अवैज्ञानिक गोष्टी...

    दिनांक :06-Sep-2019
न मम  
 
 श्रीनिवास वैद्य 


आजच्या युगात तुम्ही जर प्राचीन भारतीयांच्या शास्त्रीय शोधांबद्दल किंवा त्यांच्या अद्भुत उपलब्धींबाबत बोलू लागले, तर आजचे कथित विज्ञानवादी या सर्व गोष्टींना भाकड कथा संबोधतील. आजच्या गणितीय सूत्रांमध्ये या तुमच्या गोष्टी बसत नसल्याचे सांगून तुमची टर उडवतील. आपण शांत बसतो. कारण आपल्याला ना धड प्राचीन विज्ञान माहीत असते, ना धड आधुनिक विज्ञानाचा पुरेसा परिचय असतो. त्यामुळे आपल्या मनाच्या समजुतीसाठी या आपल्याच प्राचीन उपलब्धींना अवैज्ञानिक म्हणू लागतो.
 
एवढ्यात, पीयूष सिंह नामक व्यक्तीचा एक लेख वाचण्यात आला. हे पीयूष सिंह स्वत:ला राष्ट्रीय विचारांचे राजकीय भाष्यकार मानतात. शिक्षणाने ते इंजिनीअर आहेत. लक्ष्मी इन्फ्रा कंपनीत ते भागीदार आहेत तसेच केडब्ल्यूई ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. प्राचीन भारतीयांच्या अकल्पनीय बुद्धीचे काही चमत्कार त्यांनी या लेखात वर्णिले आहेत. त्यांनी आठ शिवमंदिरांची नावे दिली आहेत. केदारनाथ (उत्तराखंड), कालहस्ती (आंध्रप्रदेश), एकम्बरनाथ-कांची (तामिळनाडू), तिरुवनमलई (तामिळनाडू), तिरुवनकैवल (तिरुचिरापल्ली, तामिळनाडू), चिदम्बरम्‌ नटराज (तामिळनाडू), रामेश्वरम्‌ (तामिळनाडू) व कालेश्वरम्‌ (तेलंगणा). पीयूष सिंह यांचे म्हणणे आहे की, ही आठही शिवमंदिरे 79 रेखांशावर स्थित आहेत. एकमेकांपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेली ही शिवमंदिरे जीपीएससारखी उपकरणे नसताना, हजारो वर्षांपूर्वी कशी काय नेमकी एकाच रेषेवर उभारण्यात आली, याचे पीयूष सिंह यांना आश्चर्य वाटते. त्यांचे म्हणणे आहे की, यातील पाच मंदिरे पंचतत्त्वांचे (आप, वायू, अग्नी, पृथ्वी व आकाश) प्रतिनिधी आहेत. तिरुवनकैवल आप तत्त्वाचे, तिरुवनमलई अग्नी तत्त्वाचे, कालहस्ती वायू, कांचीपुरम्‌चे एकम्बरनाथ पृथ्वी, तर चिदम्बरम्‌ हे आकाश तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा उपग्रह तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हते (असे मानले जाते) अशा हजार वर्षांपूर्वी ही मंदिरे बांधण्यात आली आहेत. केदारनाथ व रामेश्वरम्‌ यांच्यातील अंतर 2383 कि.मी. आहे, तरीही ही सर्व मंदिरे एका रेषेत येतात. हे एक गूढच आहे. पीयूष म्हणतात की, आम्हाला आमच्या पूर्वजांच्या ज्ञानाचा व बुद्धिमत्तेचा अभिमान असायला हवा. त्यांच्याकडे जे विज्ञान आणि तंत्रज्ञान होते ते आधुनिक विज्ञानापेक्षा अजीबात वेगळे नव्हते.
 

 
 
दुसर्‍या एका बाबीचे रहस्योद्घाटन करताना पीयूष सांगतात की, उज्जैन हे पृथ्वीचे केंद्र मानले गेले आहे. उज्जैनचा महाकाल एक ज्योतिर्लिंग आहे. उज्जैनपासून इतर ज्योतिर्लिंगांमधील अंतर बघितले तर त्यांच्यात एक विलक्षण संबंध लक्षात येईल.
सोमनाथ- 777 कि.मी., ओंकारेश्वर- 111 कि.मी., भीमाशंकर- 666 कि.मी., काशी विश्वनाथ- 999 कि.मी., मल्लिकार्जुन- 999 कि.मी., केदारनाथ- 888 कि.मी., त्र्यंबकेश्वर- 555 कि.मी., बैजनाथ- 999 कि.मी., रामेश्वरम्‌- 1999 कि.मी. व घृष्णेश्वर- 555 कि.मी.
 
हजारो वर्षांपासून सनातन धर्माचे केंद्र असलेल्या उज्जैनमध्ये, सूर्य व खगोलशास्त्राची गणना करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी 2050 वर्षांपूर्वी उपकरणे तयार केली होती. पृथ्वीवरील काल्पनिक रेषा ब्रिटिश शास्त्रज्ञांनी शंभर वर्षांपूर्वी तयार केल्या असल्या, तरी सूर्य व आकाशाबाबत जाणून घेण्यासाठी चिकित्सक उज्जैन येथे आजही येत असतात.
पीयूष सिंह यांनी दिलेली ही माहिती कितपत सत्य आहे, असा प्रश्न मनात येऊ शकतो. परंतु, त्याची पडताळणी करता येऊ शकते. काहींचे म्हणणे आहे की, ही ज्योतिर्लिंगांची स्थळे पर्जन्यकेंद्र आहेत. त्यासाठी काही कृषी हवामानतज्ज्ञ व काही वेदशास्त्रसंपन्न विद्वान यांची चमू या ज्योतिर्लिंगांच्या स्थळी जाऊन विशिष्ट यज्ञ करून ही केंद्रे कार्यान्वित करण्याचे प्रयोग काही वर्षांपासून करीत आहेत. यज्ञानंतर तिथल्या पर्जन्यमानाचा अभ्यास करीत आहेत. काही वर्षांनंतर ही सर्व माहिती (डाटा) ते संकलित करून निष्कर्षासहित प्रकाशित करणार आहेत. त्यांच्या मते, ही स्थळे कार्यान्वित केलीत तर त्या भागातील पर्जन्यमानात लक्षणीय बदल आढळून येतो. थोडक्यात, या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी निश्चित आहे, जे आधुनिक विज्ञान स्पष्ट करू शकत नाही.
 
आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत हे सर्व मांडणे, हेच तर खरे आव्हानाचे आणि भारतीय बुद्धिवंतांचे काम आहे. आपले प्राचीन विज्ञान व तंत्रज्ञान संस्कृत भाषेत मांडले आहे. परंतु, आपल्याकडे ब्रिटिशांनी जी शिक्षणपद्धती रूढ केली आहे त्यात संस्कृत भाषेला ‘सामाजिक विज्ञान’ गटात टाकले आहे आणि विज्ञानाला वेगळे ठेवले आहे. त्यामुळे आज जो विज्ञान शिकतो त्याला संस्कृत भाषा येत नाही आणि जे संस्कृत शिकतात त्यांना विज्ञानात विशेष गती नसते. अशा रीतीने संस्कृत व विज्ञान यांची फारकत करून ठेवल्याने सर्व गडबड झाली आहे, असे मला वाटते. आता आता विज्ञानाचे काही विद्यार्थी संस्कृत भाषेचा अभ्यास करीत आहेत. याचे प्रमाण वाढले तर मग संस्कृत भाषेत असणार्‍या शास्त्रीय ग्रंथांमधील विज्ञान, आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत मांडून, आमच्या पूर्वजांची स्तिमित करणारी बुद्धी जगाला सप्रमाण दाखविता येईल.
आयुर्वेदातही असंख्य वनस्पतींच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांचे विवेचन आहे व त्यांचा रोगनिवारणार्थ उपयोगही सांगितला आहे. हे सर्व संशोधन जप-तप-यज्ञाने तर झाले नसेलच. त्यासाठी प्रयोगशाळा असतील. आजच्यासारख्या प्रयोगशाळेचे स्वरूप कदाचित नसेलही. परंतु, त्यामुळे आयुर्वेद हे शास्त्रच नाही असे कसे म्हणता येईल?
आपल्याला रावणाचे सासरे मय यांचे नाव कदाचित माहीत असेल. असे म्हणतात की, यांना सूर्याने खगोलशास्त्राचे रहस्य उलगडून दाखविले होते. हे ज्ञान सूर्यसिद्धान्त नावाच्या ग्रंथात संपादिले आहे. तिसर्‍या शतकातील हा अद्भुत ग्रंथ प्राचीन भारतीयांचे खगोल ज्ञान किती पुढारलेले होते, याचे एक प्रमाण आहे. या ग्रंथात ट्रिग्नोमेट्रीचे मूळ आहे. एवढेच नव्हे, तर दशमान पद्धतीबाबत गणितीय सूत्रे आहेत. न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी गुरुत्वाकर्षणाबाबतची शास्त्रीय माहिती या ग्रंथात आहे. अंतराळातील विविध ग्रहांची गती, त्यांचे अचूक आकार व स्थान, काळाची (टाईम) निर्मिती केव्हा झाली वगैरेचे थक्क करणारे ज्ञान आहे. असे म्हणतात की, सापेक्षतावादाचे (रिलेटिव्हिटी) बीजदेखील या ग्रंथात आहे. परंतु, हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. आधुनिक खगोलशास्त्री हा ग्रंथ वाचतील तर त्यांना काहीही समजणार नाही आणि संस्कृत वाङ्‌मयाच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून यातील माहिती जाईल. अशीही एक विपरीत स्थिती भारतात, पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीमुळे निर्माण झाली आहे. ही स्थिती निश्चित बदलेल, यात शंका नाही. आजच, आयआयटी, आयआयएममधील अनेक विद्यार्थी ज्योतिषशास्त्राचे अध्ययन करताना दिसत आहेत. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष विवेक देवरॉय यांनी संस्कृत भाषा शिकून मूळ महाभारत, वाल्मीकि रामायण यांचा इंग्रजी अनुवाद केला आहे. आता ते अठरा महापुराणांचा अनुवाद करीत आहेत.
आर्थिक क्षेत्रात भारत कधीही पुढे नव्हता. समृद्धी म्हणजे काय, हे भारतीयांना पाश्चात्त्यांकडूनच माहीत झाले, असा भ्रम आमच्यात पसरविला गेला. परंतु, जेव्हा अँगस मॅडिसन या प्रख्यात आर्थिक इतिहासकाराने इसवी सन एकपासूनचा जगाचा आर्थिक इतिहास सखोल संशोधनाने प्रकाशित केला, तेव्हा जगाला कळले की, 1850 पर्यंत भारत, जीडीपीच्या बाबतीत जगात क्रमांक एकवर होता. या काळात भारतात इतकी संपन्नता होती की, त्याची युरोपीय देश कल्पनाही करू शकत नव्हते. नंतर वसाहतवादाने युरोपीय देशांनी आर्थिक शोषण केले आणि ते श्रीमंत बनले. यात त्यांची बुद्धी किंवा परिश्रम नव्हते, असे मॅडिसन यांनी नोंदविले आहे. परंतु, आमच्या येथील बुद्धिवंत, विचारवंत हे अजूनही मानत नाहीत आणि नव्या पिढीला हा उज्ज्वल वारसा सांगतही नाहीत. त्यांना कशाची भीती आहे कुणास ठाऊक! पंतप्रधानांच्या नव्या भारतात, संस्कृत भाषा आणि आधुनिक विज्ञान यांचे एकीकरण व्हावे, अशी इच्छा आहे.
9881717838