जपा हृदय

    दिनांक :06-Sep-2019
हृदयाच्या धडधडण्यावरच शरीराचं कार्य अवलंबून असतं. म्हणूनच त्याची विशेष काळजी घ्यायला हवी. जगभरातच हृदयविकाराने मृत्यू होणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. हृदयविकार हा जगातला क्रमांक एकचा जीवघेणा विकार आहे. हृदयविकाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने आपल्या हृदयाविषयी जाणून घ्यायला हवं. 

 
 
काय सांगते आकडेवारी?
हृदयाशी संबंधित विकार जगात सर्वाधिक मृत्यू आणि अपंगत्त्वाला कारणीभूत ठरतात. जगभरातल्या 17.5 दशलक्षांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हृदयाशी संबंधित विकारांनी होतो. हृदयविकाराच्या झटक्यांनी होणार्‍या मृत्यूंची संख्या सर्वाधिक आहे. जगभरात 7.3 दशलक्ष लोक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडतात. हृदयविकार कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला होऊ शकतो. हा विकार महिला आणि मुलांनाही आपल्या विळख्यात घेऊ शकतो. तरूणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढताना दिसत आहे. दर वर्षी जगभरात दहा लाख बालकं हृदयाशी संबंधित विकार घेऊ न जन्माला येतात. दर वर्षी तीनपैकी एका महिलेचा मृत्यू हृदयविकाराने होतो.
 
प्रतिबंध
हृदयाच्या हाका ऐकून हृदयविकाराला वेळीच प्र्रतिबंध करायला हवा. हृदयविकाराला आळा घालण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय करता येतील. बैठ्या जीवनशैलीचा त्याग करणं, सतत कार्यरत राहणं, धूम्रपान आणि तंबाखू सोडणं, आरोग्यदायी पदार्थ खाणं, फळं-हिरव्या भाज्या यांचा समावेश आहारात करणं, वजन नियंत्रणात ठेवणं, हृदयविकाराच्या लक्षणांवर नजर ठेवणं, योग्य औषधोपचार घेणं यामुळे तुम्ही हृदयविकाराला आळा घालू शकाल.
 
लक्षणं
काही वेळा हृदयविकाराचा तीव्र झटका येतो आणि माणसाचा मृत्यू होतो पण बरेचदा हृदयविकाराचा झटका येताना सुरूवातीला वेदनांची तीव्रता बरीच कमी असते. सुरूवातीला सौम्य वेदना तसंच थोडी अस्वस्थता जाणवते. नेमकं काय झालं आहे हे लक्षात न आल्याने वैद्यकीय उपचार लवकर मिळत नाहीत आणि रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. छातीत दुखणं, अस्वस्थ वाटणं, मान, हात, पाठ, जबडा, पोट अशा अवयवांमध्ये वेदना जाणवणं, श्वास घेताना त्रास होणं, घाम येणं, मळमळ अशी लक्षणं दिसून येतात. महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत दुखणं, अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं जाणवू शकतात.