किलबिलाट नाही शाळांमध्ये...

    दिनांक :10-Jan-2020
आनंद मोहरील
7218202502
 
 
कतेच जन्माला आलेले पोर रडले नाही की, घाबरगुंडी उडते त्याच्या पालकांची. डॉक्टरही गंभीर होतात आणि मग नवजात बाळाला चिमटा काढायला सांगितला जातो. आता कुणी म्हणेल हा काय अमानवीयपणा; पण पोर रडलेच नाही म्हणजे ते ‘ ॲब्नॉर्मल’ आहे, असे मानले जाते. रडणे, हसणे, बागडणे या नैसर्गिक कृती आहेत आणि त्या किती महत्त्वाच्या आहेत, हे चिमटे काढायला लावण्यावरून समजू शकते. निरनिराळ्या कृती करून बाळ ‘नॉर्मल’ आहे की नाही, हे तपासले जाते. चुटकी वाजवून, बाळ आवाजाच्या दिशेने पाहते किंवा नाही, हे पाहून त्याचे कान व्यवस्थित आहेत किंवा कसे, हे ठरविले जाते. लहान मुले देवाघरची फुले असेही म्हणतात.
 
 
आता चार पोरं जमली की गोंधळ घालणारच. अगदी शाळेत वर्गात शिक्षक नसताना पोट्टे धिंगाणा घालतात एखाद्या कॉलनीत, चाळीत... आता चाळी नाही राहिल्या; पण फ्लॅट स्कीम या चाळींसारख्याच झाल्या आहेत. त्यात सायंकाळी पोरांचा किलबिलाट सुरू असतो... असला पाहिजे. त्यावरून उगाच नाकं मुरडण्याचे काही कारण नाही. आमचे पोर घरात शांत बसून राहते मेणाच्या बाहुल्यासारखे, हा आजकाल सॉफिस्टिकेशनचा विषय मानला जातो; पण ते चुकीचे आहे. आता पोरं म्हटली की, गोंगाट ओघाने आलाच. एका जागी तासभर, काहीही उचापती न करता बसलेल्या मुलाला आतापर्यंत तरी मेंदाड म्हटले जायचे. खोड्या काढणे हा प्रत्येक मुलाचा स्वभाव असला पाहिजे... एकदम आयपर ॲक्टिव्ह असू नये. तरीही ॲक्टिव्ह आणि आयपर ॲक्टिव्ह यातला फरक कळणारे पालक किंवा प्रौढ हे सुजाण समजले पाहिजे. अर्थात, अतिशयोक्ती कुणीही मान्य करणार नाही. बालकृष्णाच्या लीलांनाही म्हणूनच मान्यता दिली गेली ना! कृष्णापासून त्रास असतानाही गोपिका मात्र त्याच्या चाहत्या होत्या, हे विशेष! श्रीकृष्णाने खोड्या काढल्या नाही की या गोपिकांनाही करमत नसे. गोकुळातच कुणाला ते सहन होत नसे. त्यांच्या खोड्यांना ‘लीला’ म्हटले गेले ना! 

active _1  H x  
 
ज्या घरात लहान मूल असेल त्याला गोकुळ म्हटले जाते. मुल घरात नसेल तर शांत वाटतं, मात्र ती शांतता नैसर्गिक वाटत नाही. घरात मोठी माणसे नसली तरी काही फरक पडत नाही. परंतु, घरातले एक लहान पोर नसले की घरातील वातावरण उदास होऊन जाते. हुंदडणे हा लहान मुलांचा स्वभाव असला पाहिजे. अर्थात, यावर आक्षेप घेणारे खूप निघतील. हुंदडणेचा शब्दश: अर्थ घेण्याचे कारण नाही. एखादी मोठी व्यक्ती हुंदडू शकते का? त्याने लहान मुलासारख्या खोड्या केलेल्या कुणाला आवडणार नाही, मात्र लहान मूल पोक्त माणसासारखे प्रौढ वागलेलेही खटकणारच. ते खटकत नसेल तर मोठ्यांची मानसिकता तपासली पाहिजे.
 
 
मोठ्यांचे जग वेगळे असते. लहानांचेही वेगळे असते. लहानांना त्यांचे लहानपण जगू दिले पाहिजे. मोठ्यांना संसार असतो. त्याचे गांभीर्य असते. अगदी समाजकारण, राजकारणातल्या सार्वजनिक जीवनातल्या प्रत्यक्ष संबंध नसलेल्या गोष्टींचाही मोठ्यांवर ताण येतो. अगदी दिल्लीतही काही घडामोड झाली, तणाव निर्माण झाला कुठेही, खून झाला शहरात आपल्या, तर त्याच्याशी आपला काहीही संबंध नसतानाही ताण येतो... वैयक्तिक आयुष्यातही ताण असतो. विविध कामे असतात. डोक्यावर असलेले विविध प्रकारचे टेन्शन्स- मुलाची शाळेची फी (खाजगी शाळेची), मोबाईलचे बिल, नवीन गाडीचा हप्ता, राहत्या घराव्यतिरिक्त घेतलेल्या फ्लॅटच्या कर्जाचा हप्ता, गृहिणी असलेल्या सौभाग्यवतीसाठी घेतलेल्या गाडीचा हप्ता एखाद्याला हुंदडू देईल का? कदापि नाही. सद्य:स्थितीत तरी गृहस्थाश्रमी व्यक्ती हुंदडू तर सोडा, आनंदी राहणे विसरून गेली आहे. मग माणसाने हुंदडायचे कधी? हाडे खिळखिळी झाल्यावर? सध्याच्या युगात विविध टेन्शन्समुळे तरुणाईही हुंदडणे विसरली आहे. म्हातारपणात हुंदडणे, एक तर वयाला शोभत नाही म्हणून व शरीर साथ देत नाही म्हणून शक्य होत नाही. मग जीवनाचा आनंद लुटायचा कधी? बालपणीच ना! पण, सध्याची पोरंही सुतकी चेहर्‍याची दिसतात. त्यांच्यावर कसलातरी अदृश्य ताण असतो. शाळेत आनंदी शिक्षण प्रणालीच्या चर्चा होतात, शाळेच्या बाहेरही लहानांच्या आनंदाचा विचार केला जायला हवा.
 
 
सकाळी फेरफटका मारायला निघाले ना की, पोट्ट्यांवर पहाड तुटून पडल्याचेच जाणवते. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर या भारत देशाची काळजी कुणी करीत असेल तर शाळेतले हे बांडुकले पोट्टेच करीत असल्याचे वाटायला लागते. शाळेच्या बसेसची वाट पाहात उभे असलेल्या प्रत्येक मुलाकडे बारकाईने पाहा. भारत देशाची सारी काळजी या पोरांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसून पडते. ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ -महानगरपालिकेच्या शाळेत मास्तरीणबाई हमखास सांगायच्या. सकाळी खाजगी शाळेत शिकणारी मुले पाहा, न सांगताच ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ अशा स्थितीत दिसतात. इतके पडलेले चेहरे असतात त्यांचे की विचारायची सोय नाही. एक तर सकाळची शाळा, वेळेअभावी आईने डबा दिलेला नसतोच, 10 किलोमीटर दूर अंतरावरील शाळेत जायचे असते, शाळेतून घरी आल्यानंतर सुग्रास जेवण (आई भिसीच्या पार्टीला गेली असेल तर) मिळेलच याची शाश्वती नाही, शाळेत भरमसाट अभ्यास, प्रोजेक्ट, स्पर्धा... टक्केवारी मिळावची अन्‌ डॉक्टर- इंजिनीअर होत पालकांची स्वप्नं पूर्ण करण्याचा ताण... मला सांगा, पोरं बागडणार कुठून हो? खेळणे, बागडणे हा प्रकार आता लुप्तच झाला आहे.
 
 
सार्‍या विश्वाची चिंता करणारी पोरे यापूर्वी जन्माला आली असती ना, तर भारत देश केव्हाच विश्वगुरू झाला असता! दुर्दैव भारताचे, आता ही पिढी आता जन्माला येऊ लागली आहे. सकाळी फिरायला गेल्यावर याचा अनुभव येतो. एखाद्या साहेबाला शोभेल असा पेहराव- युनिफॉर्म, पायात जोडे-मोजे, टाय, अंगावर न पेलणारे दप्तराचे ओझे व निस्तेज चेहरा, असे काहीसे वर्णन शाळेत जाणार्‍या शहरातील सोकॉल्ड ‘वार्ड’चे करता येईल. या साहेबाच्या पोराच्या डब्यात मॅगी, नाही तर तयार पाकिटातले खाद्य... चिवडा, कुरकुरे. कॅलरीज मिळतील कुठून? पोट्ट्यांचे चेहरे सुकणार नाही का? मायाच उठत नाहीत. बिच्चारे पोट्टे करतील तरी काय? अजून एक गोष्ट या पोरांच्या बाबतीत आश्चर्यकारक आहे. ही पोरं शाळेत मात्र नियमित जातात. काही वर्षांपूर्वी आई नाही तर बाबा शाळेत सोडायला जायचे. शाळेत पोहोचल्याबरोबर पोट्टं भोंगाडा पसरे, ‘‘मी नाही जात...’’ मास्तरीणबाई पोराला अक्षरश: खिचायच्या. ‘‘तुम्ही निघून जा. आम्ही पाहून घेऊ,’’ असा विश्वास मास्तरीणबाई द्यायची.
 
 
थंडीच्या दिवसांत उशीर झाला की मात्र देवच आठवे. आधीच थंडी, त्यात मास्तरीणबाई जोराने तळहातावर केन मारायच्या. अस्सा राग यायचा त्या मास्तरणीचा, पण त्यामुळे पालक निश्चिंत. पूर्वी शाळेत जायचा कंटाळा असायचा. आता घरी राहण्याचा कंटाळा येतो मुलांना. का जातात मुले शाळेत इतके नियमित, याची अनेक कारणे शोधता येतील. पण, मुख्य कारण म्हणजे घरी कुणी राहातच नाही. आई-वडील ऑफिसमध्ये, आजी-आजोबांची तर केव्हाच वाट लावलेली. त्यामुळे शाळेत जाऊन तरी वेळ चांगला जाईल म्हणून ही पोरे शाळेत जात नसावी ना, अशी शंका येते. मधल्या सुटीसाठी (रिसेस आताचे नाव) आणलेल्या डब्यातील पेंड वरण, लोणचे, कांदा, पोळीला काय म्हणून गोडी असायची. शाळेच्या बाहेर विकत मिळणारी उकडलेली बोरे, चुरण, बोरकूट, मला नाही वाटत कुणाला विषबाधा करून गेली असतील म्हणून. आता प्रश्न पडतो की, टोपल्यात हे सर्व पदार्थ विकणारे गरीब की पिझ्झा हट, ज्याचे नावच झोपडी आहे, तेथे पदार्थ विकणारे गरीब? युअर वार्ड इज अब्सेंट ऑन मनडे प्लीज सेंड लीव्ह अप्लिकेशन. सरकारी कर्मचारीही देत नसतील इतक्या इमानेइतबारे लीव्ह अप्लिकेशन! प्रोजेक्ट नव्हतेच, असायचे ते फक्त गृहकार्य. ते करून आणले नाही की मग मात्र खैर नसायची. आता तर वडील बनवितात प्रोजेक्ट आणि पोरगा (वार्ड) शाळेत नेऊन मिरवितो.
 
 
शाळेचे स्नेहसंमेलन, जवळपास 15 दिवस तरी मोडायचेच यात. शाळेत असलेल्या सिमेंटच्या ओट्याला चार बाजूंनी मंडपाचा कपडा लावला की झाले तयार व्यासपीठ! आता तर मोठ्या हॉलशिवाय पोरांचे पाय थिरकतच नाहीत म्हणे! तुमच्या मुलाला थिरकवायचे आहे का, मग द्या तुम्हीच पैसे. नाचायचे शुल्क वेगळे, जाण्या-येण्याचे वेगळे, जेवणाचे वेगळे, त्यापेक्षा पोरांना अंबाझरी, महाराजबागेत नेणे परवडते. पैसे तर वाचतातच, शिवाय पोरांचा आनंद द्विगुणित होतो तो वेगळा.
 
 
सरकारी शाळेजवळून गेले की, कानावर पडायचे ‘बे एके बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा...’ खात्रीच व्हायची ही शाळाच आहे म्हणून. किलबिलाट असायचा, शाळा सुरू झाल्यापासून सुटेपर्यंत. आता बाजूने गेलो तरी लक्षात येत नाही ही शाळा आहे की ध्यान केंद्र! शाळेत आता ऐकायला मिळतच नाही किलबिलाट, आता पाहायला मिळतो चूपचिलाट...!