिकतेवरून ठरते. त्यामुळे विवाह आणि व्यवसाय किंवा करीअर यांच्या यशापयशाबद्दल सरसकटपणे एखादं विधान करता येणार नाही. मात्र, एखाद्या क्षेत्रात विशेष काही करण्याची मानसिकता काही स्त्री व पुरुष दोघांना लग्नसंस्थेपासून दूर नेते, हे खरं. 
 
  
पूर्वी स्त्रियांचं जीवन हे चूल आणि मूल इतकंच मर्यादित होतं. त्यामुळेच स्त्रीने बाल्यावस्थेत पित्यावर, युवावस्थेत पतीवर आणि वृद्धावस्थेत पुत्रावर अवलंबून असावे, असं म्हटलं जाई. एका जुन्या वचनानुसारही, ‘विनाश्रयेन न शोभते पंडिता, वनिता, लता।’ म्हणजेच विद्वान स्त्रिया आणि वेली या आश्रयाशिवाय शोभत नाहीत, असं म्हटलं आहे. मात्र, ‘परिवतर्र्न’ या जगाच्या नियमानुसार स्त्री आज आश्रिताही नाही किंवा शोभेची वस्तूही नाही. जगभरातील स्त्रियांनी स्त्री-पुरुष समतेचा जो लढा अनेक वर्षे दिला, त्याचं फळ म्हणून ती आज एक समर्थ व्यक्तीच्या रूपात जगाच्या क्षितिजावर उदयास आली आहे. अनेक राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुख, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सी.ई.ओ. आणि विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन शोध लावणार्‍या संशोधिका म्हणून ती जबाबदारीने कायर्र् करीत आहे. शिक्षणाने तिच्यात आर्थिक स्वावलंबनासोबतच आत्मविश्वास, जागरूकता व स्वत:ला सिद्ध करण्याचं आत्मभानही आलेलं आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत ती आपल्या बुद्धी व कौशल्याच्या बळावर यशस्वी होत आहे. या पृष्ठभूमीवर स्पर्धेच्या या युगात आपण कमी पडू नये, अशी अपेक्षा तिला स्वत:कडून आहे. मात्र, विवाहामुळे आपापल्या करीअरला न्याय देऊ शकणार नाही, ही शंकाही आहे. कारण विवाहामुळे स्त्रीचा अधिक वेळ व श्रम हे घरातच खर्ची होतात, त्यामुळेच मग ‘विवाह की करीअर?’ या संघर्षाचा जन्म होतो.
 
 
आज बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार बहुतेक मुलींना शिक्षण, करीअर व जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य पालकांकडून मिळत आहे. सासरकडील मंडळी समजूतदार असली की, अशा स्त्रीला संरक्षण व सहकार्य दोन्ही मिळून करीअरमधील संधींचा अधिक लाभ घेता येतो. काहींच्या बाबतीत तर विवाहानंतरच करीअरला गती मिळते. तसंही एकट्यानं एखादं कार्य करण्यापेक्षा दोघांनी मिळून काम केलं तर ते अधिक चांगलं होऊ शकतं. म्हणूनच स्त्री व पुरुषाला संसारथाची दोन चाकं म्हटले जाते. दोघेही कुटुंबात परस्परांना पूरक असं सहजीवन जगतात. वंशसातत्य व वंशविस्तार व्हावा, हा विवाहामागील नैसर्गिक, सामाजिक, धार्मिक आणि विज्ञानिक हेतू. विवाहसंस्थेमुळे हा हेतू तर साध्य होतोच, पण कुटुंबव्यवस्थाही बळकट होते. जबाबदारीचे विकेंद्रीकरण होते. मातृत्वामुळे वार्धक्यासाठी आधार मिळतो. तरुणपणी कुटुंबासाठी केलेल्या कर्तव्यातूनच हक्काची नाती आणि माणसं निर्माण होतात, जी उत्तरायुष्यात किंवा कठीणप्रसंगी पाठीशी उभी राहतात. त्यामुळे जीवन जगण्याचा सुलभ, सुरक्षित व सोपा मार्ग विवाहसंस्थेतूनच जातो. पण, नाही आवडत काहींना या मळलेल्या वाटेनं सहजपणे जाण्याचे तंत्र. संसाराच्या रामरगाड्याशी स्वत:ला जखडून घेणे त्यांना मान्य नसते.
 
 
कित्येक तरुण मुली आपल्या आयुष्याचं ध्येय आज स्वयंप्रेरणने निश्चित करीत आहेत. साहित्य, शिक्षण, संगीत, नाट्य, चित्रपट, प्रशासन, समाजसेवा, रुग्णसेवा, राजकारण, उद्योग, व्यवसाय या आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये त्या समर्थपणे एकट्याने वाटचाल करीत आहेत. बुद्धी आणि कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या जीवनसंघर्षात कुठेही कमी पडत नाहीत. व्यक्तिगत जीवनातही आनंदी आणि उत्साही असणार्‍या या स्त्रियांना आपल्या आयुष्यात काहीतरी अपूणर्र्ता आहे, अशी किंचितही जाणीव होत नाही. म्हणूनच विवाहाशिवाय स्त्रीजीवनाची पूर्णता होत नाही, हा एक भ्रांत समज आहे. कित्येक साहित्यिक, शास्त्रज्ञ, समाजसेवक आपल्या कार्यात इतके मग्न असतात की, विवाहासारखी पाऊलवाट त्यांना कधी दिसतही नाही आणि त्या वाटेला गेलं पाहिजे, असं वाटतही नाही. आपल्या ध्येयाप्रती समर्पित असणारी ही मंडळी म्हणूनच आपापल्या क्षेत्रात यशस्वी होतात.
 
 
 
मात्र, महिलांच्या अविवाहित राहण्यात काही धोकेही असतात. अविवाहित स्त्रीला पुरुषांपेक्षा अधिक समस्यांची आव्हानं पेलावी लागतात. सामाजिक अपप्रवृत्तीवर मात करण्याचा मानसिक खंबीरपणा दाखवावा लागतो. आपल्या विचारांच्या आणि ध्येयाच्या कक्षेत सुखेनैव वावरता येईल, हा भ्रम अविवाहित स्त्रीला घातक ठरतो. जग वाटते तितके वाईट नाही हे खरं असलं, तरी ते वाटतं तितके सरळ आणि चांगलं नाही, हेही खरं आहे. त्यामुळे अविवाहितपेक्षा विवाहित स्त्रीच्या भोवती संरक्षणाची िंभत अधिक मजबूत असते. या वास्तव परिस्थितीचं काटेकोरपणे आकलन तिने करून घेतलं पाहिजे. उतारवयात एकाकीपणालाही तोंड द्यावं लागतं. काही मिळवायचं असेल तर त्याची किंमतही चुकवावी लागते. त्यामुळे जीवनात ‘रिस्क’ ही असतेच. म्हणतात ना, ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है!’ त्यामुळे तरुणपणी केलेली कामगिरी आणि कर्तृत्व यांचे समाधान परतीचा प्रवास सुखी करू शकतो. जीवन सार्थकी लागल्याचा व मनाप्रमाणे जगता आल्याचा आत्मिक आनंद एकटेपणाच्या वेदनांना सुसह्य करतो.
 
भरल्या संसारातदेखील अनेक स्त्री-पुरुष मनाने एकाकीच असतात. विवाह करूनही एकट्यालाच दु:खाच्या संगतीत राहावे लागत असेल, तर विवाहामुळे जीवनाला पूर्णत्व येते, हे विधान निरर्थक ठरते. म्हणून कुठल्याही किमतीवर विवाह केलाच पाहिजे असं नाही. संसाराच्या पाशात अडकण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं श्रेष्ठ प्रतीचं कार्य करण्याची ओढ असेल, तर मनाचा कौल प्रमाण मानला पाहिजे. विवाह न करणे म्हणजे काही संन्यास घेणं नव्हे किंवा स्वैर वागणंही नव्हे. आपल्या निर्णयाने इतरांचं अहित होत नसेल, तर एखाद्या उच्च ध्येयासाठी विवाहासारख्या सामान्य गोष्टीला बाजूला सारणं काही वावगं ठरत नाही. विवाह आणि मातृत्व या अवस्था टाळूनदेखील जीवन आपल्या क्षेत्रात अधिक उदात्त, सृजनशील करता येतं. असंख्य दु:खी-पीडितांना मायेची ऊब देणार्‍या मदर टेरेसा, संगीताची आजीवन उपासना करणार्‍या गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गांधी-विनोबांचे विचार देशातच नव्हे, तर परदेशातही नेऊन रुजवणार्‍या मानवतेच्या अखंड उपासिका निर्मला देशपांडे यांचं जीवन परिपूर्ण नाही, असं म्हणण्याचा करंटेपणा करता येईल का? अर्थातच, प्रत्येकीला त्यांच्याएवढा नावलौकिक मिळेल असं नाही, मात्र आपल्या क्षेत्रात आपण केलेलं कार्य आपल्याला जरी आत्मिक आनंद देऊन गेलं तरी जीवनाचं सार्थक झालं, असं म्हणता येईल. अविवाहितपण हे कधी स्वेच्छेने असेल तर कधी परिस्थितीने, पण दोन्ही स्थितीत त्याला समर्थपणे पेलणे महत्त्वाचे. कारण शेवटी विवाह हे सर्वस्व नाहीच, ती केवळ एक पद्धती आहे जगण्याची. म्हणूनच पाडगावकर म्हणतात तेच खरं-‘‘पेला अर्धा भरला आहे, की पेला अर्धा सरला आहे, हे ज्याचं त्यानी ठरवायचं...’’