बोंडअळी व्यवस्थापनासाठी भारतीय कापूस संशोधन केंद्राचा पुढाकार

    दिनांक :09-Sep-2019
गिरड,
गेल्या तीन वर्षांपासून कापसाच्या पिकावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गुलाबी बोंड‌‌‌अळी प्रादुर्भावाने विदर्भातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. 

 
 
या वर्षी शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या कापसावर आतापासुनच बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून या बोंडअळी व्यवस्थापनासाठी बोंड अळीच्या प्रादुर्भावातून शेतकऱ्यांचे कापसाचे पिक वाचविण्याकरीता नागपूर येथील भारतीय कापूस संशोधन केंद्राकडून गुलाबी बोंडीअळी एकात्मिक व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने ट्रायकोकार्ड, व किटकनाशक व कामगंध सापळे वितरण व प्रात्याक्षिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. मागील वर्षी या भारतीय कापूस संशोधन केंद्राचा बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापन कार्यक्रम व कृषी विभाग मार्फत जनजागृतीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळाला असून काही प्रमाणात शेतकऱ्यांना बोंड अळीवर नियंत्रण मिळविण्यास शेतकऱ्यांनी यश संपादन केले आहे. या वर्षी सुध्दा आतापासुनच कापूस पिकावर काही प्रमाणात बोंड अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे.
 
याकरीत वेळीच खबरदारी घेण्यासाठी नागपूर येथील भारतीय कापूस संशोधन केंद्राकडून शेतकऱ्यांना बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एक एकर कापसाच्या शेतात ७ कामगंध सापळे व निंबोळी अर्काची फवारणी, शेतात ट्रायकोकार्ड लावणे याचे वितरण करुन प्रात्याक्षिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
 
बोंडअळीच्या प्रादुर्भावाला शेतकऱ्यांनी न घाबरता त्यावर वेळीच उपाययोजना करुन नियंत्रण मिळवावे असे मार्गदर्शन वर्धा जिल्हा प्रकल्प समन्वयक तथा नागपूर येथील भारतीय कापूस संशोधन केंद्रात कार्यरत वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ शैलेश गांवडे, संशोधन सहायक प्रबोध पाटे,मेहुल बहादुरे,यांनी केले तर किटक शास्त्रज्ञ डॉ बाबासाहेब फंड यांनी कपाशीवरील एकात्मिक किड नियंत्रण व डॉ दिपक नगराळे यांनी कपाशीवरील रोगचे निदान व त्यावरील एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.