घर जोडणारे सणवार

    दिनांक :06-Sep-2019
अवंतिका तामस्कर  
 
सर्वच धर्मात, पंथात आणि समाजात विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. या सणांच्या निमित्ताने घराची स्वच्छता केली जाते, घराची रंगरंगोटी आणि देखभाल केली जाते. त्यामुळे घरात राहणार्‍या माणसांचा मायेचा हात त्या िंभतींवरून, जमिनीवरून फिरतो, त्याचा परिणाम घरातील वास्तू उजळून निघते. यासाठी अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष न करता मनाला आणि घराला आनंद देणारा पर्वकाळ म्हणून सणवार साजरे करावेत. 
 
 
 
सणवाराच्या निमित्ताने घरातील सर्व माणसे एकत्र येतात. आप्त, नातेवाईक, मित्रमंडळी जमतात. शेजारी जमतात आणि सगळ्यांना आनंद मिळत असतो. कळत नकळत दुखावलेली माणसे यामुळे जवळ येतात आणि प्रत्येकाची नकारात्मकता नष्ट होते. यासाठी सणवार करावेत. आपल्याकडे दर महिन्याला कोणता ना कोणता सण येत असतोच. चैत्र महिन्यात गुढीपाडवा येतो, रामनवमी येते, रामाचा नवरात्र, वसंतोत्सव, चैत्रागौर असते. त्यामुळे घरात साफसफाई होते, घरात सजावट होते, हळदी-कुंकू होते, भजन होते, कीर्तन होते, आलेल्या पाहुण्यांना डाळ, पन्हे, बत्तासे, काकडी असे थंड पदार्थ दिले जातात आणि कडक उन्हाळ्यांत सगळ्यांची मने शांत केली जातात. यानिमित्ताने घरी येणारे पाहुणे समाधान व्यक्त करतात आणि आशीर्वाद देतात. त्यामुळे नव्या वर्षाचे ऊर्जेचे चार्जिग होऊन घर सुखी-समाधानी होण्याची सुरुवात होते. हीच खरी वास्तुशांती असते. वास्तुशांती म्हणजे काही विधी, कर्मकांड नव्हे तर घरात येणारे सगळे हसतमुखाने राहणे.
 
 
वैशाख महिन्यात अक्षयतृतीया असते, यानिमित्ताने काही संकल्प होत असतात. शेतीच्या कामाला सुरुवात होत असते. उत्साहाचे वातावरण असते. ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठी पौर्णिमा, आषाढ महिन्यात आषाढी एकादशी, चातुर्मास, गुरुपौणिर्मा, श्रावण महिना तर सणवारांची रेलचेल असते, भाद्रपदात गणपती, अश्विन महिन्यात नवरात्र, दसरा कार्तिक महिन्यात दिवाळी, गुरुनानक जयंती, त्रिपुरी पौर्णिमा, देवदिवाळी, मार्गशीर्षात दत्तजयंती, पौष महिन्यात संक्रांत, माघ महिन्यात रथसप्तमी, महाशिवरात्र, फाल्गुन महिन्यात होळी, रंगपंचमी अशी सतत वर्षभर सणांची रचना असते. याशिवाय वाढदिवस, जयंती, उरुस, जत्रा असे सतत काही ना काही असते. इतर आयात केलेले सण असतात, ईद असेल, ख्रिसमस किंवा आजकाल साजरे केले जाणारे विविध ‘डे’पण यानिमित्ताने मनाला आनंद देणारे क्षण असतात. ते आपल्या घरात घडत असतात. त्याने माणसांप्रमाणेच वास्तूही तृप्त होत असते.
 
 
सणाच्या निमित्ताने दुरावलेली माणसे एकत्र येत असतात. एकत्र जेवणे होतात आणि दुरावे दूर होत असतात. आपल्याकडे असा समज आहे की, वास्तू पुरुष हा सतत ‘तथास्तू’, म्हणत असतो. घरात जर सतत भांडणतंटे, वादविवाद होत असतील, सुसंवाद होत नसेल तर त्या घरावर अवकळा येते. कित्येक घरांमध्ये पती-पत्नी, पिता पुत्र आणि घरातील सदस्यांचा एकमेकांशी कसलाच संवाद होत नसतो. अबोला असतो. एखाद्या लॉजवर सगळे जमतात, त्याप्रमाणे त्या घरात सगळे राहात असतात. अशा घरांवर एक प्रकारची अवकळा असते. प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला असेल तर अशा घरात ना कसला कुळाचार होतो, ना कसला समारंभ केला जातो. तिथले वातावरण कायम कोंदट झालेले असते. कारण कोणताही सण-समारंभ साजरा करायचा असेल तर सर्वानी मिळून तो साजरा केला जातो. एकटाच काहीच करू शकत नाही. त्यामुळे चार दिशेला तोंडे असलेली ही माणसे एका घरात राहूनही एकाकी पडतात. हे सण-समारंभ साजरा न केल्यामुळे, मनातील भावना व्यक्त न केल्याने होत असते. त्यामुळे घरातील माणसांना व्यक्त होण्यासाठी सण फार महत्त्वाचे असतात.
 
 
प्रत्येकाला गाण्याची आवड असते. प्रत्येकजण किमान गुणगुणत असतो. अगदी बाथरूम सिंगर तरी असतो. प्रत्येकजण लता, रफी, आशा होणार नसला तरी किमान घरातल्या देवापुढे आरती म्हणून तो आपली हौस पूर्ण करू शकतो. एखादे स्तोत्र मोठ्याने म्हणून आपला आवाज मोकळा करू शकतो. आपल्या व्यक्तिमत्त्वात आपला आवाज मोकळा करणे हे फार महत्त्वाचे असते. त्याचे सर्वात पहिले व्यासपीठ आपले घर आपले वास्तूच असते. आपल्या घरात आपण मोठमोठ्याने गाणी म्हटली, अगदी बेसूर आवाजात तरी कोणी आपल्याला थांबवत नाही; पण त्यानिमित्ताने आपण व्यक्त तर होत असतो. अशा प्रकारे भरपूर व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे सण-समारंभ साजरे केले जातात.
 
त्यामुळे घरातील वातावरण नेहमीच प्रसन्न राहते. घरातील सदस्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी ऊर्जा यातून मिळत असते. सणवारामुळे किंवा धार्मिक परंपरांमुळे जर आपल्या घरात सुसंवाद साधला जात असेल तर ते साजरे करून आपले घर आनंदी करण्यात काहीच गैर नाही, कसलीच अंधश्रद्धा नाही. जैन धर्मात पर्युषण पर्वात अखेरच्या दिवशी सगळे एकत्र जमून आपल्या भावना व्यक्त करतात. दिलगिरी व्यक्त करत असतात. कळत नकळत वर्षभरात माझ्याकडून कोणी दुखावले असेल, अपमानीत झाले असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो, असे जाहीर सर्वासमोर व्यक्त करून दुखावलेल्या माणसांना जवळ करतात. याला क्षमापना असे म्हटले जाते. यामुळे सगळे गैरसमज दूर होऊन पुढील वर्षभर सगळे आनंदाने काम करू लागतात. सणांच्या निमित्ताने आपण असेच एकमेकांना बोलावून दुरावा दूर करत असतो. म्हणून सण साजरे करावेत आणि आपले घर सुखी करावे. त्यामुळे प्रसन्न झालेला वास्तु हा माणसांना आनंद देत असतो.