अहेरी उपविभागात मुसळधार पावसाने वाहतूक ठप्प

    दिनांक :06-Sep-2019
आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी,रहदारी झाली ठप्प, दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकली
अहेरी,
काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने अहेरी उपविभागात लोकांची तारांबळ उडालेली आहे. उपविभागातील पाचही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाली असून अल्लापल्ली-सोरोंचा मुख्य मार्गावर पाणीच पाणी असल्याने रहदारी ठप्प झाली आहे.
कमलापूर-छल्लेवाडा परिसरातील असंख्य गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहे. येथील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. रेपणपल्ली-कमलापूर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने सदर मार्ग बंद झाला आहे. एवढेच नव्हे तर कमलापूर येथील लहान तलाव तुडुंब भरला असून मुसळधार पाऊस सतत सुरू राहिल्यास तलावाचा पाणी गावात शिरणार आहे. एकूणच सर्व परिसर जलमय झाले असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे.
 
 
 
गडअहेरी जवळील नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने जवळपास वीस गावांचा संपर्क तुटलेला आहे तसेच जीमलगट्टा-देचलीपेठा रस्त्यावर असलेल्या नाल्याला पूल नसल्याने 25 ते 30 गावांचा संपर्क तुटला आहे.भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदी,आणि मुख्य रस्त्यावरील रपट्यावरून पाणी वाहत असल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद आहे.एटापल्ली तालुक्यातील खेड्यापाड्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. एकंदरीत मुसळधार पावसाने अहेरी उपविभागातील पाचवी तालुक्याला जबर फटका बसला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद असून रहदारी ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.