चंद्र आहे साक्षीला...

    दिनांक :07-Sep-2019
‘तळमळीने केलेल्या कामाला तत्क्षणी यश आले नाही, असे वाटत असले तरीही ते भविष्यात येणारे यशच असते...’, असे डॉ. एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते. अखेर यश आणि अपयश ही संकल्पना सापेक्ष आहे. आम्हाला हवे तसेच घडणे याला आम्ही यश समजतो. वास्तवात कधीकधी मनासारखेच घडत नाही, तरीही ते खूप काही देऊन जाणारे असते. एखादे लक्ष्य निर्धारित असणे अत्यंत आवश्यक असते, त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना ऊर्जा मिळते, गती येते आणि मग त्या मंथनातून जे काय हाती लागते ते तुम्ही निर्धारित केलेल्या लक्ष्याच्या जवळ जाणारे असते, सर्वोत्तम नसले तरीही उत्तम मात्र नक्कीच असते. चांद्रयान-2 या मोहिमेचे फलितही तसेच आहे. गेली दहा वर्षे इस्त्रोचे शास्त्रज्ञ त्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. अपेक्षित असे काही घडले असते तरीही एक थांबा म्हणून त्या सार्‍यांना यशाची अंमळ सुस्ती आलीच असती, आता निराशेची क्षीणता आल्याचे जाणवत होते, मात्र शुक्रवारी उत्तररात्री इस्रोच्या प्रेक्षक दीर्घेत भारताचे ऊर्जावान पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले होते आणि नंतर त्यांनी इस्रोच्या ज्ञानर्षींचे कौतुकच केले. देश तुमच्या सोबत आहे, असे सांगितले. शनिवारीही मोदींनी पुन्हा इस्रोच्या चमूचे कौतुक केले. विज्ञानात अपयश नसते, असतो तो केवळ प्रयोग, असे पंतप्रधान म्हणाले. सकाळी पंतप्रधानांनी इस्रोमधून देशाला संबोधित केले. अपेक्षापूर्ती शक्य न झाल्याने आलेला निराशेचा थकवा इस्रोप्रमुख सिवन यांना पंतप्रधानांच्या खांद्यावर डोके ठेवून काढावासा वाटतो यातच पंतप्रधानांचे यश आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ या शास्त्रीजींच्या नार्‍याला, ‘जय विज्ञान’ अशी जोड दिली होती. त्यानंतर पोखरणची अणुचाचणी केली आणि अब्दुल कलाम यांना देशाचे राष्ट्रपती म्हणून मान्यता दिली. एका वैज्ञानिकाला देशाचे हे सर्वोच्च पद देण्याचा बुद्धिवादी दृष्टिकोन ठेवण्याचा हा वारसा मोदी आज चालवित आहेत. मोदी म्हणाले तेच वैज्ञानिक सत्य आहे. विज्ञानात प्रयोग हेच सत्य असते. आधी फसलेल्या काही मोहिमांनी यशाचे पाऊल कसे टाकायचे ते सांगितले आणि चांद्रयान-1 ही मोहिम आम्ही यशस्वी केली. त्यातून चंद़्रावर पाण्याचे अंश आहेत, या निष्कर्षावरून आता थेट चंद्रावर उतरूनच काय ते शोधले पाहिजे आणि त्यासाठी चंद्राचा अस्पर्श भाग निवडला पाहिजे, हा दृष्टिकोन विकसित झाला.
 
 
 
डॉ. कलाम यांनी ‘चांद्रयान-2’ मोहिमेबद्दल दहा वर्षांपूर्वीच इस्रो आणि नासाला सल्ला दिला होता. 2008 साली भारताने चंद्रावर पाठवलेल्या ‘चांद्रयान-1’वरील एमआयपीने (मून इम्पॅक्ट प्रॉब) चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याची नोंद केली होती. नासानेही ‘चांद्रयान-1’च्या या संशोधनाला दुजोरा दिला होता. ‘चांद्रयान-1’च्या यशानंतर भारताने चंद्रावर आणखी एक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळेस केवळ चंद्राच्या कक्षेत जाऊन निरीक्षण करणार्‍या यानाऐवजी चंद्रावर यान उतरवण्याचा इस्त्रोचा इरादा होता. त्यानुसारच ‘चांद्रयान-2’ची आखणी करण्यात आली. ‘चांद्रयान-1’ च्या यशानंतर वर्षभराने मुंबईमध्ये झालेल्या ‘चांद्रयान : आश्र्वासने आणि िंचता’ या विषयावरील परिसंवादामध्ये कलाम यांनी आपले मत मांडले होते. ‘चंद्रावर पाण्याचा अंश सापडल्याच्या भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या एमआयपीच्या दाव्यावर सध्या संशोधन सुरू आहे. नासाने भारताच्या ‘चांद्रयान-2’वर रोबोटिक पेनिट्रेटर (पृष्ठभागावर खड्डा पाडू शकणारा रोबोट) लावायला हवा. त्याच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे अंश आहेत का, याचा अधिक योग्य पद्धतीने अभ्यास करता येईल,’ असा सल्ला कलाम यांनी यावेळी नासा आणि इस्रोला दिला होता. इस्रो आणि नासाने या मोहिमेसाठी एकत्र येऊन काम करावे, असा सल्लाही कलामांनी दिला होता. निर्मितीच्या खर्चात कपात कशी करता येईल यावरही कलाम बोलले होते. ‘चांद्रयान-2’मधील ‘रोव्हर प्रग्यान’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते आणि यात नासाकडून देण्यात आलेली लेझर प्रणाली वापरली होती. रोव्हर प्रग्यान हे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार होते आणि चंद्र आणि पृथ्वीमधील गुरुत्वाकर्षणासंदर्भात अभ्यास करता येणार होता.
 
 
ही मोहीम भारताची असली तरीही अखिल मानव जातीच्या कल्याणाची होती. त्यामुळे भारताच्या यशाकडे सार्‍या जगाचे लक्ष लागून होते. परवाच्या उत्तररात्री सारे जग अवकाशाकडे डोळे लावून बसले होते. अगदी अखेरच्या सूक्ष्म टप्प्यांत विक्रम रोव्हरचा संपर्क तुटला... पाच वेगवेगळ्या मॅन्यूव्हरची विविध आव्हाने यशस्वीरीत्या पार करून शेवटची रफ ब्रेिंकग, व्हर्टिकल डिसेंटच्या सगळ्यात कठीण फेज पूर्ण करून विक्रम रोव्हरची व्हेलॉसिटी कमी करणार्‍या फाईन ब्रेिंकग फेज नंतर म्हणजे पृष्ठभागावर उतरायच्या 2.1 किमी आधी लँडरचा इस्रोच्या डेटा सेंटरशी संपर्क तुटला, त्यामुळे रोव्हरबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. तरीही ऑर्बिटर चंद्राच्या भोवती फिरतो आहे आणि तो बरीच माहिती देणार आहे. त्या अर्थाने हा फसलेला प्रयोग नाहीच. नेतृत्व जिथे अपयशाची जबाबदारी घेते आणि यशाचे श्रेय मात्र आपल्या सहकार्‍यांच्या पदरात टाकत असते, तिथे असले क्षणिक प्रयोग लक्ष्य न गाठू शकल्याचे नैराश्य टिकूच शकत नाही. आपल्या सहकार्‍यांना कळतं आणि त्यांना त्यांच्या प्रज्ञेनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे आणि प्रत्येक सृजनशील सहकार्‍याची शैलीही मान्य करण्याचा थोरपणा जिथे असतो तिथे प्रयोग यशस्वीच होत असतात. परवाही रात्री विक्रमचा संपर्क तुटल्यानंतर गंभीर स्थितीत पंतप्रधान मोदी आणि इस्रो अध्यक्ष के. सिवन या दोघांची देहबोली हेच सांगून जाणारी होती. ऑगस्ट 1979 मध्ये पीएसएलव्हीच्या मिशनला प्रकल्प संचालक असलेल्या कलामांच्या चुकीच्या निर्णयामुळे अपयश आले होते. 20 कोटी रुपये किमतीचे सॅटेलाईट बंगालच्या उपसागरात कोसळले होते. तेव्हाचे इस्रो प्रमुख डॉ. सतीश धवन यांनी पत्रपरिषदेत पत्रकारांच्या सरबत्तीला सामोरे जात सर्व जबाबदारी स्वत:वर घेतली होती. पुढे ही मोहीम यशस्वी झाल्यावर मात्र धवन यांनी त्याचे सारे श्रेय कलामांना दिल्याची आठवण कलामांनीच सांगितली आहे.
 
या मोहिमेचा खर्च तुलनेने कमी होता, मात्र त्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेले परिश्रम मौल्यवान आहेत. त्यातून आता पुढची चंद्रमोहीम आणखी कमी वेळेत, कमी खर्चात यशस्वी होईल. अखेरच्या त्या महत्त्वाच्या टप्प्यात काय चुकले, हे तपासले जाईल. ‘अव्हेंजर्स-एंडगेम’ चित्रपटाच्या निर्मितीला तब्बल दोन हजार 443 कोटी रूपये लागले होते. मात्र, चांद्रयान-2 या संपूर्ण प्रकल्पावर एकूण 978 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
 
हा प्रयोग पूर्णपणे हवे ते घडविणारा ठरला असता तर जगाच्या कल्याणाची गोष्ट ठरली असती. अवकाश तंत्रज्ञानात भारताचे पाऊल मात्र यानिमित्ताने आणखी पुढे पडले आहेच. यश पांघरायला छान वाटत असते. त्याचा मुकुट धारण करायला खूप जण
समोर येत असतात. मात्र प्रयोगाची यशस्विता ही फलप्राप्तीवर तोलून न पाहता त्यातून निर्माण झालेल्या सकारात्मक उर्जेवर तिचे निकष तोलण्याची दृष्टी दाखविणे अत्यंत आवश्यक असते. मोदींनी नेमके तेच केले. निराशेमुळे झुकलेल्या इस्रो प्रुमख के. सिवन यांच्या पाठीवर मोदींनी सगळ्यांसमोर थाप दिली. त्यातून ही मंडळी फिनिक्स भरारी घेतील अन्‌ अगदी वर्ष-दोन वर्षांत एक नवी मोहीम यशस्वी होईल... त्यासाठी इस्रोच्या सर्व चमूचे अभिनंदन!!