गडचिरोलीत पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेले,शाळांना सुट्टी

    दिनांक :06-Sep-2019
 
 
गडचिरोली, 
अतिवृ्‌ष्टीमुळे आलेल्या पुरात दोन नागरिक वाहून गेले आहेत,तर ठाणेगाव येथील १६ व अरततोंडी येथील शंभर जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू व पोलिसांना यश आले आहे. धानोरा तालुक्यातील निमगाव येथील रामदास मादगू उसेंडी आरमोरी तालुक्यातील मेंढा येथील नाल्याच्या पुरात आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास वाहून गेला, तर चामोर्शी तालुक्यातील पाविलसनपेठा येथील सुधाकर पोटावी हा इसम पोरनदीत वाहून गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील १९ नागरिक पुरात अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिसांनी त्यांना बोटीद्वारे सुरक्षितरित्या बाहेर काढले. कुरखेडा तालुक्यातील जुनी अरततोंडी येथील शंभर नागरिकांना सकाळी सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, तर अन्य शंभर जणांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
 
गोसेखुर्दचे दरवाजे उघडले  
गोसेखुर्द धरणाचे १९दरवाजे दीडमीटरने, तर १४ दरवाजे १ मीटरनेउघडण्यात आले असून, त्यातून ९२३४क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तब्बल १७ मार्ग बंद असल्याने हजारो गावांचा संपर्क तुटला आहे. 
 
शाळांना सुट्टी   
गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नदीला पूर आलेला आहे. तसेच जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पुराचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या सोबतच पुढचे दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ६ व ७ सप्टेंबर रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.