नियमित मासिक उत्पन्न हवंय?

    दिनांक :09-Sep-2019
निवृत्तीच्या वाटेवर असणारी तसंच निवृत्त झालेली मंडळी गुंतवणुकीसाठी मासिक उत्पन्न योजनेचा विचार करतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारचं पाठबळ असणार्‍या बर्‍याच मासिक उत्पन्न योजना आहेत. बँकेच्या मुदत ठेवी, पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजना यासारख्या सुरक्षित पर्यायांसह म्युच्युअल फंडाचे सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन( एसडब्ल्यूपी) तुलनेने धोक्याच्या योजनाही आहेत. उतारवयात नियमित मासिक उत्पन्न मिळवण्यासाठी कोणते पर्याय योग्य ठरू शकतील? जाणून घेऊ या. 

 
  • फारसा धोका पत्करायची इच्छा नसलेल्या गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेव मासिक उत्पन्न योजना लाभदायी ठरू शकते. या योजनेतून दर महिन्याला सुनिश्चित असं मासिक उत्पन्न मिळतं. बँक आणि योजनांनुसार मुदत ठेवींचा कालावधी ठरतो.
  • केंद्र सरकारचं पाठबळ लाभलेली पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायांपैकी एक आहे. इथे अगदी दीड हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. एकल खात्यातल्या गुंतवणुकीवर साडेचार लाख रुपयांची मर्यादा आहे तर दोघांच्या संयुक्त खात्यात नऊ लाख रुपये गुंतवणूक करता येते. या योजनांवर 7.3 टक्के दराने व्याज मिळतं. या योजनांचा कालावधी पाच वर्षांचा असतो.
  • 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकतात. तसंच स्वेच्छानिवृत्ती घेणारे 55 वर्षांचे नागरिकही हे खातं उघडू शकतात.
  • प्रधानमंत्री वय वंदन योजना ही देखील ज्येष्ठ नागरिकांसाठीची बचत योजना आहे. या योजनेत दीड लाख रुपयांपासून 7.5 लाख रुपयांपर्यंत एकरकमी गुंतवणूक करता येते. यावर 8 ते 8.30 टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं.
  • सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लॅनअंतर्गत म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीवर नियमित मासिक उत्पन्न मिळवता येतं.