...त्यामुळे वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    दिनांक :09-Sep-2019
मोर्शी, 
अमरावती जिल्ह्याची तहान भागविणारे आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयुक्त असलेल्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा सोमवारी १०० टक्क्यांवर पोहोचल्यामुळे सकाळी ११ वाजता धरणाचे ३ दरवाजे उघडण्यात आले. त्यापूर्वीच वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 
 
 
जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या अप्पर वर्धा धरणाची जलपातळी मागील दोन वर्षापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे फारच कमी झाली होती. जुन महिन्यात जलसाठा १० टक्क्यांवर पोहचला होता. गेल्या तीस वर्षात प्रथमच अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. कधी कळी पाण्याखाली डुबलेली गावे धरणात पाणी नसल्यामुळे प्रथमच उघडी पडली होती. पावसाळा सुरू होऊन दोन तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ही अप्पर वर्धा धरणात केवळ चाळीस टक्केच पाणीसाठा जमा झाला होता. तर महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली होती. या पावसाळ्यात सुद्धा अप्पर धरण भरते किंवा नाही अशी शंका परिसरातील नागरिकांना निर्माण झाली होती.
  
  
ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या कार्यक्षेत्रात येत असणाऱ्या वर्धा नदी, जाम नदी ,माळु नदी ,नळा नदी ,दमयंती नदी आलेल्या दमदार पावसामुळे दुथडी भरून वाहत होत्या. परिणाम स्वरूप अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याच्या साठ्यात दररोज वाढ होत होती. चार सप्टेंबर रोजी दमयंती व नळा नदीला आलेल्या महापुराने अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली होती. साठा १०० टक्के झाल्यानंतर दरवाजे उघडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्यावतीने घेण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी वर्धा, अमरावती, यवतमाळ, जिल्ह्यातील नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. अप्पर वर्धा धरणातील पाण्याचे पूजन कार्यकारी अभियंता पोटफोडे यांनी केले. अप्पर वर्धा धरणाला १३ वक्राकार दरवाजे आहे. त्यापैकी गेट क्रमांक १ व ७ आणि १३ हे दरवाजे दहा सेंटीमीटर उघडण्यात आले. या दरवाज्यातून पन्नास घनमीटर प्रतिसेकंदाने विसर्ग सुरू आहे. तर आवक १२० घनमीटर प्रतिसेकंद सुरू आहे.