'केबीसी' मुळे एका प्रेक्षकाची स्मृती आली परत

    दिनांक :09-Sep-2019
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो व अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीने कित्येक लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नाही तर या शोच्या माध्यमातून अनेक मनाचा ठाव घेणारे अनुभव ऐकायला मिळत असतात. मात्र या शोच्या एका चांगल्या परिणामाबाबत जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. या शोमुळे एका व्यक्तीची स्मृती परत आल्याचे समजते आहे. ही व्यक्ती म्हणजे युट्युब स्टार भुवन बामचे वडील.

 
 
सध्या कौन बनेगा करोडपतीचा ११ वा सीझन सुरू असून या सीझनचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करत आहेत. यूट्यूब स्टार भुवन बामने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे आणि कौन बनेगा करोडपती शोचे आभार मानले आहेत. त्याने ट्विट करून आभार मानले आहेत. युट्यूब स्टार भुवनने ट्वीट करत म्हटलं की, 'अमिताभ बच्चन आणि केबीसीच्या टीमचे आभार. शोमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमुळे माझ्या वडिलांना भूतकाळातील अनेक गोष्टी आठवल्या. ब्रेन सर्जरीनंतर ते अनेक गोष्टी विसरले होते. मात्र हा शो पाहण्यासाठी त्यांचा असलेला उत्साह पाहून आम्हाला ते लवकर बरे होतील ही आशा होती.'
याशिवाय भुवनने एक व्हिडीओदेखील शेअर केला. त्यात त्याचे वडील केबीसी पाहताना दिसत आहेत. भुवनच्या ट्वीटनंतर त्याच्या चाहत्यांनी वडिलांना लवकर बरं वाटेल अशा शुभेच्छा देणारे ट्वीट केले आहे. भुवनच्या वडिलांची ब्रेन सर्जरी झाली. या सर्जरीचा त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला, त्यामुळे त्यांना भूतकाळातील काही गोष्टी आठवत नव्हत्या. मात्र केबीसी पाहताना अनेक गोष्टी त्यांना आठवू लागल्या आहेत.
भुवन बाम युट्युबवर प्रसिद्ध आहे. त्याचं स्वतःचं युट्युब चॅनेल आहे. भुवन भारतातील पहिला यूट्यूब आर्टिस्ट आहे ज्याचे सबस्क्रायबर १० दशलक्षहून जास्त आहेत. युट्यूबशिवाय भुवनने प्लस मायनस या चित्रपटात दिव्या दत्तासोबत काम केले आहे.