मातृतीर्थ बुलढाण्याच्या मोनालीची यशस्वी झेप

    दिनांक :08-Sep-2019
रवींद्र गणेशे
 
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द , चिकाटी व एकाग्रतेच्या जोरावर तिरंदाज मोनाली जाधव हिने अवघ्या दोन वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत आठ सुवर्ण, तीन रौप्य व चार कांस्यपदकांची कमाई केली. आपल्या तीर कामठयाने तिने नुकतेच चीन येथे झालेल्या जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीच्या विविध प्रकारात दोन सुवर्ण पदक पटकावले आणि एक आंतरराष्ट्रीय तिरंदाज म्हणून मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यासह पोलिस विभागाचे नाव जागतिक पातळीवर पोहचविले.
  
 
मोनाली जाधव ही बुलढाण्याची कन्या असून मोनालीचे शालेय शिक्षण बुलढाण्यातील रूखाई कन्या विद्यालयात झाले. शाळेमध्ये क्रीडा शिक्षक व इतर शिक्षकांच्या मदतीने ती मैदानी स्पर्धा, हॅण्डबॉल स्पर्धामध्ये सहभागी व्हायची. 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत ती राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत सहभागी झाली होती. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. वडील चंद्रहर्ष जाधव यांचा अपघात मृत्यू झाला. त्यामुळे शिक्षणाची जबाबदारी आई रजनी यांच्यावर येऊन पडली. आईने शिवणकाम करून मोनालीला 12 वी पर्यंतचे शिक्षण दिले. आईचे काबाडकष्ट सहन न झाल्याने ती बारावीनंतर महिला पोलिस विभागात भरती झाली. 2013 मध्ये पोलिस विभागात नोकरी करीत असतांना पोलिस क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने 2017 मध्ये तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकात इलग यांच्या संपर्कात आली.
 
मोनाली जाधव मधील खेळाडूवृत्ती व खेळाप्रती आवड बघून चंद्रकांत इलग यांनी तिला तिरंदाजी खेळण्यास प्रोत्साहित केले. मोनाली जाधव नागपूर येथे पोलिस तिरंदाजी प्रशिक्षण केंद्रात सहभागी झाली आणि चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंदाजीचे धडे गिरवू लागली. त्यांनीच तिला एकाग्रता साधण्याचे आणि श्वसनावर नियंत्रण राखण्याचे तंत्रसुद्धा शिकविले. जिद्द, चिकाटी व एकाग्रतेच्या आधारावर गत दोन वर्षात सतत सराव केेल्यावर मोनाली तरबेज तिरंदाज झाली आणि मुंबई पालघर येथे झालेल्या सिनियर राज्यस्तरीय स्पर्धेत तिने 2 सुवर्ण व 2 रौप्यपदकांची कमाई केली. त्यांनतर इम्फाळ (मणिपूर) येथे झालेल्या 6 व्या अखिल भारतीय तिरंदाजी स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. झारखंड राची येथे झालेल्या सातव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत 4 सुवर्ण व 1 कांस्यपदक प्राप्त केले.
 
 
सहाव्या अ.भा. राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत तिने एका कास्यंपदक मिळविले. कटक (ओडिशा) येथे 39 व्या सिनियर नॅशनल क्रीडा स्पर्धेत एक रजत व एका कांस्यपदकाची कमाई केली. 2019 मध्ये चीनच्या शांघाय येथे झालेल्या विश्वचषकामध्ये जागतिक स्तरावर नववा क्रमांक प्राप्त केला. नुकत्याच चीनच्या चेंगडू येथे झालेल्या जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण व एक कांस्यपदक पटकाविले. जागतिक पातळीवर गगन भरारी घेतली. भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राष्ट्रकुल, विश्वचषक स्पर्धेत सहभागी होवून भारत देशाचे नाव तिरंदाजीमध्ये जागतिक स्तरावर पोहचविण्याचा तिचा मानस आहे.
 
9850827058