‘ते’ दहशतवादी नव्हे, शेतकरी; पाकिस्तानचा कांगावा

    दिनांक :07-Sep-2019
इस्लामाबाद,
भारतीय लष्करी जवानांनी ज्या दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली, ते अतिरेकी नसून, सामान्य शेतकरी आहेत आणि भारत त्यांना अतिरेकी म्हणून सादर करीत आहे, असा कांगावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे.
कलम 370 निष्प्रभ करण्यात आल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात अतिरेकी पाठविण्याचे प्रमाण वाढले असतानाच, भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन अतिरेक्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीचा व्हिडीओ देखील लष्करी अधिकार्‍यांनी जारी केला. मोहम्मद खलिल आणि मोहम्मद नाझिम अशी नावे असलेले हे अतिरेकी पाकिस्तानच्या रावळिंपडी शहरातील रहिवासी आहेत आणि तोयबाकडूनच आम्हाला दहशतवादाचे प्रशिक्षण मिळाले असल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यांनी आपल्या अन्य साथीदारांची नावेही सांगितली.
 

 
 
पाकिस्तानच्या लष्कराने मात्र आज एक निवेदन जारी करून, हे दोघेही गुलाम काश्मिरातील सामान्य शेतकरी असून, त्यांनी चुकीने हाजिपिर भागातील नियंत्रण रेषा ओलांडली होती, असे म्हटले आहे. या मुद्यावर आम्ही 27 ऑगस्ट रोजी भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत हॉटलाईनवरून चर्चाही केली होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोघांचीही मुक्तता करण्याचे आश्वासन भारतीय लष्कराने दिले होते. मात्र, आता त्यांना अतिरेकी ठरविण्यात आले आहे, असेही या निवेदनात नमूद आहे.