संन्यस्त खड्‌ग...

    दिनांक :07-Sep-2019
2014 साली झालेला विजय योगायोग नव्हता, हे ठासून सिद्ध करणारा 2019 सालचा दणदणीत विजय संपादल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाजाचा जो सपाटा लावला आहे, तो अभूतपूर्व असाच आहे. त्यासाठी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
 
 
2014 ते 2019 या काळातील नरेंद्र मोदी यांचा कारभार, तसेच 2019 च्या विजयानंतर 100 दिवसांत त्यांनी घेतलेले दूरगामी परिणाम करणारे निर्णय बघता, त्यांना ‘संन्यस्त खड्‌ग’ हेच विशेषण शोभून दिसते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी लेखणीतून निर्माण झालेले ‘संन्यस्त खड्‌ग’ हे संगीत नाटक एका वैचारिक घुसळणीला जन्म देणारे आहे. आत्यंतिक अिंहसेच्या विपरीत परिणामांवर प्रखर भाष्य करणारे हे नाटक, सहिष्णुता कुरवाळू पाहणार्‍या आपल्या समाजात आजही प्रासंगिक आहे. आत्यंतिक समाजवाद, आत्यंतिक सेक्युलरवाद, आत्यंतिक सहिष्णुता, आत्यंतिक जिव्हास्वातंत्र्य इत्यादी सद्गुण-अतिरेकामुळे लुळ्या-पांगळ्या झालेल्या आपल्या समाजाला खडबडून जागे करण्याचे काम आपल्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी केले. 

 
 
संसदभवनात अनभिषिक्त पंतप्रधान म्हणून प्रवेश करताना प्रथम त्या भवनाच्या पायव्याला नतमस्तक होऊन वंदन करण्यापासून ते पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरचा प्रत्येक क्षण, नरेंद्र मोदी यांनी ‘संन्यस्त खड्‌गा’प्रमाणे गाजवला आहे, हे आपल्या लक्षात येईल. राजकारण तर करायचेच, परंतु त्याला संन्यस्त वृत्तीची किनार देऊन. हे जे त्यांचे विलक्षण कर्तृत्व आहे त्यावरून, शिवचरित्राचे मर्म समजणार्‍यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 2014 पासून ते आजतागायत त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे विश्लेषण केले तर असे दिसून येईल की, त्यात धाडस तर होतेच; परंतु धाडसानंतर येणार्‍या यशाचा आत्मविश्वासही होता. महात्मा गांधी, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या तत्त्वज्ञानाला मानवतेची जी डूब होती, ती नरेंद्र मोदी यांनी कधीही दृष्टिआड होऊ दिली नाही. या देशातील गरिबी, दारिद्र्य संपविण्यासाठी त्यांनी कम्युनिस्टांसारखी क्रांतीची उद्घोषणा केली नाही. परंतु, आपल्या जनधन, उज्ज्वला, शौचालयसारख्या इतरांना अतिशय क्षुद्र वाटणार्‍या योजनांनी आपल्या समाजातील या अवस्था संपवून टाकण्याचा त्यांनी विडा उचलला आणि त्यात यशही संपादन केले.
 
 
समर्थ रामदास म्हणतात-
उत्कट भव्य तेंचि घ्यावे। मिळमिळीत अवघेचि टाकावे।
नि:स्पृहपणे विख्यात व्हावे। भूमंडळी।। (11.6.15)
 
 
प्रत्येक योजना, प्रत्येक निर्णय भव्य, दिव्य आणि कल्पनातीत होता. तो कुणाला सुचलाही नसता. सुचलाच तर यशाची खात्री नसती. परंतु, मोदींनी ते करून दाखविले. ‘स्वच्छ भारत मिशन’ची कमी टवाळी झाली का! प्रत्येक भारतीयाला ही योजना अशक्यच वाटत होती. पण, मोदी ठाम होते. आज हे मिशन लोकचळवळ झाल्याचे आपण बघत आहोत. ज्यांचे नेतृत्व करायचे आहे, त्यांच्या आघाडी िंकवा पिछाडीला न राहून, त्यांच्यातच मिळून-मिसळून राहून हळूहळू त्यांना योग्य त्या दिशेने वळविण्याचा एक आगळावेगळा नेतृत्वगुण नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीतून लखलखीतपणे समोर आला आहे. सनदी अधिकार्‍यांपासून ते समाजात सर्वात शेवटी उभ्या असलेल्या व्यक्तीपर्यंत, सर्व जण स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांत चांगलेच सैलावले होते. त्या सर्वांना नरेंद्र मोदी यांनी ताळ्यावर आणले आहे. हे काम भारतात कुणी करेल, हे कुणाला स्वप्नातही वाटले नसावे. नोटबंदी असो की जीएसटी, जिथे कठोर व्हायचे तिथे कठोर, जिथे शस्त्रक्रिया आवश्यक तिथे शस्त्रक्रिया, या न्यायाने मोदी वागले आहेत. सव्वाशे कोटी लोकांच्या या समाजाला एका दिशेने, एका तालाने एकेक पाऊल पुढे टाकायला लावणारे नरेंद्र मोदीच आहेत. प्रत्येकाने एक पाऊल टाकले तर ती सव्वाशे कोटी पावले होतात, हे लोकांच्या मनात बिंबविण्यात मोदींना यश मिळाले आहे.
 
 
सुरक्षेच्या प्रश्नावर तर त्यांनी या समाजाला पोलादासारखे ताठ उभे केले. भारताला सतत रक्तबंबाळ करणार्‍या पाकिस्तानला ताळ्यावर आणण्यासाठी मोदींनी बहुमुखी योजना आखली. विरोधक टर उडवत असतानाही, जगभरात सतत भ्रमण करून आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानला मिळणारी रसद व नैतिक आधार संपवून टाकला आणि नंतर त्याच्या प्रत्येक आगळिकीवर, त्याच्या छाताडावरच प्रहार केलेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्याच्या मुजोर्‍यांवर आमचे सत्ताधारी मान खाली घालायचे, तो पाकिस्तान आज लकवा झाल्यासारखा जागचा न हलता केवळ िंकचाळत बसला आहे. हे मोदींचेच कर्तृत्व नाही तर कुणाचे? जम्मू-काश्मीरला (देशविघातक) विशेष दर्जा देणारे कलम 370 कधीही हटणार नाही, यावर पैजा लागत असतानाच, नरेंद्र मोदींनी रक्ताचा एक थेंबही न सांडू देता, ते कलम अलगद पुसून टाकले. हे कर्तृत्व केवळ बहुमताने येत नसते. त्यासाठी राजकीय चातुर्य तर हवेच हवे, परंतु या देशावर झालेल्या अन्यायामुळे हृदयाला पीळ पाडणारी संवेदनशीलताही आवश्यक असते. मोदींच्या कृतीतून त्याचेही प्रकटीकरण झाले आहे.
 
 
या देशातील गरिबांचा, दीन-दलितांचा, वंचितांचा, महिलांचा उत्कर्ष कसा होईल, याचाच प्रत्येक क्षणी विचार नरेंद्र मोदी यांच्या मनात असतो. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर प्रथमच या देशातील ‘शेवटच्या रांगेतील शेवटच्या व्यक्ती’ला असे वाटू लागले आहे की, आपली काळजी घेणारा, आपल्याला आधार देणारा, आपले अश्रू पुसणारा, आपल्याला उभा करणारा कुणीतरी सत्तेच्या शीर्षस्थानी बसला आहे. ‘स्मॉल इज ब्युटिफुल’ या न्यायाने नरेंद्र मोदी यांनी असंख्य लहान-लहान गोष्टी अंमलात आणून त्याचे एकत्रितपणे सौंदर्य खुलविले आहे.
 
 
कामना मनात धरून केल्या जाणार्‍या कर्मांचा स्वरूपत: त्याग म्हणजे संन्यास. ही काम्य कर्मे फल उत्पन्न करतात. यासाठी मुळातच त्यांना स्पर्श करू नये. परंतु, काम्य कर्मे टाकली म्हणून नित्यनैमित्तिक कर्मे मात्र टाकू नयेत. नित्य कर्माचे आचरण मनुष्याला विभूषित करते. ज्ञानी पुरुष, वाट्याला आलेली कर्मे फलाची अपेक्षा न धरताही तत्परतेने करतो आणि ती ब्रह्मार्पण करून मोकळा होतो. तद्वतच राजकारणात आहे म्हणून मोदींनी राजकीय डावपेच सोडले नाहीत. ते तर वाट्याला आलेले कर्म आहे. परंतु, त्यातून मिळालेले फळ त्यांनी तत्काळ सव्वाशे कोटी जनतेला देऊन टाकले आहे. देशात असो वा जगात, त्यांचा कुठेही सत्कार झाला, मानसन्मान झाला, कौतुक झाले, पुरस्कार मिळाला, तो त्यांनी तिथल्या तिथे सव्वाशे कोटी लोकांना अर्पण केला आहे. विहित कर्म करीत असता अवचित अपयश आले आणि थांबावे लागले तरी मोदींनी खेद केला नाही; तसेच आरंभलेले शेवटास गेले म्हणून कधी गर्वाने फुगले नाहीत. ही संन्यास वृत्ती नव्हे तर काय आहे? नरेंद्र मोदी हे या अर्थाने ‘संन्यस्त खड्‌ग’ आहेत.
 
 
संन्यस्त वृत्तीने क्षात्र धर्माचे आचरण करणारे नरपुंगव आपल्या देशात कमी झाले नाहीत. त्यातल्या त्यात जवळचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या पुण्यश्लोक शिवाजी महाराजांची परंपरा नरेंद्र मोदी यांनी केवळ पुनरुज्जीवितच केली नाही, तर ती ते समर्थपणे निभवत आहेत. म्हणून त्यांना म्हणायचे ‘संन्यस्त खड्‌ग!’ आणि म्हणून, विश्वगुरुपदी विराजमान होण्यास उत्सुक असलेल्या भारतमातेच्या एका हातात, आपल्या कर्तृत्वाने खड्‌ग म्हणून विराजमान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर शहरातील आगमन आम्हा सर्वांनाच पुलकित करणारे आहे. त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!