...म्हणून रवीनाचं होऊ शकलं नाही लग्न

    दिनांक :09-Sep-2019
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्याच्या घडीला एक फॅमिली मॅन असला तरीही चित्रपटसृष्टीत एक वेळ अशी आली होती ज्यावेळी त्याचं नाव विविध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. अभिनेत्री रवीना टंडन सोबत खिलाडी कुमारच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा होत्या. ‘मोहरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. त्यांच्यातील प्रेमाची चर्चा चित्रपट वर्तुळातही पसरल्याचं पाहायला मिळालं होतं. १९९९ मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने त्यांच्या रिलेशनशिपविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कारण, चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी लग्न करण्याचा विश्वास अक्षयने तिला देऊ केला होता.
 
 
 
 
खिलाडी कुमार आणि रवीना यांचं अफेअर सर्वज्ञात झाल्यानंतर हे दोघंही विवाहबंधनात अडकणार असं अनेकांनाच वाटत होतं. पण, बॉलिवूडच्या या जोडीमध्ये एकाएकी दुरावा आला. ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षयचं नाव अभिनेत्री रेखासोबत जोडलं गेलं. या चित्रपटातील एका गाण्यावरुन रवीनासोबत अक्षयचं भांडणही झालं होतं. (त्या गाण्यात खिलाडी कुमारसोबत रेखा यांची काही रोमॅण्टीक दृश्य चित्रीत करण्यात येणार होती.)
रेखा आणि अक्षयच्या नावाच्या वाढत्या चर्चा पाहता रवीनासोबतच्या त्याच्या नात्याला तडा गेला. इथे प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देत रेखा- अक्षयने याविषयी बोलण्यास स्पष्ट नकारही दिला होता. या बहुचर्चित प्रेमप्रकरणामध्ये रवीनाने तिच्या आणि अक्षयच्या नात्यात आलेल्या दुाव्यासाठी रेखा यांनाच दोष दिला होता. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केल्यानुसार रवीनाने अक्षय- रेखा आणि सुश्मिता सेन यांना एकत्र पाहिलं होतं. मुख्य म्हणजे रवीनाने काही कार्यक्रमांमध्ये सुद्धा तिच्या आणि अक्षयच्या नात्याविषयी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं होतं. अक्षयसोबतच्या नात्याविषयी एका मुलाखतीत रवीना म्हणाली होती, ‘वारंवार विविध अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेल्यामुळे मला माझ्या एका पत्रकार मित्राने सजग राहण्याचा इशारा दिला होता. पण, प्रत्येकवेळी मी त्याला माफ करेन अशीच त्याची अपेक्षा असायची. जवळपास तीन वर्ष हे असंच सुरु होतं.’ नंतरच्या काळात अक्षय कुमारचं शिल्पा शेट्टीशीही नाव जोडलं गेलं होतं.
रवीनाने नंतर अनिल थंडानीशी लग्न केलं तर अक्षय ट्विंकल खन्नाशी विवाहबद्ध झाला. या दोघांचं वैवाहिक आयुष्य उत्तम सुरू असून आतासुद्धा ते एकमेकांच्या समोर येणं किंवा एकत्र चित्रपट करणं टाळतात.