जेंडर सेंसेटायझेशन

    दिनांक :10-Jan-2020
माधुरी साकुळकर
9850369233 
 
लिंगसमानता प्रस्थापित करण्याचे साधन म्हणजे जेंडर सेंसेटायझेशन. साचेबंद स्त्री-पुरुष प्रतिमा तोडणं म्हणजे जेंडर सेंसेटायझेशन. नैसर्गिक भेद सोडल्यास बाकी सर्व भेद मानवनिर्मित आहेत. स्त्रिया अशा असाव्यात, पुरुष असे असावेत, त्यांनी असं वागायला पाहिजे, हे कुणी ठरवलं? केव्हा ठरवलं? आणि आज ते उपयुक्त आहे का? याची डोळस चिकित्सा म्हणजे जेंडर सेंसेटायझेशन! 
 
ling _1  H x W:
 
 
लिंगसमानता हा शब्द 1995 साली बीजिंग प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन, या चौथ्या जागतिक महिला परिषदेत वापरला गेला. नंतर या शब्दाची चर्चा, अर्थ, त्यासाठी धोरणं ठरवणं सुरू झालं. सेक्स आणि जेंडर असे दोन शब्द आहेत. सेक्स जीवशास्त्रीय आहे तर जेंडर सामाजिक, सांस्कृतिक घडण आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. त्यातल्या 22 सारख्याच असतात. एकच गुणसूत्राची जोडी वेगळी असते. द द गुणसूत्र असल्यास मुलगी जन्माला येते, तर द ध गुणसूत्र असल्यास मुलगा. केवळ एका गुणसूत्रामुळे असा कितीसा फरक असणार? पण, आपल्याकडे स्त्री-पुरुष भेदाचा नको तितका बाऊ केला जातो.
 
 
खाली काही वाक्ये आहेत, त्यावरून आपल्याला सेक्स आणि जेंडरमधला फरक कळू शकेल :
  1. स्त्रिया मुलांना जन्म देतात - सेक्स.
  2. त्या बालसंगोपन जास्त चांगल्या रीतीने करू शकतात - जेंडर.
  3. पुरुष रडू शकत नाही - जेंडर.
  4. पुरुष घराचा पोशिंदा आहे - जेंडर.
  5. स्त्रिया भित्र्या असतात - जेंडर.
  6. स्त्रिया बाळांना दूध पाजतात -सेक्स.
  7. त्या गरोदर राहतात - सेक्स.
  8. स्त्रियांना घर सांभाळलंच पाहिजे - जेंडर.
  9. पुरुष रागीट असतात - जेंडर.
स्त्री-पुरुष भेद हा संस्कारांचा, पालकत्वाचा परिणाम आहे. आपण मुलींना खेळभांडी आणि बाहुली घेऊन देतो, तर मुलांना गाड्या, बंदुकी. जणू आपण तिला अप्रत्यक्ष शिकवतो, तुला हेच करायचे आहे. उलटं करायला काय हरकत आहे?
 
 
आपलं बोलणंही मजेशीर असतं. आपण मुलाला म्हणतो, ‘‘रडतोस का, मुलीसारखा? मुलांनी रडायचं नसतं. तू शूर आहेस ना?’’ तर मुलीला म्हणतो, ‘‘मोठ्याने हसू नको, पाय आपटत चालू नकोस.’’ थोडक्यात काय, तर ‘‘दबून राहा. तू झुरळाला भ्यालीस, अंधाराला भ्यालीस तर चालेल, मुलींनी असंच असायला पाहिजे.’’ आपल्या मनात असलेल्या साचेबंद प्रतिमांमध्ये आपण आपल्या मुला-मुलींना बसवायचा प्रयत्न करतो.
 
 
या भेदाचा चिकित्सक अभ्यास करणारी दोन पुस्तकं सध्या गाजताहेत. ‘मेन आर फ्रॉम मार्स अॅण्ड विमेन आर फ्रॉम व्हिनस.’ जॉन ग्रे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात काही गमतीदार गोष्टी सांगितल्या आहेत. पत्ता शोधायचा असेल तर पुरुष वेळ, पेट्रोल खर्च करतील, कुणाला विचारणार नाहीत. कुणाला विचारणं त्यांना कमीपणाचं वाटतं, तर बायका पटकन कुणाला तरी विचारून मोकळ्या होतील. एखादं संकट आलं, प्रश्न पडला तर पुरुष गुहेत जातात (एकटेच उत्तर शोधतात), तर बायका पाणवठ्यावर जातात (बोलून दुसर्‍यांकडून उत्तर मागवतात, मोकळं होतात). याचा अर्थ असा नाही की, दोघं दोन वेगवेगळ्या ग्रहांवरून आलेत. पण, शांततापूर्ण सहजीवनासाठी, सहअस्तित्वासाठी, एकमेकांसाठी काय आणि किती बदलणं आवश्यक आहे, हे सांगितलेलं आहे. कोणत्या गोष्टी बदलू शकतात, कोणत्या नाही, हे आधीच माहीत असलं, तर नवरा-बायको एकमेकांना बदलण्याचा फारसा प्रयत्न करणार नाहीत.
 
 
‘व्हाय डोण्ट मॅन लिसन अॅण्ड व्हाय विमेन काण्ट रीड मॅप्स’ हे ॲलन आणि बार्बरा पिसचं पुस्तक आहे. त्यात ते म्हणतात- ‘‘आम्ही जे काही आहोत ते आमच्या हार्मोन्समुळे. आम्ही आमच्यातल्या केमिस्ट्रीमुळे आणि गर्भशयातल्या आमच्या मेंदूच्या वायरिंगमुळे आहोत. आम्ही वागतो आणि विचार करतो ते आमच्यातल्या हार्मोन्सच्या परिणामामुळे.’’ जीवशास्त्रीय गोष्टी बदलू शकत नाही, पण ज्या सांस्कृतिक आणि सामाजिक गोष्टी आपण बदलू शकतो त्यावर काम करणे आवश्यक आहे. ‘‘तू मुलगा आहे, म्हणून असा वागं,’’ ‘‘तू मुलगी आहे म्हणून अशी वाग,’’ ही वाक्यं बदलून, व्यक्ती अशी असायला पाहिजे, ही मूल्ये, हे सद्गुण सगळ्यांमध्ये असायला पाहिजे आणि हे दुर्गुण कुणातच नको, अशी मांडणी करायला पाहिजे.
 
 
टेस्टेटेरॉनमुळे मुले आक्रमक असतात. जितकी टेस्टेटेरॉनची मात्रा अधिक तितकी मुले जास्त आक्रमक. ज्या स्त्रिया अधिक यशस्वी, कर्तबगार असतात, त्यांच्यात इतर स्त्रियांच्या तुलनेत टेस्टेटेशनची पातळी थोडी अधिक असते.
इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनमुळे स्त्रिया मातृत्वाची जबाबदारी जास्त चांगल्या रीतीने पार पाडू शकतात.
 
 
पुरुष नोकरी करण्याला अधिक महत्त्व देतात, तर स्त्रिया कामापेक्षा नातेसंबंधांना. स्त्री जर नातेसंबंधात खूश नसेल तर तिचं कामात लक्ष लागत नाही. उलट, पुरुष कामाबाबत समाधानी नसेल तर त्याला नातेसंबंधात रमणं जमत नाही.
पुरुषांच्या वजनापैकी 42 टक्के वजन हे स्नायूंचं असतं, तर स्त्रियांच्या बाबतीत हे प्रमाण 36 टक्के असतं. त्यामुळे शारीरिक ताकदीमध्ये फरक पडतो.
 
 
स्त्रियांचा मेंदू पुरुषांच्या मेंदूपेक्षा आकाराने लहान असतो. पुरुषांच्या मेंदूत स्त्रियांच्या मेंदूपेक्षा चार शतलक्ष पेशी जास्त असतात, पण त्यामुळे बुद्धीवर मात्र परिणाम होत नाही.
 
 
लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या काळात दोघांची कामं निराळी होती. त्यामुळे तसंतसं अनुकूलन होतं गेलं.
पुरुष हा शिकारी, तर स्त्री ही घरटं सांभाळणारी, मुलांना जन्म देणारी, संगोपन करणारी. त्यामुळे जीवनाकडे बघण्याचे दृष्टिकोन, प्राधान्यक्रम वेगळे होते. शिकारीसाठी लागणारी तीक्ष्ण नजर, वेग, ताकद, लढवय्यावृत्ती, कणखरपणा पुरुषांत निर्माण झाला्‌ तर वात्सल्य, प्रेम, चिकाटी, सहनशीलता, चौफेर नजर, संवाद साधण्याचं कौशल्य, समोरच्या माणसाच्या मनातलं जाणून घेणं, सिक्ससेन्स हे शक्य झालं. चव, स्पर्श, गंध याची तीव्र जाण, शब्दांच्या पलीकडलं कळणं, ‘रीडिंग बिटविन द लाइन्स’ हे स्त्रियांना जास्त जमतं.
 
 
मेंदूच्या दोन्ही गोलार्थांना जोडणारा कॉर्पसकॅलो स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा 30 टक्के मोठा असतो. त्यामुळे त्या दोन्ही गोलार्धातली माहितीची देवाणघेवाण अधिक वेगानं करू शकतात.
 
 
पुरुषांच्या मेंदूचा उजवा गोलार्ध अगोदर व झपाट्यानं विकसित होतो. त्यामुळे आकार, आकृती, अंतर, अवकाश यांच्या संवेदना, मितीज्ञान पुरुषांचं अधिक असतं. तर्क आणि आकलन यात पुरुष उजवे असतात. मुलींमध्ये डावा गोलार्ध अधिक विकसित होतो, त्यामुळे त्या लवकर बोलतात. त्यांचा शब्दसंग्रह अधिक असतो. बायका जास्त बोलतात.
 
 
पुरुष एकावेळी एकच काम करू शकतो, तर बायका मल्टीटास्किंग करू शकतात. त्या टीव्ही पाहात असतात त्याच वेळी स्वयंपाक करीत असतात, त्याच वेळी फोनवरही बोलत असतात.
स्त्रियांना भाषिक आणि भावनिक गोष्टींमध्ये रस असतो. म्हणून त्या अभिनय, नृत्य, संगीत, कला, मानवी संसाधनाचा विकास, या गोष्टी चांगल्या करू शकतात.
 
 
पुरुषांना तांत्रिक, यांत्रिक गोष्टींमध्ये रस असतो. त्यामुळे ते गणित, विज्ञान, बुद्धिबळ, संगीत नियोजन, रॉकेट सायन्स या विषयात पुढे असतात.
स्त्रियांना नाती टिकवणं महत्त्वाचं वाटतं, तर पुरुषांना उद्धिष्ट गाठणं. स्त्रियांना सामूहिक कृती करायला आवडते, तर पुरुषांना एकट्यानं काम करणं आवडतं.
स्त्रियांचा कोणत्याही गोष्टींकडे पाहण्याचा इंटिग्रेटेड ॲप्रोच असतो, तर पुरुषांचा ॲनॉलिटिकल. दोन्ही गोष्टी आवश्यक आणि परस्परपूरक, परस्परपोषक आहेत, म्हणून एकमेकांच्या क्षमतांचा आदर करत, आरोग्यसंपन्न, न्याय्य, समानतेवर आधारित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे.