आरास गौराईची!

    दिनांक :06-Sep-2019
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
गौराईच्या आगमनाची आतुरता सार्‍यांनाच लागून राहिलेली असते. जशी गणपतीच्या स्वागतास आतुरतात मनं अगदी त्याचप्रमाणे गौराईचं स्वागत करण्यासाठी महिलावर्गामध्ये कमालीचा उत्साह असतो.
 
गौराईची अनेक रूपं मनात ठसतात. गौरी आवाहनाला गौरीचं घरोघरी होणारं आगमन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा ठरतो. गौरीपूजनाच्या वेळी केली जाणारी गौरीची आरास, सजावट, भरला जाणारा ओवसा, गौरीचा नैवेद्य, खेळल्या जाणार्‍या फुगड्या व गाणी पाहता गौराईच्या स्वागताला सगळ्यांच्याच आनंदाचे भरते येते. 

 
 
काही ठिकाणी गौरीचे मुखवटे, तर काही ठिकाणी उभ्या स्वरूपात गौरी, तर काही बैठ्या स्वरूपात गौरीची आरास केलेली दिसून येते. यावेळी गौरीला दागदागिने, नवी साडी, मुकूट, नथ, केसांत फुलांची वेणी, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपतीच्या शेजारीच ही आरास केली जाते. याशिवाय वेगवेगळ्या कथानकांचे देखावे सादर केले जातात. काही पौराणिक कथा, तर काही समाजजागृतीविषयक देखावे सादर केले जातात.
 
 
गौरीचे मुखवटे बनविणे हे कलाकाराचे कसब असते. काही मुखवटे हे लाकडी स्वरूपात बनविलेले दिसून येतात, तर काही शाडूचे, प्लॅस्टर िंकवा फायबरमध्ये गौरीचे मुखवटे आणून त्यांचे पूजन केले जाते. पूर्वापार असलेले मुखवटे हे लाकडीस्वरूपात विशेषत: दिसून येतात. यावेळी गौरीच्या मुखवट्याच्या, मुकुटाच्या कलाकुसरीतून कारागिराचे कौशल्य दिसून येते. गौरी आवाहनाला गौरींचे आगमन होताना, माहेरवाशिणी गौरी आणतात. यावेळी वाजतगाजत होणारे गौरीचे स्वागत गणरायाबरोबरच उत्सवाचा थाट वाढवतात.
 
 
गणेशोत्सव काळातही गौराईच्या गीतांनी उत्साहाला उधाण येते. घरोघरी गौराईची सजावट, गौराईचं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसते. गौरी घरी येते, तेव्हा तिच्या स्वागतासाठी लहान-थोर सरसावतात. महिलांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येतो. उखाण्यांनी सजणारी गाणी, रंगणार्‍या फुगड्या असा एकच जल्लोष दिसून येतो.
 
 
काही ठिकाणी श्रीगणरायाशेजारीच गौरीचे पूजन केले जाते. ग्रामीण भागात विहिरीवरून पाण्याने कळशी भरून ती सवाष्ण बाईने डोक्यावर घेऊन घरी येईपर्यंत मूकपणाने यावयाचे असते. त्यानंतर गौरीचे स्वागत करून तिची यथासांग पूजा, आरती आणि नैवेद्य करून सार्‍या सुवासिनी, मुली मिळून फुगड्या खेळून गौराई जागवली जाते. तर काही ठिकाणी एक गाव एक गणपती अशी प्रथा दिसून येते. जेथे एक गणपती आणून गणरायाची आरास केली जाते. त्या ठिकाणी केवळ गौरी आणल्या जातात. मुंबईतही जी कुटुंबे नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाली आहेत त्या कुटुंबामध्ये गणेशोत्सव काळात गौरी आवाहनाला केवळ गौरी आणल्या जातात. यावेळी काही घरांमध्ये एक गौरी, तर काही ठिकाणी दोन गौरींची आरास केली जाते.
घरापासून काही अंतरावरून गौरीचे मुखवटे सुवासिनींमार्फत वाजतगाजत घरी आणले जातात. गौरीचे स्वागत करून घरामध्ये प्रवेशताना पावलांचे ठसे उमटवले जातात. गौरीला नवी कोरी साडी, हातात हिरवा चुडा, नाकात नथ, गळ्यातील दागिने, मंगळसूत्र परिधान करून गौराईची आरती करून भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर सार्‍या जणी मिळून फुगडी गीतांचा कार्यक्रम करून मोठ्या उत्साहाने गौराई जागवल्या जातात.
 
 
काही ठिकाणी गौरी आवाहनाला गौरीचे मूळस्वरूपात स्वागत केले जाते. हळदीची रोपे मुळांच्या स्वरूपात घरी आणून गौराईचे आगमन होते. गौराईचे जसे मुखवटे आणून गौराईचे पूजन केले जाते, तसेच काही ठिकाणी गौरीच्या उभ्या स्वरूपात मूर्ती साकारलेल्या दिसून येतात. लाकडी कलाकुसर केलेल्या, साडी, गळ्यातील मंगळसूत्र, हार, माणके आदी कलाकुसर केलेले दागिने, गौराईचा मुकुट, कानातील वेली, केसांतील गजरे, वेणी आदी कलाकुसरीने सजलेल्या गौराईच्या साड्या, विविध नक्षींनी केलेली सजावट गौरी-गणपतीच्या सणाचा उत्साह जागवणारी ठरते. परंपरेनुसार चालत आलेला रीतिरिवाज हा आजच्या नव्या पिढीसाठी नवखा असला तरी फुगडी, गीतांच्या मार्फत नव्या पिढीतील मुलींचा उत्साहही वाखणण्याजोगा ठरतो. गौराई घरी आल्यानंतर तिला सजवण्यासाठी, तिची आरास करण्यासाठी आजची पिढीही तितकीच उत्साहाने सहभागी होताना दिसते. फुगड्या खेळताना, फुगड्यांची गाणी गाताना नव्या पिढीतील मुलीही नऊवारी साड्या, पारंपरिक दागिने घालून तितक्याच आनंदाने या सणाचा आनंद जपतात.
 
 
गौराई जागवल्यानंतर उखाणी, झिम्मा-फुगड्या असे खेळ खेळल्यानंतर गौरी विसर्जनाच्या दिवशी गौराईला दही-भाताचा नैवेद्य तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विहीर, तळे, नदी, समुद्र आदी पाण्याच्या ठिकाणी गौराईचे विसर्जन केले जाते. गौरी विसर्जनाच्या दिवशी काही ठिकाणी गणेशविसर्जनही केले जाते. गौरी-गणपती उत्सवाच्या निमित्ताने जागला जाणारा उत्साह परंपरा, रीतिरिवाजाचा एक स्रोेत जपणारा ठरला आहे.