कारंजा मतदारसंघात घड्याळाची टिकटिक मंदावली

    दिनांक :08-Sep-2019
मानोरा तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार
दोन जिल्हाध्यक्षांसह शेकडोंचा भाजपात प्रवेश
वाशीम,
राज्यभरातील दिग्गजांच्या धक्कातंत्राने खिळखिळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मानोरा तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचे खंदे समर्थक उमेश पाटील व  ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देवनाथ पाटील भोयर यांच्यासह शेकडो पदाधिकार्‍यांनी  पक्षातील वाढती मक्तेदारी व हुकुमशाहीला कंटाळून भाजपात प्रवेश घेतला. कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादी व ठाकरे पितापूत्रांना हा मोठा धक्का मानला जात असून मतदारसंघात घडयाळाची टिकटिक मंदावली आहे.
 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका असलेले बिणीचे शिलेदार सध्यस्थितीत पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. राज्यातील हे लोण आता वाशीम जिल्ह्यातही पसरले आहे. जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घराणेशाही  व तुसडेपणाच्या वागणूकीला जिल्ह्याभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते कंटाळले आहेत. पक्ष व स्थानिक नेत्यांसाठी अहोरात्र मेहनत घेवूनही पदरी निराशा पडलेल्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या संयमाचा बांध अखेर फुटलाच. माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचे खंदे समर्थक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक उमेश पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देवनाथ पाटील भोयर  यांच्यासह तालुक्यातील बहुतांश धुरिणांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार  राजेंद्र पाटणी यांच्या विकासात्मक राजकारणाला साक्षी मानत भाजपात प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी उपसभापती देवनाथ पाटील भोयर, शेतकरी सुतगिरणी दारव्हाचे संचालक विठोबा पाटील, पंचायत समितीचे सदस्य गजानन भवाने, कुपट्याचे सरपंच रवि दिघडे, जवळ्याचे माजी सरपंच नरेंद्र पाटील , कोलारचे माजी उपसरपंच विनोद पाटील, हिवरा बु. येथील सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य गोपाल पाटील व सचिन घोडे आदींचा समावेश आहे. 
एकेकाळी ठाकरे कुटूंबाचे अत्यंत विश्‍वासू असलेल्या या सर्व पदाधिकार्‍यांनी ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीसह माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासाठी हा मोठा हादरा मानल्या जात असून आगामी विधानसभा निवडणूकीत पक्षाला याची किमंत मोजावी लागणार आहे.