अमरावती,
शहराच्या हृदयस्थानी असलेल्या अंबापेठ-गोरक्षण प्रभागातून वाहणार्या नाली व नाला साफसफाईच्या मुद्यावरुन सोमवारी दुपारी भाजपाच्या नगरसेवकाला चुनाभट्टी चौकात मारहाण झाली. यात नगरसेवक गंभीर जखमी झाला असून त्याचा भाऊ व ज्यांच्यासोबत वाद झाला, त्या कुटुंबातील तीन व्यक्ती आणि अन्य एक असे एकूण सहा जण या घटनेत जखमी झाले आहेत.
प्रणित सोनी असे जखमी भाजपा नगरसेवकाचे नाव आहे. त्यासोबतच दर्शन सोनी, गोपीचंद बुंदिले, अक्षय बुंदिले असे जखमी झालेल्या अन्य व्यक्तिंची नावे आहे. सदर प्रभागातल्या चुनाभट्टी चौकामध्ये गोपीचंद बुंदिले यांचे घर आहे. त्यांच्या घराला लागूनच अंबानाला पण वाहतो. चुनाभट्टी चौकातल्या नाल्यांची साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने पाणी सातत्याने तुंबते व त्याचा आम्हाला प्रचंड त्रास होतो, अशी तक्रार बुंदिले यांच्याकडून भाजपा नगरसेवकाचा भाऊ दर्शन सोनी याच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरुनच आज दुपारी वाद झाला. यास वादातुन अक्षय बुंदिले याने दर्शनच्या डोक्यावर काचेच्या बॉटलने वार केला. त्यात तो जखमी झाला. त्याने ही घटना आपल्या नगरसेवक भावाला सांगितली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेवक प्रणित सोनी घटनास्थळी पोहोचले. त्यांचेही बुंदिले यांच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले, यातून मारहाण सुद्धा झाली. या मारहाणीत एक लोखंडी रॉड नगरसेवक सोनी यांच्या डोक्यावर बसला. क्षणात ते रक्तबंबाळ झाले. वातावरण एकदम तापले. नागरिकांची गर्दीही मोठ्या संख्येने जमली. काहींनी मध्यस्थी करुन हे भांडण थांबविले. सोनी व त्यांच्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. तसेच नगरसेवक सोनी देखील पोलिस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरुन सोनी भावंडांवर व बुंदिले बाप-लेकावर गुन्हे दाखल केले आहे.
अंबापेठ-गोरक्षण प्रभागात अस्वच्छतेचा कळस
अंबापेठ-गोरक्षण प्रभागामध्ये अद्यापही मनपाच्या स्वच्छतेच्या संदर्भातल्या नवीन धोरणानुसार कामकाज सुरु झालेले नाही. त्यामुळे या प्रभागात जुन्याच कंत्राटदारामार्फत साफसफाई होत आहे. मात्र ती अजिबात समाधानकारक नसल्याची तक्रार संपूर्ण प्रभागातूनच सातत्याने होत असते. असे असले तरी नव्या धोरणानुसार या प्रभागात स्वच्छतेचे काम सुरु करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून व भाजपाच्या चार नगरसेवकांकडून ठोस पुढाकार घेण्यात आलेला नाही. परिणामस्वरुप सोमवारी भाजपाच्या एका नगरसेवकाला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. आ. सुनील देशमुख यांचेही या प्रभागाच्या स्वच्छतेसंदर्भातल्या मुद्याकडे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.