वाचन संस्कारांचं महत्त्व

    दिनांक :10-Jan-2020
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
 
काही वैयक्तिक कामानिमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथपाल मॅडमबरोबर बसले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांचा एक गट आला आणि त्यांनी ग्रंथपाल आणि उपग्रंथपाल मॅडमना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, एक गुलाबाचं फूल आणि छोटीशी भेटवस्तू दिली. शिक्षकदिनाला वाचनालयातल्या मॅडमना शुभेच्छा देताना या विद्यार्थ्यांनी खूप छान मनोगत व्यक्त केलं. त्यांच्या मते- विषय शिक्षक विषयांची ओळख करून देतात, तर वाचनालयातील शिक्षकेतर कर्मचारी हे महाविद्यालयात मिळत असलेल्या शिक्षणाला योग्य त्या पुस्तकं आणि ग्रंथांच्या माध्यमातून दिशा देत असतात. काय वाचायचं, कसं वाचायचं, संदर्भग्रंथ, त्यातून नेमके संदर्भ कसे शोधायचे, नोट्स कशा काढायच्या याचं मार्गदर्शन करणारा वाचनालयातील सगळा कर्मचारीवर्ग या विद्यार्थ्यांना शिक्षकच वाटला आणि म्हणून त्यांनाही शुभेच्छा दिल्या गेल्या. 

vachan _1  H x  
 
एक वाचनप्रिय शिक्षक म्हणून मला स्वत:ला त्यांची ही लहानशी कृती खूप सुखावणारी होती. माणसाला जगण्यासाठी जशी अन्न-पाण्याची गरज आहे, तशीच सुसंस्कृत मनाचीही गरज असते. त्यासाठी चांगल्या वाचनाचा छंद जोपासणे गरजेचे आहे. ते काम वाचनालयेच करत आली असून त्यानेच संस्कृतीची निर्मिती होते. असं म्हणतात, की- एखाद्या शहराचं सांस्कृतिक आरोग्य तपासायचं असेल, त्या शहराची सांस्कृतिक उंची पाहायची असेल, तर त्या शहरात ग्रंथालय आहेत का? त्यात किती पुस्तके आहेत? ती कोणत्या प्रकारची आहेत? हे आधी तपासलं जावं. कारण तिथे असणारी ग्रंथालयं व त्याचा लाभ घेणारे वाचक यांच्यावरच त्या शहराची वैचारिक व सांस्कृतिक जडणघडण अवलंबून असते. अगदी तसंच महाविद्यालयांच्या संदर्भात म्हणता येईल. महाविद्यालयांमध्ये असणार्‍या ग्रंथालयामध्ये बसून अभ्यास करणारे विद्यार्थी, त्यांना संदर्भग्रंथ, अभ्यासक्रमात असणारी पुस्तकं तत्परतेने, हसतमुखाने पुरवणारी ग्रंथालयातील मंडळी, ग्रंथालयात उपलब्ध असणारी ग्रंथसंपदा यावरच तर महाविद्यालयाचं शैक्षणिक यश अवलंबून असतं.
 
 
कोणतंही वाचनालय हे वर्धिष्णू म्हणजे वाढणारं असतं. याला महाविद्यालयातील ग्रंथालयंही अपवाद नाही. अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकं, ग्रंथांबरोबरच इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी लागणार्‍या साहित्याचा पुरवठा सातत्याने ही ग्रंथालय करत असतात. आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा अमेरिकन कॉन्सुलेट आणि ब्रिटिश लायब्ररीबरोबर करार झाला आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रंथालयांमध्ये उपलब्ध असणारी ग्रंथसंपदा विरारसारख्या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांना उपलब्ध होतात.
 
 
आधुनिक काळात वाचनाचा बदललेला पॅटर्न लक्षात घेऊन अनेक महाविद्यालयांच्या ग्रंथालयांनी आता ई-बुक्सही उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना इंटरनेटसारखी सुविधाही अनेक महाविद्यालयांमध्ये दिली जात आहे.
वाचन हे चिंतन जागृत करण्याचे साधन आहे. पुस्तक विचार करायला लावतं आणि शब्द विचाराला गती देतात. म्हणूनच वाचन करणं, ही गरज आहे आणि उत्तम विद्यार्थी घडावेत, यासाठी त्यांना वाचनालयांकडे वळवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असं मला वाटतं. याबाबतचा एक वैयक्तिक अनुभव या ठिकाणी नमूद करावासा वाटतो. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ॲप, इंटरनेट, ब्लॉगच्या माध्यमातून युवापिढी स्वत:चे विचार व्यक्त करत आहेत. इतरांचे विचार वाचत आहेत. समाजात घडण्यार्‍या चांगल्या-वाईट घटनांकडे आपापल्या दृष्टिकोनातून बघत, त्यावर आपली मते व्यक्त करत आहेत. अनेक जण तर ही मते व्यक्त करण्याआधी मूळ घटना काय आहे, ते नेटवर जाऊन तपासत आहेत. म्हणजे- आजची पिढी वाचत नाही, असं सरसकट विधान करणं खरं तर, नव्या पिढीवर अन्याय करणारंच आहे. मात्र अशा पिढीचे प्रतिनिधी अत्यल्प आहेत. बाकीचे आजही काय वाचायचं? यापेक्षाही का वाचायचं? याच प्रश्नात अडकलेले आहेत.
 
 
सुदैवाने पालक आणि शिक्षक दोघांनीही वाचनाचे संस्कार केलेले असल्यामुळे काय वाचायचं? कसं वाचायचं? याचं भान हळूहळू येत गेलं. मग हेच भान आपण आपल्या बीएमएमच्या विद्यार्थ्यांना का देऊ नये? यासाठी काय करता येईल? वाचनाची गोडी लागावी यासाठी अधिक सजगपणे कसं काम करता येईल? यावर विचार सुरू झाला. यातून काही कल्पना सुचल्या. त्यानुसार प्रत्यक्ष पुस्तकांची दुकाने असतात तरी कशी? हे दाखवण्यासाठी एका रविवारी बीएमएमच्या विद्यार्थ्यांची छोटीशी सहल दादरला घेऊन गेले. आयडिअल बुक डेपो, टिळक पुलाजवळील मॅजेस्टिक प्रकाशन, शिवाजी मंदिर येथील मॅजेस्टिक ग्रंथ दालन या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वत:ला पुस्तके हाताळून, थोडा वेळ वाचून ते विकत घ्यायचे का? यावर विचार करायला मिळाला.
 
 
आत्तापर्यंत पुस्तकांच्या दुकानात जायचे, आपल्याला हवे त्या पुस्तकाचे नाव सांगून, पैसे देऊन ते विकत घ्यायचे, अशीच सवय असलेले हे विद्यार्थी या दुकानांमध्ये पुस्तकांच्या गराडयात अक्षरश: हरवून गेले. काय बघू, काय नको, अशी त्यांची स्थिती झाली. प्रतिथयश लेखकांची उत्तमोत्तम पुस्तके प्रत्यक्ष हाताळायला मिळाली, म्हणून हे विद्यार्थी प्रचंड खूश झाले.
 
 
पुस्तकांच्या दुकानांनंतर मोर्चा निघाला तो नायगावच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागाकडे. मुंबईत फक्त मराठी पुस्तकांसाठी एवढा मोठा संदर्भ विभाग आहे आणि त्याचा अनेक विद्यार्थी, शिक्षक, सामान्य वाचक रोज उपयोग करून घेतात, याचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना बघायला मिळाले.
 
 
या संदर्भ विभागात असणारी अत्यंत दुर्मीळ पुस्तकं, वर्तमानपत्रे विद्यार्थ्यांना बघता आली, हाताळता आली. ‘विद्यार्थी जीवनात वाचनालयाचे महत्त्व!’ या विषयावर निबंध लिहिणारी ही मुलं, त्या दिवशी खर्‍या अर्थाने वाचनाचे आणि वाचनालयाचे महत्त्व समजून घेऊ शकली. या छोट्याशा सहलीने बीएमएम विभागातील वातावरणच बदलले.
 
 
शिक्षकांनी सांगितलेल्या संदर्भग्रंथांचा वापर वाढला. महाविद्यालयाच्या ग्रंथालयाबरोबरच दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागातही विद्यार्थी आवर्जून जायला लागले. अनेक संदर्भग्रंथांचे सविस्तर विवरण देऊन महाविद्यालयासाठीही ते ग्रंथ मागवून घ्या, अशी मागणी याच विद्यार्थ्यांकडून व्हायला लागली.
 
 
मो. रा. वािंळबे लिखित सुगम मराठी व्याकरणसारखे पुस्तक विद्यार्थ्यांनी विकत घेतले. त्यातील नियमांच्या आधारे आपले लेखन व्याकरणदृष्ट्या सुधारू लागले. प्रवीण, समई, ढालगज भवानीसारख्या मराठीतील शब्दांचे मूळ अर्थ काय? काळानुरूप त्यात कसे बदल होत गेले? एखादा शब्द-हस्व का? एखादा दीर्घ का? दीर्घ शब्द-हस्व झाला किंवा त्याच्या उलट झालं तर, शब्दाचा अर्थ कसा बदलतो? यांसारख्या विषयांवर वर्गात चर्चा होऊ लागली. त्यासाठी योग्य ते दाखले, योग्य त्या संदर्भग्रंथाच्या नावासकट विद्यार्थी देऊ लागले.
 
 
वाचन संस्कारांचं महत्त्व यातूनच हळूहळू संपूर्ण वर्गात झिरपत गेलं. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यासाठी तयारी करताना पुस्तकांची मदत घेतली जाऊ लागली. वाचन वाढले आणि मराठी बीएमएमच्या विद्यार्थ्यांचा एक वेगळाच ठसा महाविद्यालयात उमटू लागला. एका शिक्षकासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असेल?