वाशिममध्ये चालत्या-बोलत्या महालक्ष्मींची स्थापना !

    दिनांक :07-Sep-2019
सोनुने कुटुंबाने सुनांचे पूजन करुन साजरा केला गौरीपूजन सोहळा 
सिंधुबाई सोनुनेंचा प्रेरणादायी उपक्रम
 
वाशीम,
गौरी आगमनानिमित्त सर्वत्र गौरी महालक्ष्मीचे मुखवटे, जरीची वस्त्रे नेसून महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली. मात्र, शहरातील एका सासुबाईने आपल्या दोन सुनांना साक्षात लक्ष्मीच्या रूपातच विराजमान करून धार्मिक पध्दतीने त्यांची मनोभावे पुजा अर्चा केली आणि समाजासमोर एक वेगळा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
 
आपल्या समाजात सासु सुनेचे नाते हे विळ्या-भोपळ्याचे असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. सासुंकडून सुनांवर अत्याचार होत असल्याच्या घटनाही सातत्याने घडत असतात. असे असताना अनेक सासुबाई आपल्या सुनांना मुलीप्रमाणे वागणूक देत असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. यातच शहरातील ड्रिम लॅन्ड सिटी कॉलनीत राहणार्‍या सिंधुबाई सुभाष सोनुने या सासुबाईंनी आपल्या थोरल्या सुनबाई जि.प. शिक्षीका रेखा सचिन सोनुने व धाकट्या सुनबाई पल्लवी प्रमोद सोनुने यांना गौरी सणानिमित्त सजविलेल्या मंदिरात दोन्ही लक्ष्मींना भरजरी साड्या व दागदागिण्यांनी सजवून विराजमान केले. तसेच नातू मंधीर व रंधीर यांना नारोबाच्या रूपात विराजमान केले. त्यांची पूजा अर्चा करुन जेवण भरविण्यात आल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी त्यांचे दर्शन घेतले. 

 
 
हा आगळा वेगळा गौरी पुजनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी खास करून महिलांनी गर्दी केली होती. सोनुने कुटुंबात गतवर्षी सुध्दा अशाच पध्दतीने गौरी स्थापनानिमित्त सुनांना महालक्ष्मीचा बहुमान देण्यात आला होता. तसेच दरवर्षी गणेश उत्सवादरम्यान मुर्तीच्या गणेशाची स्थापना न करता घरातील बालकांचा पुजा अर्चा केली जाते. एकीकडे समाजात अंधश्रध्दा व कर्मकांडाचे स्तोम माजले असतांना सोनुने कुटुंबियांंनी प्रत्यक्ष कृतीतून घडविलेल्या या परिवर्तनवादी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.