दुसर्‍याला शहाणपणा सांगण्यापूर्वी...

    दिनांक :10-Jan-2020
 दीपक वानखेडे
 
एक बाई आपल्या लहान तोतड्या मुलाला घेऊन तिच्याच कॉलनीतल्या एका वयोवृद्ध तोतड्या दुकानदाराच्या दुकानात गेली. दुकानात गेल्यानंतर तिचा मुलगा मागणी करू लागला- ‘‘आई, मदा बित्तीत पायदे’’ (आई मला बिस्कीट पाहिजे.) त्याचं बोलणं ऐकून तो वयोवृद्ध दुकानदार हसून त्या बाईला म्हणाला- ‘‘याती भाता थमदत नायी बलोबल’’ (याची भाषा समजत नाही बरोबर!) ती बाई त्याला म्हणाली- ‘‘हो ना काकाजी, हा अगदी तुमच्यावरच गेला आहे.’’ तिला राग आला आहे, हे त्यानं ओळखलं आणि मग थोडा सावरून म्हणाला- ‘‘म्हंदे, तसा लवकलच बोलन म्हना हा बलोबल. (तसा लवकरच बोलन म्हणा हा बरोबर!) ती बाई त्याला म्हणाली- ‘‘आता काय सांगावं काकाजी, तुमचीच तर स्मशानात जायची वेळ आली, तरी तुम्ही बोलत नाही बरोबर, माझ्या लहानशा मुलाकडून मी काय अपेक्षा करू ?’’ तिचं ऐकून तो दुकानदार चूपच झाला. तसं त्या दुकानदाराचं काही चूक नव्हतं. पण त्याचा बोलण्याचा टोन बरोबर नव्हता. तो आपल्या मुलाला हिणवत आहे, असा गैरसमजच त्या बाईचा झाला. आणि तिनं अशी उत्तरे दिली. आणि त्यातल्या त्यात तो माणूस स्वत: तोतडा असल्यामुळे त्याला हा शहाणपणा सांगायचा अधिकार नाही, असं तिला वाटलं असावं. 
 
shaha_1  H x W:
 
 
एका ऑफिसमध्ये ऑफिसरनं नियम काढला, की- आपल्या ऑफिसमध्ये कुणी फेसबुक चालवणार नाही. आणि जो चालवेल त्याला मी घरी पाठवीन. असा नियम काढल्यानंतरही ते ऑफिसर मात्र स्वत: फेसबुक चालवत होते. आणि ऑफिसमधली तीन चार कर्मचारीही. बाकीच्या लोकांच्या हे लक्षात आलं. तेव्हा फेसबुक न चालवणार्‍या एका कर्मचार्‍यानं फेसबुक चालवणार्‍याा त्या तीन-चार कर्मचार्‍यातील एकास ‘चाय पे चर्चा’ करीत विचारलं. साहेबांनी फेसबुक चालवायचं नाही, असा नियम काढल्यानंतरही साहेब स्वत: फेसबुक चालवतात आणि तुम्ही तीन-चार लोकंही ऑफिसमध्ये तेच धंदे करता. तुम्हाला भीती नाही वाटत ?
 
 
या प्रश्नावर उत्तर देताना तो फेसबुक चालवणारा कर्मचारी म्हणाला- अरे साहेब फेसबुक चालवतात म्हणूनच आम्हीही चालवतो.
मला कळलं नाही..
 
आता हे बघ, साहेब नेहमी त्यांच्या सडक्या पोस्ट टाकतात आणि त्यांच्या पोस्टवर आम्ही त्यांना छान छान कमेंट लिहितो. मग कमेंटवर चर्चा चालते.
 
पण हे योग्य आहे का ?
आम्हाला काय माहीत योग्य आहे की नाही ? आम्ही जर साहेबांना कमेंट लिहिले नाही तर साहेब आम्हाला कॅबिनमध्ये बोलवतात आणि म्हणतात- देखी क्या मेरी पोस्ट ? अरे कुछ कमेंट वमेंट लिखो उसपर अच्छे!
मग आम्ही म्हणतो सर, काम है ना अब, तर ते म्हणतात काम तो चलता रहेगा, जावो कमेंट लिखो शेअर करो मेरी पोस्ट. पाहता पाहता ही वार्ता सर्व कर्मचार्‍यांना समजली आणि मग सर्व कर्मचार्‍यांनी त्या साहेबांना रिक्वेस्ट पाठूवन त्यांच्या पोस्टवर कमेंट लिहिणं सुरू केलं. दिवसभर सार्‍या ऑफिसमध्ये आता फेसबुकच चालते.
 
 
या दोन्ही वेगवेगळया उदाहरणांवरून आपल्याला हेच समजते, की- काही लोकं ऊठसूट इतरांना सल्ले द्यायला लागले आहेत. आपला अधिकार गाजवायला निघाले आहे. इतरांच्या चुका काढायला लागले आहेत. आपण स्वत: कोणत्या परिस्थितीत आहो, आपल्या बुृडाखाली किती अंधार आहे, याचा विसर बर्‍याचजणांना पडत चालला आहे. यामुळे त्यांना उलट उत्तर मिळतात. दुसर्‍यांच्या नजरेत त्यांचा जो मान असतो, तो संपून जातो. तर काही लोकं काही ॲडजेस्टमेंट करून त्यांना काय हवं नको पाहून त्यांना आपल्या ताब्यात करून घेतात.
 
 
जगाच्या पाठीवर आजवर आपण अनेक खेळातील चुरशीचे सामने पाहिले आहे. त्यात त्या संघाचाच विजय झाला ज्याचा कर्णधार हा ताकदीचा आणि स्वत:च्या जबाबदार्‍या पाळणारा शिस्तप्रिय आहे. ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यातही तो अगदी मोजून शब्द वापरतो. अशाच लोकांची किंमत होते. आणि त्यांच्या नेतृत्वातच काहीतरी चांगले कार्यही होते. पण अशा ग्रेट लोकांकडून आज काही शिकल्या जात नाही. दुसर्‍यावर फुकटचा अधिकार गाजवणे, दुसर्‍याला हिणवणं याचत काही लोकाचा बराच वेळ जातोय्‌. याचा तोटा म्हणजे- एकमेकांच्या नजरेतून माणसं उतरायला लागली आहेत. त्यामुळे दुसर्‍याला काही बोलण्यापूर्वी आपली स्थिती पडताळून पाहणं गरजेचं आहे. इतरांना चांगलं वागायला लावण्यापूर्वी आपली वागणूक कशी आहे, याचा विचार करून ती सुधरवणं गरजेचं आहे. ती आज काळाची गरज आहे.
9766486542