गडचिरोली,
गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड येथे गावात पाणी शिरल्याने ६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. मालेवाडा येथे २५ व सिरोंचा तालुक्यातील कोरलामाल येथील २२ कुटुंबांनाही स्थलांतरित करावे लागले. गोसेखुर्द व चिचडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने आणि वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जिल्ह्य़ातील तब्बल २० मार्ग बंद असल्याने हजारो गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हय़ातील वैनगंगा, पर्लकोटा, इंद्रावती या प्रमुख नद्यांसह सर्व नद्या दुथडी भरून वाहत असल्याने लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रह्मपुरी, नागभीड व पोंभुर्णा तालुक्याला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. ब्रह्मपुरी-वडसा, चंद्रपूर-आष्टी मार्ग बंद आहे. जुनगाव, गंगापूर टोक या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. नागभीड तालुक्यातील बाम्हणी गाव अजूनही पाण्याखालीच आहे. या तालुक्यातील जवळपास ३०० घरांची पडझड झाली असून, हजारांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. वर्धा जिल्हय़ातील आर्वी तालुक्यातील तुडुंब भरलेल्या कुऱ्हा तलावास भेगा पडल्याचे निदर्शनास आल्यावर १४० ग्रामस्थांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. संततधार पावसाने हा तलाव शंभर टक्के भरला. तलावाच्या मातीच्या मुख्य भिंतीला मोठय़ा अंतराच्या भेगा पडल्याचे स्थानिक गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच गावातील ४२ कुटुंबांतील १४० लोकांना इतरत्र हलविण्यात आले.