प्रात की ही ओर है रात चलती...

    दिनांक :01-Jan-2020
यथार्थ 
श्याम पेठकर 
 
 
ही बॅटन रीले आहे. सुरुवातीच्या हातात निरोपाचे बॅटन असते. मध्ये नेमक्या वळणावर बॅटन घेणारे सहकारी मिळतात ते निरोपाचे वळण असते. ते महत्त्वाचे असते. नेमक्या वेळी आणि नेमक्या ठिकाणी हे निरोपाचे वळण आले, तर नवी सुरुवात आणि नेमका शेवट चांगला होऊ शकतो. अंतरेषा सर्वात आधी छेदणारा विजेता ठरत असतो... आयुष्याचेही असेच असते का?
 
 
आता वर्ष संपते आहे आणि नेमके नवे वर्ष सुरू होते आहे. मग वर्ष संपते आहे की सुरू होते आहे? बरे, संपणारे आणि सुरू होणारे हे वर्ष काय पहिले आहे का? तरीही आपण प्रारंभ आणि अंताचे असे काळानुसार तुकडे पाडत असतो. पळ, क्षण, मिनीट, तास, दिवस, महिना, वर्ष... सगळेच कसे सुरू होते आणि नियमानुसार संपतही असते. प्रारंभाचा जल्लोष आणि अंताचे सुतक पाळतो आपण. ‘का?’... याचे काही उत्तर नाही. मुळात, ‘का?’ असे विचारायचेच नसते. व्यवस्थेला ते आवडत नाही. व्यवस्था आदेश देते, ऐकून घेत नाही. याचा अर्थ, व्यवस्थेला कान नसतात असे नाही. असतात, पण ते व्यवस्थेला हवे तेच आणि तितकेच ऐकायला असतात. त्यामुळे व्यवस्था ‘का?’ असे न विचारणार्‍यांच्या पिढ्या तयार करत असते. तो असे का विचारतो, त्याचा लौकिक अर्थाने अंत होतो, मात्र अलौकित्वाच्या पातळीवर तो टिकून राहतो. कायम, अनंतापर्यंत... ज्याचा ‘का?’ खूप बुलंद आणि व्यवस्था हलवून टाकणारा, नवी व्यवस्था निर्माण करणारा असतो, तितका दीर्घ काळ तो अलौकित्वाने जिवंत राहतो... ‘कोको’ हा अॅनिमेटेड चित्रपट पाहिला. त्यात त्या लहानग्या मुलाला गिटार वाजवायची असते. त्याला आवड, नव्हे, वेडच असते. त्याची आजी म्हणते, नाही, आपल्या घराण्यात कुणीही संगीताच्या वाट्याला जायचे नसते... नाहीच!
 
 
तिथे मग ‘का?’चा जन्म होतो. का? असे मनात आले की माणूस उत्तराच्या शोधात लागतो. क्रांती करतो. या मुलाचाही उत्तराच्या शोधात प्रवास सुरू होतो. भारतात जसे पितृमोक्ष अमावास्या िंकवा तसले दिवस असतात पितरांची आठवण करण्याचे तसा तिकडे एक उत्सव असतो. त्या दिवशी पितरांची आठवण काढतात. स्मृतींचा उत्सव असतो तो. त्या दिवशी या मुलाला कळते की, आपले आजोबा गिटारिस्ट होते. तो मग पितरांच्या जगात त्यांचा शोध घ्यायला जातो. तिथे त्याचे आजोबा त्याला भेटतात. ते महान संगीतकार राहिलेले. तिकडे अशी श्रद्धा आहे की, ज्या व्यक्तीला मर्त्यलोकात लोकप्रियता आहे, त्याचे खूप स्नेहीजन आहेत, त्याची अवस्था परलोकात छान असते. म्हणजे इकडे त्याचे जितके स्नेही तितके त्याचे तिकडचे जीवन अलिशान...
 
 
सहज वाटलं की, त्यांची परलोकाची कल्पना थोडी वेगळी आहे. तिकडेही माणूस जिवंत राहतो, मात्र परलोक म्हणजे आपल्याला परका असणारा िंकवा आपल्याला परकी माणसं जिथे राहतात तो... तुमच्यावर उदंड प्रेम करणारी माणसं याच जगात असतील. परक्यांची, अनोळखींची िंकवा प्रेम न करणार्‍यांची संख्या अल्प असेल त्याचे आयुष्य यशस्वी असते. तुमचा स्वीकार बहुसंख्यकांनी केला असेल तर तुम्ही यशस्वी, सुखी... तुमच्याबद्दल चांगल्या कामना करणार्‍यांची संख्या जास्त, तर तुमचे आयुष्य सुखी... लतादीदी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आणि अशीच खूप सारी माणसे त्यांच्या चाहत्यांच्या सदिच्छांमुळे सुखी, यशस्वी... मग आपण आपल्या संपर्कातल्या व्यक्तींच्या गुणांचा, यशाचा स्वीकार केला, असूया, स्पर्धा ठेवली नाही तर तोही सुखी होईल. यशस्वी होईल. आपण तसे करत नाही. आपण ज्यांना मित्र म्हणतो, त्यांना आपण सखा मानत नाही. सख्यत्वच नसते. शुभेच्छा देतो, मात्र त्या वरवरच्या असतात. मनापासून हे केले तर अपयश कुणाच्या वाट्याला येणार नाही... नव्या वर्षात जाताना आणि या स्तंभाचा निरोप घेताना याचा स्वीकार केला, तर खर्‍या अर्थाने यथार्थ ठरावे!
 
 
 
मध्यंतरी एक लघुपट पाहिला. डेरेक्‌ क्रिस्टोफ्‌ नावाच्या नव्याच दिग्दर्शकाने केला आहे. त्याला ऑस्कर पुरस्कार होता, हे त्याच्या दर्जाबद्दल सांगायला पुरेसे आहे.  'मिंडेकी' त्या लघुपटाचे नाव. एका शाळेतली ही छोटी गोष्ट आहे. एक नवीच मुलगी त्या शाळेत येते. छान गाते, असे तिचे वडीलच सांगतात म्हणून मग तिला शाळेच्या क्वायर ग्रुपमध्ये घेतात. पहिल्याच दिवशी गाण्याची तालीम झाल्यावर तिची टीचर तिला थांबवून सांगते, ‘‘बेटा तू सुरात नाहीस... त्यामुळे तू गाऊ नकोस. क्वायर ग्रुपमध्ये राहा. स्पर्धेलाही ये, पण केवळ ओठ हलवायचेस. गाणे म्हणायचे नाहीस. इतरांना हे सांगायचेही नाहीस...’’ तिला वाईट वाटतं.
 
 
त्यांच्या त्या ग्रुपमध्ये लीिंडग िंसगर असलेली मुलगी तशी बंडखोर आहे. तिच्याशी हिची छान मैत्री झालेली. तिच्या लक्षात येतं की ही गात नाही, नुसते ओठ हलविते. ती विचारते. मग अगदीच अगतिक होत ही खरे काय ते सांगते... मग ती बंडखोर मुलगी तालीम करताना लक्षपूर्वक पाहते, तर तिच्या लक्षात येतं की, 50 पैकी अगदी दहा-बारा विद्यार्थीच गातात, इतर सारे लीप िंसगच करतात. ती मॅडमना विचारते. मॅडम तिला सांगतात, बेटा आपल्याला स्पर्धा िंजकायची आहे... पण, या मुलांचे गाणे कसे सुधारणार? ते चांगल्या गळ्याचे आहेत, त्यांचा गळा सुरात कोण लावणार? तिचे सगळेच प्रश्न व्यवस्थेला ‘का?’ असे विचारणारेच... शिक्षिका ही व्यवस्थाच. ती तिला धमकावते. निघून जा म्हणते आणि मग तिची गरज असल्याने चुचकारते... व्यवस्था असेच करते. एकतर का? असे विचारणार्‍याला बाहेर करते, संपविते िंकवा मग त्याची गरज असेल, तो बुलंद असेल थोडाही, तर मग त्याला आपला एक भाग करून घेते... म्हणून शिक्षिका तिला चुचकारते. सांगते की, आपल्याला स्पर्धा िंजकणे महत्त्वाचे आहे. या मुलांच्या गाण्यातील प्रगतीचे आपल्याला काय करायचेय्‌? तुझी झालीय्‌ ना प्रगती गाण्यात...
व्यवस्थेने असा मान दिला खोटा तर तिथे अनेकांनी क्रांती संपत असते, थोडके असे असतात की, ते तिथून खरा लढा लढायला सुरुवात करतात. ही त्यातलीच. 
 
mindeki _1  H x
 
 
ती क्वायर ग्रुपमधल्या सगळ्या मुलांना खेळता, बोलता काही सांगते आणि क्यालमॅक्सला अंगावर शहारे येतात, असेच ते बंड असते. पूर्ण अहिंसक, रक्तपात तर दूरच, अगदी अश्रुपातही न होणारा लढा... स्पर्धेच्या मंचावर सगळीच मुले, अगदी पन्नासही मुले- मुली सगळेच केवळ ओठ हलवितात. गात कुणीच नाही. शिक्षिका समोर उभी राहून गायला सांगते, वारंवार संगीतकाराची छडी हलविते... कुणीच गात नाही. शिक्षिका मग रंगमंचावरून बाहेर जाते नि मग सगळीच मुले एका सुरात गायला सुरुवात करतात तेव्हा सगळे सभागृहच उभे राहते!
 
 
 
गेल्या वर्षात देशाच्या पातळीवर सामाजिक आणि राजकीय विरोध उभा राहिला. कुठल्या नव्या कायद्याला विरोध होता, तो समजातून- गैरसमजातून होता. कधी गोवंशाच्या हत्यांच्या संदर्भातील कायद्यालाच विरोध केला गेला. कधी दलितांवर अत्याचार होत आहेत म्हणून, तर कधी कुठले कलम हटविले म्हणून... तुम्ही बुद्धिवादी आहात तर मग त्याच पद्धतीचा विरोधही केला जायला हवा. आम्ही बसेस जाळतो, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतो. अगदी माणसेही मारली जातात. माणसांच्या हक्कासाठीच लढा देताना माणसे कशी काय मारली जातात? व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची भाषाही तसलीच असायला हवी ना. तुम्ही का? असे विचारलेच पाहिजे. त्याला व्यवस्थेने विरोध केला, तर तिथेच लढ्याची ठिणगी पडत असते, पण का, असे विचारण्याच्या आधीच तुम्ही पेटवून टाकता... मग अशा पेटवापेटवीलाच ‘का?’ असे विचारण्याची वेळ येते. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेत जे सांगितले ते वास्तव आहे, हे लक्षात ठेवायला हवे. लढणार्‍यांनीही आणि व्यवस्थेनेही...
 
 
 
प्रात की ही ओर है रात चलती
कौन बदलता है रंगमंच
इतनी खुबीयों के साथ
वह निशाका सपना था या
अपने आप पर कीया था
गजब का अधिकार तुमने?
 
 
रात्रीचा प्रवास सुरू झालेला असतो, ती अनंत नसतेच, दिवसही अक्षय नसतो... रात्र सरते आणि दिवस उगवणारच असतो. तुम्ही काहीही केले नाही, तरीही व्यवस्थेला बदलावे लागणारच असते, मात्र अंधाराच्या विरोधातला लढा आणि नव्या प्रकाशासाठी लढतो आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे!