ॲण्टी सोशल पर्सनॅलिटी डिस्‌ऑर्डर

    दिनांक :10-Jan-2020
मनीषा सोमण
 
आबा, तुम्ही खरंच इंजिनीअर आहात का हो? माझा बारा वर्षांचा भाचा, माझ्या वडिलांना स्वीच ऑफ झालेला मोबाईल ऑन करता येत नाही हे बघून विचारत होता. ते ऐकून गंमत वाटली. बाबांचं मोबाईल अज्ञान हा घरात गमतीचा विषयच झाला होता. त्यांच्या नातवानं विचारलं तेव्हा वाटलं, खरंच नोकरीत असताना इतके मोठे महत्त्वाचे प्रोजेक्ट करणारे बाबा आता मोबाईल, कॉम्पुटरपासून चार हात दूर राहतात. रोज बाहेर निघताना मोबाईल घेण्याची त्यांना आठवण करून द्यावी लागते. तेच स्वयंपाकघरापुरतंच जग असणारी माझी आई व्हॉट्सॲपवर मस्त गप्पा मारते, फेसबूकवर ॲक्टिव्ह असते. डोक्यात घोळत असणारा हा विषय मैत्रिणीबरोबर गप्पा मारताना निघाला तेव्हा लक्षात आलं, माझ्याच नाही तर बर्‍याच मैत्रिणींच्या वडिलांची-सासर्‍यांची हीच परिस्थिती होती. कोणत्याही नवीन गोष्टींपासून ते दूर राहणंच पसंत करतात. 

disorder_1  H x 
 
 
त्यानंतर हा विषय मनात रेंगाळत राहिला. आयुष्यभर नोकरी केलेले, जबाबदार्‍या पार पडणारे पुरुष ठरावीक वयानंतर सगळ्यातून अंग काढून का घेत असावेत? या प्रश्नाचा मागोवा घेताना पंचावन/साठीच्या सुमारास िंकवा त्यानंतर बहुतांश पुरुषांमध्ये निर्माण होणार्‍या मानसिक अवस्थेविषयी समजलं... ॲण्टी सोशल पर्सनॅलिटी डिस्‌ऑर्डर. प्रापंचिक जबाबदार्‍या संपल्या की, पुरुष स्वतःला नवीन जबाबदारी घेण्यापासून दूर ठेवतात. त्यांना त्यांच्या मर्जीनुसार, त्यांच्या वेगानं आयुष्य जगायचं असतं. कुठलीही स्पर्धा, वेग त्यांना नको असतो.
 
 
म्हणूनच तर आधी बाहेर पडले की, ताडताड बायकोच्या पुढे जाणारे पुरुष ठरावीक वयानंतर बायकोच्या बरोबर, कधीकधी तर मागे पडलेले दिसतात. नवरा बायकोपेक्षा वयानं मोठा असतो म्हणून तो शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही कमजोर होतो, असं समजलं जातं. पण ते खरं नसतं. या मानसिक अवस्थेमुळे ते आपल्या वेगानं जगणं पसंत करतात. आयुष्यभर बायको-मुलं-आई-वडील यांची जबाबदारी घेतलेले हे पुरुष आता लहानसहान गोष्टीत बायको-मुलंच नाही, तर अगदी नातवंडांवरही अवलंबून राहाणं पसंत करतात.
 
 
या मानसिक अवस्थेत त्यांचं वागणं टोकाचं असतं... एक तर ते खूप चिडचिडे, किरकिरे होतात. इतरांवर उगाच हुकूम सोडू लागतात, इतरांवर सतत खेकसणं, ओरडणं हा त्यांचा स्थायीभाव होतो. आणि त्यांना त्यांच्या या वागण्याचा काही पश्चात्तापही नसतो. अशा लोकांना किरकिरा म्हातारा म्हणून हिणवलं जातं.
 
 
किंवा अशा परिस्थितीत ही माणसं एकदम अंतर्मुख, निराश होतात. कोणाशी काही बोलत नाहीत, चार लोकांत मिसळत नाहीत. आपल्या वागण्यानं कोणाला काही त्रास होणार नाही ना, या विचारानं त्रस्त असतात. अशी सतत दुर्मुखलेली माणसं घरात नकोशी असतात.
 
 
पण, या वयात या दोन्ही अवस्था त्यांच्या प्रकृतीसाठी ठीक नाहीत, हे लक्षात घेणं जास्त महत्त्वाचं असतं. अशा अवस्थेत त्यांच्या भोवतालच्या लोकांनीच त्यांना समजून घेणं गरजेचं असतं. बायकोनं गप्पा मारण्यासाठी त्यांच्यासाठी वेळ काढणं, मुलांनी त्यांना आवर्जून डॉक्टरकडे घेऊन जाणं, त्यांची आपल्या मित्रांशी ओळख करून देणं, विचारपूस करणं, नातवंडांना निरर्थक वाटावेत अशा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं, मुली-सुनेनं आठवणीनं त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ करून वाढणं... इतक्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात त्यांच्या. त्या पूर्ण केल्या तर तेही नव्यानं जगू शकतील, कदाचित्‌ नव्यानं आयुष्यात रस घेऊ शकतील.